Best Time to Take a Bath: दिवसभराचा थकवा, अंगाला आलेला घाम, त्वचेवर साचलेली धूळ आणि प्रदूषण यांपासून सुटका मिळवण्यासाठी अंघोळ करणे हा आपल्या दैनंदिन दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण सकाळी उठल्यानंतर लगेच अंघोळ करतात; तर काहींना रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय असते. काही जण कामाच्या गडबडीत दुपारी अंघोळ करणे पसंत करतात. मात्र, सकाळी, दुपारी की रात्री, नेमकी कोणत्या वेळी अंघोळ केल्याने शरीराला अधिक फायदे मिळतात, असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला आहे का? विशेष म्हणजे, अंघोळीच्या वेळेचा परिणाम केवळ स्वच्छतेवरच नाही, तर दिवसभरातील ताजेतवानेपणा आणि रात्रीच्या झोपेवरही होऊ शकतो. त्यामुळे अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आयुर्वेद आणि प्राचीन मान्यतांनुसार अंघोळीची वेळ कोणती?
प्राचीन भारतीय परंपरेमध्ये अंघोळीकडे केवळ शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया म्हणून पाहिले जात नव्हते; तर शरीर आणि मनाच्या शुद्धीशीही तिचा संबंध जोडला जातो. आयुर्वेदामध्ये सकाळी लवकर, विशेषतः ब्रह्म मुहूर्ताच्या काळात स्नान करण्याला महत्त्व दिले जाते. सूर्योदयाच्या साधारण ४८ मिनिटे आधीचा काळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त. या वेळी स्नान केल्याने शरीरातील आळस दूर होण्यास आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होते, अशी पारंपरिक मान्यता आहे.
सकाळी अंघोळ केल्यामुळे झोपेची गुंगी कमी होऊन दिवसाची सुरुवात उत्साहात करता येते. मात्र, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती, दिनक्रम आणि आरोग्य वेगळे असते. त्यामुळे अंघोळीची वेळ ठरवताना स्वतःच्या शरीराचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जेवणानंतर लगेच अंघोळ करणे टाळावे?
आयुर्वेदामध्ये जेवण केल्यानंतर लगेच स्नान करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः पोटभर जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ केल्यास पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी पारंपरिक मान्यता आहे. त्यामुळे जेवणापूर्वी अंघोळ करणे किंवा जेवणानंतर किमान दोन तासांचे अंतर ठेवणे योग्य मानले जाते.
अंघोळीची वेळ ठरवताना शरीराची प्रकृतीदेखील विचारात घेतली जाते. आयुर्वेदानुसार कफ प्रकृती असलेल्या व्यक्तींना सकाळी अंघोळ केल्याने आळस आणि सुस्ती कमी होण्यास मदत होऊ शकते. तर, वात प्रकृती असलेल्या व्यक्तींसाठी संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे आरामदायी ठरू शकते. हे आयुर्वेदातील पारंपरिक दृष्टिकोन आहेत.
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सकाळी अंघोळ करण्याचे फायदे
रात्री झोपताना आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो. त्वचेवरील मृत पेशीही नैसर्गिकरीत्या गळून पडतात. त्यामुळे सकाळी अंघोळ केल्याने रात्रीच्या वेळी त्वचेवर साचलेला घाम, तेलकटपणा आणि इतर अशुद्धी स्वच्छ करण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटू शकते.
सकाळी थंड किंवा साधारण गार पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला जाग येण्यास मदत होऊ शकते. काही व्यक्तींना यामुळे अधिक सतर्क आणि उत्साही वाटते. अंघोळीमुळे रक्ताभिसरणात तात्पुरते बदल होऊ शकतात, तसेच मनःस्थिती सुधारण्यासही मदत मिळू शकते. मात्र, थंड पाण्याने अंघोळ केल्याने प्रत्येक व्यक्तीची मज्जासंस्था पुन्हा कार्यान्वित होते किंवा सर्वांना सारखेच फायदे मिळतात, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
रात्री अंघोळ केल्याने मिळतात कोणते फायदे?
दिवसभर बाहेर फिरताना शरीरावर धूळ, घाम आणि प्रदूषणाचे कण जमा होतात. अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. विशेषतः दिवसभर प्रवास करणाऱ्या किंवा बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी रात्रीचे स्नान उपयुक्त ठरू शकते.
त्याशिवाय झोपण्याच्या साधारण दीड तास आधी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. अंघोळीनंतर शरीराचे तापमान हळूहळू कमी होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे शरीराला झोपेसाठी अनुकूल स्थिती मिळू शकते. काही व्यक्तींना रात्री अंघोळ केल्यानंतर शरीर आणि मन शांत झाल्यासारखे वाटते.
मग अंघोळ करण्याची सर्वांत योग्य वेळ कोणती?
अंघोळ करण्यासाठी सकाळ, दुपार किंवा रात्र यांपैकी एकच वेळ सर्वांसाठी सर्वोत्तम आहे, असे विज्ञान सांगत नाही. सकाळी अंघोळ केल्याने दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होऊ शकते; तर रात्री अंघोळ केल्याने शरीराववरील दिवसभराचा घाम आणि धूळ स्वच्छ होऊन झोपण्यापूर्वी आराम मिळू शकतो. दुपारी अंघोळ करणेही गरजेनुसार योग्य ठरू शकते, विशेषतः उष्ण हवामानात किंवा अधिक घाम आल्यास.
त्यामुळे तुमचा दिनक्रम, कामाचे स्वरूप, हवामान आणि शरीराची गरज लक्षात घेऊन अंघोळीची वेळ ठरवणे अधिक योग्य ठरेल. नियमित स्वच्छता राखणे आणि त्वचेला अनुकूल अशा पद्धतीने अंघोळ करणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.
(टीप : या लेखात दिलेली माहिती सामान्य स्वरूपाची असून, ती आयुर्वेदातील पारंपरिक मान्यता आणि उपलब्ध वैज्ञानिक माहितीनुसार मांडण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि आरोग्य वेगवेगळे असू शकते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित विशिष्ट समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
