Weight Loss Best Option : आजकाल सोशल मीडिया आणि इंटरनेटवर वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स पाहायला मिळतात. कोणी फॅट बर्नर (Fat Burner) कमाल पर्याय असल्याचे सांगते, तर कोणी कीटो (Keto) किंवा लो-कार्ब डाएटला (Low-carb Diet) सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सागतात. अशा परिस्थितीत नक्की कोणावर विश्वास ठेवावा, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण होतो. दरम्यान, डॉ. स्पेन्सर नाडोल्स्की यांनी वजन कमी करण्याच्या विविध पद्धतींचे रँकिंग (रँक) करून त्यामागील परिणाम सांगितले आहेत.

डॉ. नाडोल्स्की यांच्या मते, वजन कमी करण्यात फॅट बर्नरची कोणतीही ठोस भूमिका नसते, म्हणूनच त्यांनी याला थेट ‘झिरो रेटिंग’ (० गुण) दिले आहे. यानंतर जेव्हा लो-कार्ब आणि कीटो डाएटचा विचार केला गेला, तेव्हा त्यांनी या दोन्ही पद्धतींना १० पैकी केवळ २ गुण दिले. याचा अर्थ असा की, हे डाएट काही लोकांना अगदी कमी काळासाठी फायदेशीर ठरू शकतात, परंतु दीर्घकाळासाठी त्यांचे पालन करणे सोपे नसते. अनेकदा लोक काही काळानंतर कंटाळतात आणि पुन्हा आपल्या जुन्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे वळतात.

सप्लीमेंट्स आणि फास्टेड कार्डिओ (रिकाम्या पोटी व्यायाम) किती प्रभावी?

डॉ. नाडोल्स्की यांच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रवासात सप्लीमेंट्सचा वाटा मर्यादित असतो. त्यांनी प्रोटीन पावडरला १० पैकी ४ गुण दिले आहेत, म्हणजेच हे पूर्णपणे निरुपयोगी नाही, परंतु याने कोणताही चमत्कारही घडत नाही. दुसरीकडे, ‘फास्टेड कार्डिओ’ म्हणजेच रिकाम्या पोटी व्यायाम करण्याला त्यांनी केवळ २ गुण दिले आहेत. याचा अर्थ असा की, रिकाम्या पोटी वर्कआउट केल्याने जास्त फायदा होतोच असे नाही, तर योग्य पद्धतीने आणि नियमित केलेला व्यायाम अधिक फायदेशीर ठरतो.

चालणे आणि वेट ट्रेनिंग हे उत्तम पर्याय का आहेत?

डॉ. नाडोल्स्की यांनी दररोज चालणे (Walking) आणि वेट ट्रेनिंग (Weight Training) या दोन्ही सवयींना १० पैकी ७ गुण दिले आहेत. त्यांच्या मते, या दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन रूटीन सहज समाविष्ट करू शकते. चालण्यामुळे केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. तर दुसरीकडे, वेट ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत होतात आणि मेटाबॉलिज्म (चयापचय क्रिया) सुधारते.

मेडिकल वेट लॉस ट्रीटमेंटवर सर्वाधिक विश्वास

डॉ. नाडोल्स्की यांनी मेडिकल वेट लॉस ट्रीटमेंटला (वैद्यकीय उपचार) १० पैकी १० पूर्ण गुण दिले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेतली जाणारी नवीन औषधे वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात. अर्थात, हे उपचार प्रत्येकासाठी नसतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

या विषयावर पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. जगदीश हिरेमठ सांगतात की, वजन घटवताना एखादी सवय दीर्घकाळ टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यांच्या मते, चालणे आणि वेट ट्रेनिंगसारख्या सवयी सोप्या असतात आणि वय किंवा फिटनेस पातळीचा विचार न करता कोणीही त्या सहज अवलंबू शकते. या सवयींमुळे मेटाबॉलिज्म सुधारते, स्नायू सुरक्षित राहतात आणि दिवसभर शरीरातील ऊर्जेचा वापर वाढतो.

कडक डाएट (Strict Diet) दीर्घकाळ का टिकत नाही?

डॉ. हिरेमठ यांनी स्पष्ट केले की, लो-कार्ब आणि कीटो सारखे डाएट्स सुरुवातीला वेगाने वजन कमी करू शकतात, परंतु दीर्घकाळ त्यांचे पालन करणे कठीण असते. अशा डाएटमुळे मानसिक थकवा वाढतो, शरीराचा मेटाबॉलिज्म मंदावू शकतो आणि काही वेळा लोक नंतर अधिक खाऊ लागतात. परिणामी, कमी झालेले वजन पुन्हा झपाट्याने वाढू लागते.

वजन कमी करण्यात सप्लीमेंट्सचे महत्त्व

तज्ज्ञांच्या मते, सप्लीमेंट्सना वजन कमी करण्याचे मुख्य साधन बनवू नये. बहुतेक फॅट बर्नर्सना कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नसतो. मात्र, ज्या लोकांना आहारातून पुरेसे प्रोटीन मिळत नाही, त्यांच्यासाठी प्रोटीन पावडर फायदेशीर ठरू शकते. याशिवाय शरीरात व्हिटॅमिन डी, आयर्न किंवा बी१२ ची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्स घेणे योग्य ठरते.

डॉ. हिरेमठ यांच्या मते, मेडिकल वेट लॉस ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची संपूर्ण आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. बीएमआय (BMI), मेटाबॉलिक हेल्थ, तसेच मधुमेह (Diabetes) किंवा रक्तदाब (BP) यांसारख्या आजारांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. हे वैद्यकीय उपचार तेव्हाच उत्तम काम करतात, जेव्हा त्याबरोबर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत योग्य बदल केले जातात.