Best Time to Water Plants: उन्हाळ्याचा हंगाम सुरू असून कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे केवळ माणसांनाच उष्णतेचा त्रास होत नाही, तर पशू-पक्षी आणि झाडांनाही त्याचा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही बागेतील झाडांना कोणत्याही वेळी पाणी घालत असाल, तर ते झाडांसाठी नुकसानकारक ठरू शकते.

त्यामुळे आज आपण उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्याची योग्य पद्धत आणि योग्य नियम जाणून घेणार आहोत. अनेकजण दिवसा झाडांना पाणी घालतात, त्यामुळे झाडांच्या मुळांपर्यंत गरम पाणी पोहोचते आणि त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर होऊ लागतो.

वेळेची विशेष काळजी घ्या (Gardning Tips in Summer)

गार्डन तज्ज्ञ इमरान यांनी सांगितले की, उन्हाळ्यात झाडे हिरवीगार आणि निरोगी ठेवायची असतील तर पाणी देण्याची वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. दिवसा झाडांना पाणी दिल्यास त्याचा झाडांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांना पाणी देताना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ६ नंतर पाणी द्यावे. विशेषतः संध्याकाळी पाणी देणे अधिक योग्य मानले जाते. यामागचे कारण म्हणजे रात्री पाणी झाडांच्या मुळांपर्यंत सहज पोहोचते आणि हवामान थंड असल्यामुळे पाण्याचे तापमानही सामान्य राहते.

गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नका

उन्हाळ्यात अनेकजण झाडांना जास्त प्रमाणात पाणी घालतात. मात्र जास्त पाणी असल्यास झाडे ते लवकर शोषू शकत नाहीत आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. मुळांजवळ जास्त पाणी साचल्यामुळे काही वेळा झाडे सुकू शकतात किंवा त्यांची पाने पिवळी पडू लागतात. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळावे.

मल्चिंगचा वापर करा

उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग हा अतिशय उपयुक्त उपाय मानला जातो. झाडांच्या आजूबाजूला सुकलेली पाने, गवत, नारळाचा भुसा किंवा काडीकचरा टाकल्यास माती लवकर कोरडी पडत नाही. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि वारंवार पाणी देण्याची गरज भासत नाही. मल्चिंगमुळे मातीचे तापमान नियंत्रित राहते आणि झाडांच्या मुळांचे कडक उन्हापासून संरक्षण होते. याशिवाय तणांची वाढही कमी होते. विशेषतः किचन गार्डन आणि फुलझाडांमध्ये मल्चिंग केल्यास झाडे जास्त काळ ताजी आणि टवटवीत राहतात.

सामान्य तापमानाचे पाणी वापरा

या सर्व उपायांबरोबरच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी. उन्हाळ्यात झाडांना पाणी देताना नेहमी सामान्य तापमानाचे पाणी वापरावे. खूप गरम किंवा घाणेरडे पाणी वापरल्यास झाडांचे नुकसान होऊ शकते आणि ती खराब होण्याची शक्यता वाढते.