Natural Constipation Remedies: बद्धकोष्ठतेचा त्रास आजकाल अनेकांना जाणवतो. अनियमित आहार, कमी पाणी पिणे, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे शौचास साफ न होणे, पोट फुगणे किंवा पोट जड वाटणे अशा समस्या उद्भवू शकतात. काही जणांना हा त्रास अधूनमधून होतो, तर काहींना दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो. अशावेळी घरगुती उपायांकडे अनेकांचा कल असतो.
अशाच एका घरगुती उपायाची सध्या चर्चा केली जाते. विशेष म्हणजे या उपायासाठी स्वयंपाकघरात किंवा घराच्या आसपास सहज आढळणाऱ्या एका पानाचा वापर केला जातो. हे पान केवळ धार्मिक किंवा पारंपरिक वापरापुरते मर्यादित नसून, त्याचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. मात्र, बद्धकोष्ठतेसाठी त्याचा वापर करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
बद्धकोष्ठतेसाठी पानाचा वापर कसा करतात?
काही पानं घेऊन ती बारीक करून रात्री पाण्यात भिजत ठेवण्याची पद्धत सांगितली जाते. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय एक ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये पान टाकून काही वेळ उकळले जाते. पाणी निम्मे झाल्यानंतर ते गाळून हळूहळू पिण्याची पद्धतही सांगितली जाते.
मात्र, हा घरगुती उपाय बद्धकोष्ठतेवर निश्चित उपचार करतो असे समजणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि बद्धकोष्ठतेचे कारण वेगळे असू शकते, त्यामुळे दीर्घकाळ बद्धकोष्ठता असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
आम्लपित्त आणि छातीत जळजळीसाठीही वापर?
जेवल्यानंतर छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे अशा समस्या अनेकांना होतात. पारंपरिक पद्धतीनुसार या त्रासासाठीही पान चावून खाण्याचा उल्लेख आढळतो. मात्र, त्यामध्ये चुना, सुपारी, तंबाखू किंवा गोड पदार्थ मिसळून खाणे आणि साधे पान खाणे यामध्ये मोठा फरक आहे. विशेषतः तंबाखू किंवा सुपारीयुक्त पान आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पण हे नेमकं कोणतं पान आहे?
आता या उपायामध्ये उल्लेख केलेले पान म्हणजे नागवेलीचे पान, विड्याचे पान. (Betal Leaf) यालाच सामान्यतः पानाचे पान किंवा नागवेल असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये नागवेलीच्या पानाला विशेष महत्त्व आहे. पूजा, धार्मिक विधी आणि विविध पारंपरिक प्रथांमध्ये त्याचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी जेवणानंतर पान खाण्याचीही परंपरा आहे.
नागवेलीच्या पानामध्ये विविध वनस्पतिजन्य घटक आढळतात. पारंपरिक वापरामध्ये त्याचा संबंध पचनाशी जोडला जातो. काही ठिकाणी या पानाचा उपयोग तोंडाची स्वच्छता, सुगंध आणि पचनासंबंधी पारंपरिक उपायांमध्ये केला जातो. मात्र, कोणत्याही आरोग्य समस्येवर नागवेलीचे पान हे वैद्यकीय उपचारांचा पर्याय आहे असे समजू नये.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी या गोष्टीही महत्त्वाच्या
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे, फळे-भाज्या, कडधान्ये आणि इतर तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि शौचाची इच्छा झाल्यावर ती वारंवार दाबून न ठेवणे महत्त्वाचे आहे. आहार आणि जीवनशैलीत बदल करूनही त्रास कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप: या लेखात सांगितलेली माहिती पारंपरिक वापर आणि उपलब्ध माहितीनुसार दिली आहे. नागवेलीचे पान बद्धकोष्ठतेवर निश्चित उपचार करते किंवा पोटातील सर्व घाण बाहेर काढते, असा दावा वैद्यकीयदृष्ट्या समजू नये. दीर्घकाळ बद्धकोष्ठता, तीव्र पोटदुखी, रक्तस्राव, उलट्या किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे असल्यास स्वतःहून उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणताही घरगुती उपाय, आहार किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
