Best Time to Eat Banana: केळं हे वर्षभर सहज उपलब्ध होणारं आणि अनेकांच्या आवडीचं फळ आहे. काही जण दिवसाची सुरुवात केळ्याने करतात, तर काही जण वर्कआउटच्या आधी किंवा नंतर ते खातात. रात्री हलकी भूक लागली तरी अनेकांना केळं खाणं आवडतं. मात्र, केळं नेमकं कोणत्या वेळी खावं? याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जातात. वैज्ञानिकदृष्ट्या केळं खाण्यासाठी अशी एकच ठराविक ‘योग्य वेळ’ नाही. तुमची दिनचर्या, आहार आणि शरीराची गरज यानुसार केळं दिवसभरातील वेगवेगळ्या वेळी खाऊ शकता.

केळ्यात असतात ‘हे’ महत्त्वाचे पोषक घटक

केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी६ यांसारखे पोषक घटक असतात. NIHच्या माहितीनुसार, एका केळ्यामध्ये साधारण ४२२ मिलीग्रॅम पोटॅशियम आणि ०.४ मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी६ असू शकते. पोटॅशियम शरीरातील नस आणि स्नायूंच्या सामान्य कार्यासाठी तसेच द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी६ शरीरात प्रोटीनच्या वापरासह अनेक जैविक प्रक्रियांमध्ये भूमिका बजावते.

केळ्यातील कार्बोहायड्रेटमुळे ते सहज आणि झटपट ऊर्जा देणारा स्नॅक ठरू शकतो. त्यामुळे अनेकजण वर्कआउटपूर्वी किंवा वर्कआउटनंतर केळं खाणं पसंत करतात.

रिकाम्या पोटी केळं खावं का?

सकाळी रिकाम्या पोटी केळं खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, तर ते नाश्त्यासाठी खाऊ शकता. मात्र, काही लोकांना रिकाम्या पोटी फळ खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो. असं होत असल्यास केळं एकटं खाण्याऐवजी ओट्स, ब्रेड, दही किंवा इतर पौष्टिक पदार्थांसोबत खाऊ शकता.

केळं आणि दूध… कॉम्बिनेशन योग्य की अयोग्य?

केळं आणि दूध हा अनेकांचा आवडता पर्याय आहे. केळ्यातून कार्बोहायड्रेट, तर दुधातून प्रोटीन आणि इतर पोषक घटक मिळतात. दूध सहज पचत असेल तर केळं-दूध शेक किंवा स्मूदी संतुलित आहाराचा भाग होऊ शकतो. मात्र, लॅक्टोज पचण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींना दूध घेतल्यानंतर गॅस, पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याचा संबंध केळ्याशी जोडणं योग्य नाही.

रात्री केळं खाल्लं तर नुकसान होतं का?

रात्री केळं खाणं स्वतःहून हानिकारक असल्याचं मानण्याचं कारण नाही. रात्री केळं खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणतीही पचनाची समस्या होत नसेल, तर ते खाऊ शकता. मात्र, केळं खाल्ल्यानंतर पोट जड होणे किंवा अस्वस्थ वाटणे असा अनुभव येत असेल, तर ते दिवसाच्या दुसऱ्या वेळी खाणं अधिक सोयीचं ठरू शकतं.

डायबिटीज आणि किडनीच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी केळ्याच्या प्रमाणाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट असल्यामुळे ते रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात. किडनीच्या आजारामध्ये मात्र आणखी काळजी घ्यावी लागते. शरीरातून अतिरिक्त पोटॅशियम बाहेर काढण्याची क्षमता कमी झाल्यास काही रुग्णांसाठी जास्त पोटॅशियम असलेले पदार्थ मर्यादित करण्याची गरज असू शकते. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केळ्याचं प्रमाण ठरवावं.

मग केळं कधी खावं?

थोडक्यात सांगायचं तर केळं खाण्यासाठी एकच ‘परफेक्ट टाइम’ नाही. सकाळी नाश्त्यात, वर्कआउटपूर्वी किंवा नंतर, तर काही परिस्थितीत रात्रीही केळं खाऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीराला ते कितपत मानवतं आणि तुमच्या एकूण आहारात त्याचा समावेश कसा आहे.

केळं पौष्टिक असलं तरी ते संपूर्ण आहाराचा पर्याय नाही. उत्तम आरोग्यासाठी केळ्यासोबत विविध फळं, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा संतुलित आहारात समावेश करणं आवश्यक आहे.