Best Time to Eat Bananas: केळे हे साधे, सर्वत्र सहज उपलब्ध असलेले फळ असले तरी त्यामागे दडलेले आरोग्याचे रहस्य अनेकांना माहीत नसते. योग्य वेळी केळी खाल्ल्यास शरीराला झटपट ऊर्जा, सुरळीत पचन व वजन नियंत्रण यांसारखे अनेक लाभ मिळू शकतात. मात्र वेळ चुकली, तर अपेक्षित फायदा मिळेलच, असे नाही.

केळ्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. त्यातील सुमारे ८० टक्के घटक ऊर्जादायी असतात. त्यापैकी कार्बोहायड्रेटचे शरीरात झपाट्याने साखरेत रूपांतर होते आणि त्यामुळे त्वरित ऊर्जेचा पुरवठा होतो. त्यामुळे व्यायामापूर्वी १५ ते ३० मिनिटे आधी केळी खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक इंधन मिळते आणि कार्यक्षमता वाढते. सकाळच्या नाश्त्यात ओट्स, दही किंवा संपूर्ण धान्याच्या ब्रेडसोबत केळी खाल्ल्यास दिवसाची सुरुवात उत्साहात होते. दुपारनंतर येणारी आळसाची भावना कमी करण्यासाठीही केळी उपयुक्त ठरतात.

विशेष म्हणजे झोपण्यापूर्वी केळी खाल्ल्यास शरीराला विश्रांती मिळण्यास मदत होऊ शकते. त्यातील मॅग्नेशियम व व्हिटॅमिन बी६ हे घटक मेलाटोनिनच्या निर्मितीत साह्य करतात, ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

पचनाच्या दृष्टीनेही केळी महत्त्वाची आहेत. एका मध्यम आकाराच्या केळीत सुमारे तीन ग्रॅम तंतुमय घटक (फायबर) असतात. या तंतुमयतेमुळे अन्ननलिकेतील हालचाल सुरळीत होऊन, बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत मिळते. जेवणासोबत केळी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. कच्च्या केळीत ‘रेझिस्टंट स्टार्च’ नावाचा घटक अधिक प्रमाणात असतो, जो पचनसंस्थेसाठी हितकारक जीवाणूंना पोषण देतो आणि आंत्रस्वास्थ्य सुधारतो.

वजन नियंत्रणासाठीही केळी उपयुक्त ठरू शकतात. एका केळ्यात सुमारे १०५ उष्मांक (कॅलरीज) असतात, जे तृप्तीची भावना जास्त वेळ टिकवून ठेवतात. जेवणाच्या अर्धा तास आधी केळी खाल्ल्यास अति खाणे टाळता येते. मधल्या वेळेत भूक लागल्यास केळी हा नैसर्गिक आणि कमी उष्मांक असलेला पर्याय उत्तम ठरतो. व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास ऊर्जा वाढते आणि अधिक उष्मांक खर्च करण्यास मदत होते.

केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ व मँगनीज यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. पिकलेल्या केळ्यात साखरेचे प्रमाण जास्त असते; तर कच्च्या केळीत तंतुमय हा घटक अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे आपल्या गरजेनुसार केळ्याचा योग्य तो प्रकार निवडणे महत्त्वाचे आहे.

तथापि, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार किंवा केळ्याची अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी त्याच्या सेवनाबाबत योग्य ती काळजी घ्यावी. केळी प्रथिनयुक्त पदार्थ किंवा सुका मेव्यासोबत खाल्ल्यास रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होते.

(ही माहिती सर्वसाधारण ज्ञानावर आधारित असून, वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. त्यामुळे आहारातील कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी खाल्लेले केळे तुमच्या आरोग्यासाठी खरोखरच ‘सोन्याहून पिवळे’ ठरू शकते.)