वेगवेगळय़ा पर्यटन कंपन्यांबरोबर फिरायला जाण्यात सुरक्षितता असते. पण आपलं आपण सगळं नियोजन करून जाण्यात एक वेगळाच थरार असतो. परदेशात तर तो प्रकर्षांने जाणवतो.

कुटुंबाबरोबर युरोपची ट्रिप करायचं ठरलं. तसं कामासाठी काही वेळा युरोपात थोडंफार फिरणं झालं होतं. तिथली शहरं आणि मुख्य म्हणजे तिथल्या ट्रेन, बस, ट्रॅम वगैरे प्रवाससेवांचा परिचय झाला होता. प्रत्येक देश आणि शहर जरी वेगळं असलं तरी एकदा का तिथल्या व्यवस्थेमागचं गणित लक्षात आलं की कुठल्याही शहरात – विशेष करून मध्य आणि पश्चिम युरोपात – तुम्ही सराईतासारखे फिरू शकता. फ्रान्स, जर्मनीसारख्या देशात फिरताना स्थानिक भाषा येत असेल तर सगळं अजूनच सोपं होऊन जातं. तसंच आता आंतरजालही इतकं प्रगल्भ झालंय की ठिकठिकाणच्या हॉटेलांविषयची नव्हे तर रेल्वेची वेळापत्रकं, भाडी, संग्रहालयांची प्रवेशशुल्कं, ती खुली असण्याच्या वेळा अशा सगळ्या लहानमोठय़ा गोष्टींची माहिती आपल्याला सोफ्यावर लोळतालोळताही सहज साध्य होते. हॉटेल बुक करता येते किंवा तिकिटंही काढता येतात.
या सगळ्या जोरावर स्वत:च सगळं ठरवून युरोपची बारा-तेरा दिवसांची सहल नियोजित करायला आम्ही सरसावलो. अर्थात देशातील आणि परदेशातली सफर करण्यात एक मोठा फरक असतो. व्हिसा नामक कटकटीचा. याबाबतीत उगाच फाजील आत्मविश्वास न दाखवता आम्ही निमूटपणे एका छोटय़ा पण विश्वासार्ह व्यापार कंपनीच्या उंबरठय़ावर डोकं ठेवलं आणि ते म्हणतील ती कागदपत्रं त्यांच्या हवाली केली. वकिलातीत मुलाखती होऊन व्हिसा हातात पडल्यावर मात्र मी छप्पन्न इंच छाती काढून फिरायला लागलो. व्हिसाच्या मानानं आता उरलेली कामं तशी चिल्लर होती. विमानाची तिकिटं, युरेल पास, परदेशी चलन, सामान वगैरे.

स्वतंत्रपणे ट्रिप करताना आपल्याला पूर्ण मोकळीक राहत असली तरी अर्थात ते करताना आपल्याला कधी त्रासातून जावंही लागतं. काही बाबतीत थोडा धोका असू शकतो. उदाहरणार्थ, आजकाल हॉटेल बुकिंग ऑनलाइन अगदी सहज होऊ शकतं. पण क्रेडिट कार्ड नंबर द्यावा लागणार असेल तर जोखीम येतेच. आणि फिरण्याची मोकळीक ठेवायची असेल तर आधी पैसे भरून बुकिंग केलं तर गडबड होऊ शकते. दुसरीकडे व्हिसाच्या अटींमध्ये बऱ्याचदा तिथल्या हॉटेलचं पक्क बुकिंग पाहिजे असतं. मग हा तिढा सोडविण्यासाठी क्रेडिट कार्ड नंबर किंवा आगाऊ पैसे न भरता कुठल्या हॉटेलांची पक्की बुकिंग मिळू शकतात याचा चाळणी घेऊन शोध करायला लागला. पाहायच्या ठिकाणापासून योग्य अंतर, परवडेल असं भाडं, खोली उपलब्धता आणि कार्डाचा नंबर किंवा आगाऊ पैसे न भरता पक्कं बुकिंग अशी आखुडशिंगी बहुदुधी गाय शोधण्यात बरेच तास आणि गिगाबाइट्स खर्ची पडले.

स्वतंत्र नियोजनात मिळणारी मोकळीक कधी कधी थोडीशी आणीबाणीही निर्माण करू शकते. स्वित्र्झलडच्या इंटरलाकेनला असा एक अनुभव आला. तासभर भटकूनही हॉटेलची खोली मिळेना. जिथे खोल्या होत्या त्यांची भाडी इतकी होती, की पुढली ट्रिप गुंडाळून तिथूनच परतायला लागलं असतं. शेवटी युथ होस्टेलमध्ये एक फॅमिली रूम मिळाली. युथ होस्टेल असलं तरी खोलीचं भाडं बऱ्यापैकी होतं. पण तिथल्या रिसेप्शन मुलीने बरीच खटपट करून बऱ्यापैकी चांगल्या पॅकेजमध्ये आम्हाला सामावून घेतलं.अशीच धावपळ ट्रेनच्या तिकिटांविषयी एकदा झाली. यू. के. मध्ये आमचा ‘युरेल पास’ चालणार नव्हता. लंडनच्या किंग्ज क्रॉस स्टेशनवर पुढलं बुकिंग करायला गेलो तेव्हा नेमकं आम्हाला हवं त्या दिवसाची तिकिटं बरीच महाग होती. एक दिवस अलीकडच्या आणि पलीकडच्या दिवसांची तिकिटं एकदम स्वस्त. पण तिथल्या बुकिंग क्लार्कनेही खटपट करून त्यातल्या त्यात स्वस्त पर्याय निवडून दिला.

स्वतंत्र नियोजनाखाली अजून एक ‘फ्लिप साईड’ म्हणजे तिथे आपणच सगळं करायचं असल्यामुळे कधी कधी वेळ जाऊ शकतो. दमल्यावर लंडनच्या किंग्ज क्रॉस स्टेशनवर तिथल्या ‘स्मार्ट कार्ड’च्या सिस्टीमशिवाय पर्यायच नाही. आम्ही आपले तिकिटाची बारी किंवा ऑटोमॅट शोधत हातो. शेवटी तिथे एक आपलाच तरुण भेटला आणि त्याने सगळं नीट समजावून सांगितलं. एकदा ती व्यवस्था लक्षात आल्यावर मात्रं सगळं लंडन टय़ूबनं अगदी छान भटकता आलं.

कधीकधी हवं त्या ठिकाणी पोचायला थोडा जास्त वेळ लागतो. लंडनमध्ये ‘२२१ बी, बेक स्ट्रीट’ला जाताना असंच विचारत, शोधत जावं लागलं. पण तरी मी म्हणेन की एखादं ठिकाण असं फिरताना तुम्हाला ते जेवढं समजू शकतं तेवढं यात्रा कंपनीच्या सहलीत नाही समजू शकणार. यू.के.मध्ये भाडय़ानं घेतलेली गाडी चालवत भटकलो तेव्हा तिथे वाहन चालवण्याचा थरार, सगळ्या परिसराची होणारी ओळख, लोकांशी बोलण्याची संधी आणि मर्जीप्रमाणे हवं तिथे हवं तितका वेळ थांबणं याची मजा स्वतंत्र सहलीतच.

सहलीतला आमचा पहिला मुक्काम होता जर्मनीतल्या म्युनिकला. बायको पूर्वी कामानिमित्त म्युनिकला राहिलेली, ते तिला खूप आवडलेलं शहर. मला त्या शहराचा फारसा परिचय नसला तरी तब्बल दहा वर्षांनी मी पुन्हा जर्मनीत पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी तो ‘नॉस्टॉल्जिक’ अनुभव होता. आणि मुलगी पहिल्यांदाच युरोपला आलेली असल्याने बटाटय़ाएवढे डोळे विस्फारून फिरत होती. अशा आपआपल्या वेगळ्या सुखद मानसिक अवस्थांमध्ये आम्ही म्युनिक पाहायला लागलो. शहराजवळच्या नॉयश्वानस्टाईनला राजवाडा आणि परिसर पाहिला. म्युनिक शहरातही इकडेतिकडे फिरलो. पण तिथे सर्वात छान काय विचारलं तर तिथल्या आल्टष्टाट्मधला – म्हणजे जुन्या शहरातला- ‘मारिएन प्लाट्झ’ हा भाग. बहुतेक सगळ्या शहरांच्या आल्टष्टाट्सारखा इथेही वाहनांना मज्जाव आहे. सगळीकडे छान फरसबंदी. जुन्या इमारतींमध्ये कलात्मकतेने बसवलेली आधुनिक दुकानं. उन्हाळा असल्याने उघडय़ावर खुच्र्या-टेबलं मांडलेले कॅफेज. निवांतपणे त्या भागात फिरावं, शॉपिंग करावं. वाटलं तर एखाद्या कारंज्याच्या चौथऱ्यावर जरा टेकावं किंवा स्ट्राँग ब्लॅक कॉफी पीत अर्धा-पाऊण तास कॅफेबाहेरच्या खुच्र्यावर नुसतंच बसून राहावं. आसपासच्या आपल्यासारख्याच निवांत लोकांकडे पाहात. दुपारी बाराचा सुमार असेल तर रमतगमत मारिएन प्लाट्झमधल्या टाऊनहॉलपाशी जावं. तिथल्या घंटाघरात एक मोठय़ा लाकडी बाहुल्या असलेलं घडय़ाळ आहे. बारा वाजायला येतात तेव्हा तिथे अनेक स्थानिक आणि पाहुण्या लोकांची गर्दी जमते. बाराच्या ठोक्याला त्या लाकडी बाहुल्या फिरायला लागतात. त्यातून एक बव्हेरिअन ऐतिहासिक कथा दर्शविली जाते. त्याचबरोबर घंटांचा सुंदर नाद ऐकायला मिळतो. शंभरहून अधिक वर्षांपूर्वी बसवलेल्या घडय़ाळाचा हा कठपुतळ्यांचा खेळ रोज होत असतो.

म्युनिकहून पाय निघत नव्हता, पण दुसरीकडे स्वित्र्झलड खुणावत होतं. युरेलचा पास असल्याने इथे तिकिटं काढायची झंझट नव्हती. स्वित्र्झलडविषयी नव्याने आणि वेगळं काय सांगावं? आपल्या हिमाचल प्रदेशासारखी देवभूमीच ती. एक दिवस युंगफ्राऊयोखचं शिखर पाहून तिथल्या बर्फात खेळून आलो. युरेलचा पास स्वित्र्झलडच्या ‘गोल्डन पास लाइन’ला चालतो हे समजल्यावर एक अख्खा दिवस छतापर्यंत काचा असलेल्या त्या पॅनोरॅमिक ट्रेनमधून भटकलो. हवं तिथे उतरावं. थोडा वेळ घालवावा आणि परत पुढली ट्रेन पकडावी. ट्रेनमध्ये निवांत कॉफी पीत, पुस्तक वाचत आसपासचं निसर्गसौंदर्य न्याहाळावं. इथपर्यंतच्या प्रवासाचं बायकोला आणि मला नावीन्य नसलं तरी यापुढल्या प्रवासाचं मात्र आम्ही दोघांनाही मुलीइतकंच अप्रूप होतं, कारण यापूर्वी यू.के.ला आम्ही कुणीच गेलो नव्हतो. मेनलँड युरोपातून इंग्लिश चॅनलखालच्या बोगद्यातून जाणाऱ्या ‘युरोस्टार’ रेल्वेनं लंडनला पोहोचायचं असं आम्ही ठरवलं होतं. त्यासाठी स्वित्र्झलडहून रेल्वेनं पॅरिसला गेलो. पॅरिसची रेल्वे स्टेशनं आणि तिथली अंडरग्राऊंड मेट्रोची व्यवस्था अतिशय गोंधळवणारी आहे. त्या बाबतीत जर्मनांशी तुलना करता फ्रेंचांचा कारभार खूपच गलथान आहे. त्यामुळे कसे तरी धक्के खात एकदाचे ‘युरोस्टार’च्या ट्रेनमध्ये विराजमान झालो. डब्यात आमच्या शेजारी एक इंग्लिश आजी-आजोबा होते. काही विचारलं तर आजी चांगली माहिती सांगत होत्या. टेक्नो-सॅव्ही होत्या. त्यांच्या आय पॅडवर सर्च मारून काय काय सुचवत होत्या.

पॅरिसहून निघाल्यावर काही वेळाने गाडी बोगद्यात शिरली. अध्र्या-पाऊण तासाने गाडी बोगद्यातून बाहेर पडल्यावर आजोबा म्हणाले, ‘‘वी आर ऑन द इंग्लिश सॉइल!’’ आणि अंगात एक थरार आला. एका नव्या देशात पाऊल टाकल्याचा.आजीबाईंच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हॉटेलला जाऊन पोचलो. खोली ठीक होती; पण वॉश बेसिन ड्रेनच होत नव्हतं. त्यांच्यातल्या एकानं काही तरी खाटखूट केलं, पण होईना. रात्रीचे दहा वाजलेले. अगदी नावाजलेली बजेट हॉटेल्सची चेन. त्यामुळे असं काही होईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. रिसेप्शनची शहाणी आम्हाला म्हणे, की आता प्लंबर सकाळीच येईल. तोपर्यंत अ‍ॅडजस्ट करा. अरे, काय अ‍ॅडजस्ट करा? सकाळी चूळ तरी भरायला नको का? दुसरी खोली मागितली तर म्हणे सगळ्या फुल आहेत. मग आम्ही हॉटेलच सोडायचं ठरवलं. तिथूनच फोन करून एक खोली मिळवली; पण तिथे जायला टॅक्सीचे तीस पौंड लागणार होते! रिसेप्शनिस्ट बया म्हणे आम्ही नाही देऊ शकत. तेव्हा माझं भारतीय रक्त उसळलं. तिला अगदी शांतपणे पण ठामपणे सांगितलं, की तू टॅक्सीचे पैसे दिले नाहीस तर मी रात्रभर इथेच उभा राहीन. ‘‘आय प्रॉमिस!’’ तिला म्हणालो. या सत्याग्रहांच्या धमकीचा परिणाम झाला. तिने आत जाऊन बॉसला फोन लावला. मग बाहेर येऊन टॅक्सी बोलावली. आम्ही तिला दिलेले खोलीच्या भाडय़ाचे पैसे तिने परत दिले आणि तिने टॅक्सी ड्रायव्हरला तीस पौंड दिल्यावरच आम्ही तिथून निघालो.

नशिबानं दुसरं हॉटेल चांगलं निघालं. सकाळी ताजेतावाने होऊन भरपेट न्याहरी केली आणि लंडन पाहायला बाहेर पडलो. पुढल्या प्रवासाची तिकिटं काढायची होती म्हणून परत किंग्ज क्रॉस स्टेशनला गेलो. तिकिटं काढून झाल्यावर मुलगी आणि तिच्याबरोबरीनं बायकोही प्लॅटफॉर्म नंबर ९३/४ धुंडाळायला लागल्या. दोघीही हॅरी पॉटर फॅन्स. हॅरी पॉटरच्या पुस्तकातला हा काल्पनिक रेल्वे प्लॅटफॉर्म व्यावसायिक कल्पकतेनं किंग्ज क्रॉस स्टेशनातच तयार केला आहे. कथेतला हा प्लॅटफॉर्म इतरांना दिसत नाही. दोन प्लॅटफॉर्मच्या मध्ये तो असतो. म्हणून त्याचा क्रमांक ९३/४. जादूचं शिक्षण घ्यायला जाणारे हॅरी पॉटर आणि त्याचे मित्र वगैरे दोन प्लॅटफॉर्ममधल्या भिंतीवर सामानाची ट्रॉली घेऊन धडकतात आणि इथून अदृश्य होऊन जादूई प्रदेशातल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर अवतरतात. तिथल्या भिंती एक अर्धवट भिंतीत शिरलेली भासावी अशी ट्रॉली लावली आहे. गळय़ात हव्या त्या रंगाचा स्कार्फ घालून, हातात जादूची कांडी घेऊन तिथे कुणालाही फुकटात आपला फोटोही काढून घेता येतो. त्यांचा एक मदतनीस फोटोसाठी पोझ द्यायला मदत करतो. तिथे फोटो काढायला मोठी लाइन होती. प्रत्येकाची तीन-चार मिनिटं धरली तरी तास-दीड तास नक्कीच जाणार. पण हौसेला मोल नाही. मुलगी आणि बायको लायनीत उभ्या राहिल्या. मी आपला त्यांच्या पर्स वगैरे घेऊन जवळच एका खांबापाशी सरळ जमिनीवर फतकल मारून जो बसलो, तो त्यांचा नंबर आल्यावरच फोटो काढायला उठलो.
त्यानंतर दिवसभर टय़ूबने ठिकठिकाणी जायचं आणि आसपास पाय तुटेस्तोवर फिरायचं हाच उद्योग. वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे, बिग बेन, लंडन आयचं चक्र, राजवाडय़ावरचा ‘चेंज ऑफ गार्ड्स’ सेरेमनी, जेम्स पार्क, सेंट पॉलचं कॅथ्रेडल, पिकॅडली सर्कस हे सगळे भाग पाहिले. शरलॉक होम्सच्या पत्त्यातील बेकर स्ट्रीटमधली ‘२२१ बी’ ही घर क्रमांकाची पाटी, घराच्या दारावर चिकटवलेली १८८८ सालची एक काल्पनिक ‘पोलीस नोटीस’, घराशेजारची ‘हडसन रेस्टॉरंटची’ काल्पनिक पाटी पाहून पुन्हा एकदा इंग्लिश लोकांच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं. आणि लंडनच्या प्रेमात पडलो. आतापर्यंत जी मोठी शहरं पािहली त्यांत लंडनच सर्वात जास्त आवडलं.

लंडनहून ट्रेनने निघून आम्ही इंग्लंडच्या वायव्येच्या ‘कंब्रिया’ प्रांतातल्या ‘लेक डिस्ट्रिक्ट’ या डोंगराळ भागात वसलेल्या केंडल या छोटय़ा टुमदार शहरात पोचलो. निघताना लंडनच्या भव्यतेने भारावलेलो होतो. आणि आता केंडलसारख्या इंग्लिश मातीत घट्ट मुळं धरून ठेवलेल्या भागात आम्ही आलो. लंडनच्या मेगा सिटीची लगबग आणि लोकांचा शहरी तुटकपणा लंडनमध्येच राहिला होता. इथे जाणवत होता छोटय़ा ठिकाणचा निवांतपणा, बोलकेपणा.

या सहलीतला एक विशेष म्हणजे परदेशात गाडी चालवण्याचा अनुभव. आतापर्यंत जर्मनीला अनेकदा जाऊनही तिथे गाडी चालवण्याचं धाडस कधी केलं नव्हतं. एक तर तिथल्या रहदारीचा वेग, वेगळय़ा पद्धती, वेगळे नियम आणि मुख्य म्हणजे ‘लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह’ – म्हणजे आपल्यापेक्षा रस्त्याच्या उलट बाजूने वाहनं चालवायची पद्धत. पण यू. के. मध्ये आपल्यासारखंच ‘राइट हॅण्ड ड्राइव्ह’ असल्याने या वेळी परदेशात गाडी चालवायचा अनुभव घ्यायचाच असं ठरवलं होतं. केंडलला पोचल्यावर आधी कार रेन्टल एजन्सीत जाऊन गाडी भाडय़ानं घेतली. फॉर्म भरणे, लायसन्सची पडताळणी वगैरे सोपस्कार पार पडले. तिथल्या मुलीने गाडीची सिस्टीम, जी. पी. एस्. वगैरे सगळं समजावून सांगितलं. मी चावी फिरवून इंजिन सुरू केलं. आणि भीतीनं अंगाचं पाणी पाणी झालं. मुख्य भीती, तिथल्या काटेकोर नियमांत आपण काही तरी, चूक करू हीच. त्यात केंडल शहर जुनं आणि छोटंसं आहे. बहुतेक सगळय़ा अरुंद गल्ल्या. त्यामुळे खूप ठिकाणी एकदिशामार्ग. जी. पी. एस्.मधली ती बाई मार्गदर्शन करीत होती. पण सगळंच नवं असल्यामुळे तिच्या बोलण्यावर लक्ष ठेवणं, इतर वाहनांचा अंदाज घेणं, वेळेत योग्य ठिकाणी वळणं वगैरे गरजेचं होतं. बरं तिथे आपल्यासारखा हात बाहेर काढून मागच्याला ‘जरा थांब’ म्हणून विनंती करण्याचीही पद्धत नाही. आणि काही झालं तरी हॉर्न वाजवायचा नाही हे सारखं स्वत:ला सांगत राहायचं. त्यामुळे तिथून केंडलमधल्या ‘शेक्सपिअरइन’ हॉटेलला पोचेपर्यंत तारांबळ उडालेली होती. पण आश्चर्य म्हणजे तासाभरात बऱ्यापैकी आत्मविश्वास आला. शेवटपर्यंत मनावर थोडा ताण जरी राहिला तरी तिथे गाडी चालवताना खूप मजा आली. नंतर बायकोनंही जरा गाडीवर हात साफ करून घेतला.

पुढचे दोन दिवस लेक डिस्ट्रिकमध्ये गाडीनं भटकलो. लेक डिस्ट्रिक्ट अतिशय सुंदर आहे. नावाप्रमाणेच तिथे खूप तलाव आहेत. डोंगराळ भागातून वळणावळणाचे रस्ते. भरपूर हिरवळ. परिसर अतिशय शांत-निवांत आणि अप्रतिम सृष्टिसौंदर्य, कॉकरमाऊथ नावाच्या लहानशा गावात विल्यम वर्डस्वर्थचं स्मारक आहे. वर्डस्वर्थचा जन्म जिथे झाला, त्याची बहीण आणि सखी डोरोथीबरोबर त्याचं बालपण जिथे गेलं ती वास्तू जतन करून ठेवली आहे. तिथे एक जुन्या पद्धतीचं, जुनी भांडीकुडी आणि इतर साहित्य असलेलं स्वयंपाकघर मांडलंय. जुनं फर्निचर, कागदपत्रं आहेत. एका मेजावर पीसवाला, बोरू, दौत आणि कागद ठेवलेले असतात. आपण हातानं तो बोरू वापरून बघू शकतो.
असंच केस्विक नावाचं अजून एक छोटंसं टुमदार गाव होतं. तिथे नाटकाचं एक छोटंसं थिएटर आणि त्याला लागून रेस्टॉरंट होतं. संध्याकाळची सातची वेळ होती. आम्ही चहा मागितला तेव्हा वेट्रेसच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं. ‘‘चहा म्हणजे नुसता चहा?’’ आम्ही हो म्हटलं. हसू दाबत ती निघून गेली. हळूहळू माणसं जमायला लागली. तिथलं काही वेळात सुरू होणारं नाटक पाहायला ते जमत होते. तेव्हा लक्षात आलं की ती त्यांची ‘सपर’ची वेळ होती. नाटकाआधी लोक जेवून घेत होते. म्हणूनच वेट्रेस गोंधळात पडली.

रेस्टॉरंटमध्ये नाटकाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी काम करणाऱ्या स्थानिक संस्थेची पोस्टर्स लावलेली होती. नाटकांचं महत्त्व, ती टिकवण्यासाठी संस्था करीत असलेली कामं, देणग्यांची गरज वगैरे गोष्टी त्या पोस्टर्सवर होता. आत होणारा प्रयोगही त्यांनीच आयोजित केला होता. अपेक्षेप्रमाणे तिथे म्हातारी जोडपीच होती. पण तरुण आणि मध्यवयीन लोकांची संख्याही बरीच होती.
खास इंग्लिश पद्धतीचा चहा त्या थंड वातावरणात पिऊन आम्ही बाहेर पडलो. थिएटरजवळच एक छान तळं होतं. अशाच एका तलावाच्या काठावर आपण उभे आहोत. संध्याकाळ झालेली आहे. अधूनमधून आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडलेले स्थानिक दिसतायत. बाजूच्या एका कुरणात पंधरा-वीस लठ्ठ मेंढय़ा सुस्तपणे बसलेल्या आहेत. तळय़ाचं पाणी स्तब्ध आहे. किंचित बोचरी झालेली थंड हवाही स्तब्ध आहे. आपण तळय़ावर नजर टाकतो. पाण्यापासून थोडय़ाशाच उंचीवरून काही पक्षी उडत जाताना दिसतात. पलीकडच्या तीरावर हिरव्या गर्द झाडीत असलेलं एक टुमदार घर दिसतंय. आणि आपण मंत्रमुग्ध होऊन तसेच उभे आहोत. इथून परतायला कुणाचं मन होणार?
पुन्हा एकदा अनिच्छेनं ते ठिकाण सोडलं आणि गाडी चालवत स्कॉटलंडकडे निघालो. लेक डिस्ट्रिक्ट मागे पडला, तसं त्याचं सौंदर्यही. आता एम सिक्स या हायवेने चाललो होतो. अंतर झपाटय़ानं कापलं जात होतं. पण परिसरात विशेष पाहण्याजोगं काही नव्हतं. अधूनमधून इंडस्ट्रियल भाग दिसत होते. मग ग्लासगो शहर लागलं. महाकाय शहर, प्रचंड रहदारी आणि हायवेचं मोठं काम चाललेलं. त्यामुळे ट्रॅफिक जॅम. मुंगीच्या गतीनं ग्लासगो ओलांडायलाच पाऊण तास लागला. त्यानंतर आम्ही स्कॉटिश हायलॅण्ड्सच्या दिशेनं निघालो. परिसर हळूहळू डोंगराळ व्हायला लागला. वळणावळणाच्या, चढउताराच्या रस्त्यांवरून आत जात होतो आणि अचानक परिसर बदलला.
स्कॉटिश हायलॅण्ड्स म्हणजे जादूई परिसर. मंतरलेला. अगदी अनोखी दुनिया. कमी वनस्पती असलेले उंच उंच डोंगर. त्या डोंगरातले ‘ग्लेन्स’ म्हणजे दऱ्या. त्यांतून नागमोडी वाहणारे लहान-मोठे ओढे. हवा अतिशय थंड आणि भरपूर वारं. कुठे कुठे ढगांचे पुंजके डोंगरमाथ्यावर विसावलेले. जुलै महिना असूनही डोंगरावर अधूनमधून हिम दिसतंय. अक्षरश: जादूई प्रदेशात असल्यासारखं. तिथे फिरताना एका ठिकाणी रेल्वेचा जुना दगडी पूल पाहिला. हॅरी पॉटरच्या कुठल्याशा सिनेमात याचं शूटिंग आहे. जादूई पाश्र्वभूमीवरच्या हॅरी पॉटरचं शूटिंग स्कॉटलंडमध्ये होणं हे क्रमप्राप्तच होतं.

स्कॉटलंडमधले ते तीन दिवस मंत्रमुग्ध अवस्थेतच गेले. तिथले मोठेमोठे लोख्स. ‘लोख’ म्हणजे स्कॉटिश भाषेत ‘लेक’ इथले हे लोख म्हणजे सरोवरच आहेत. विस्तीर्ण. आसपासचा प्रदेश मोहिनी घालणारा. एका थोडय़ा उंचीवरच्या ठिकाणावरून दिसणारं क्षितिजापर्यंत पसरलेल्या टेकडय़ांचं आणि मधेमधे उमटलेल्या लोख्सचं दृश्य मला वाटतं मी कधीच विसरणार नाही.
अशा संमोहित अवस्थेतच स्कॉटलंडहून माघारी निघालो. पुन्हा केंडलला जाऊन भाडय़ाची गाडी परत केली. मनावरचं दडपण उतरलं. आता ट्रेनने परत लंडनला तिथून मायदेशी. आपल्या घरी. बारा-तेरा दिवसांची ही छोटीशी युरोपची सहल. मोजक्याच ठिकाणांची. फार दिवसांपासून मनात असलेली. ‘एकदा करायचिये..’ असं जिच्याविषयी म्हणत आलो ती.
सार्थक.. सफळ. संपूर्ण..

प्रसाद निक्ते
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य : लोकप्रभा