Best Tips For Sound Sleep : शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक रात्री शांत झोप घेणं आवश्यक असतं. यामुळं तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. आताच्या डिजिटल जगात अत्यंत व्यस्त शेड्युल आणि बदलत्या जीवशैलीमुळं अनेकांना शांत झोप लागत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो आणि तुम्हाला मधुमेह, हायपरटेंशनसारखे आजार जडतात. पण आता तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण सकाळच्या काही चांगल्या सवयी तुम्हाला रात्रीची सुखाची आणि शांत झोप देऊ शकतात.
रात्री शांत झोप लागण्यासाठी तुम्हाला सकाळच्या सत्रात काही महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. आरोग्य विषयाचे जाणकार ल्यूक यांनी याबाबत इन्स्टाग्रामवर महत्वाची पोस्ट शेअर केली आहे. रात्रीच्या वेळी शांत झोप लागण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, याविषयी त्यांनी महत्वाचे सल्ले दिले आहेत. तुम्ही प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर सुर्याच्या किरणांच्या प्रकाशात शांत बसा. दहा मिनिट जरी तुम्ही नैसर्गिक उजेडात बसलात, तर तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा नक्की होईल.
नक्की वाचा – सतत मांसाहार खाल्ल्याने तुम्हालाही होऊ शकतात ‘हे’ भयंकर आजार; वेळीच जाणून घ्या
सकाळचा सुर्यप्रकाश तुमची दैनिक लयबद्धता वाढवण्यासाठी मदत करतो. तसेच सुर्याच्या किरणांमुळं मेलाटोनीनमध्ये सुधारणा होत राहते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्हाला शांत झोप मिळते आणि आरोग्य सृदृढ राहण्यास मदत होते. तुम्ही भरपूर झोप घ्या…झोप हे औषध आहे, असं ल्यूक यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जर तुम्ही सकाळी सुर्यप्रकाशात राहणं मिस केलं, तर काही हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी सुर्यप्रकाशाच्या किरणांमध्ये शांत बसू शकता. सायंकाळी असणारी सुर्यप्रकाशाची किरणेही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, असंही ल्यूक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, झोप आणि व्हिटॅमिन डी यांचं योग्य समीकरण तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरणारं आहे. व्हिटॅमिन डी च्या सेवनामुळं तुम्हाला चांगली झोप मिळते आणि सातत्य राहतं. पण व्हिटॅमिन डी चं सेवन योग्यप्रकारे न केल्यास तुम्हाला झोपेच्या समस्येला सामोरं जावं लागेल. डॉ दिलीप गुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुर्यप्रकाशात राहिल्यामुळं पिनीयल ग्रंथी सक्रीय होतात आणि दैनिक लयबद्धतेतही सुधारणा होते. प्रत्येक दिवशी सकाळी किंवा दुपारच्या सत्रात १५ ते ३० मिनिटे सुर्याच्या किरणांमध्ये राहिल्यास नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत मिळते. पण ज्यांना कर्करोग, त्वचेचे आजार आहेत, त्यांनी सुर्यप्रकाशात राहणं टाळावं.