वाढते वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या आहे. वजन कमी करण्याबरोबरच अनेकजण निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात. कधी डाएट करतात तर कधी व्यायाम काटेकोरपणे पाळतात. वजन कमी करण्याच्या प्रवासात ‘चीट डे’ हा शब्द अनेकांसाठी मानसिक दिलासा असतो. अनेकजण चीट डे म्हटलं की, आवडत्या गोष्टींवर ताव मारतात पण असे न करता उलट त्या दिवशीही काय खायचे याचा विचार महत्त्वाचा ठरतो अन्यथा तुमच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरू शकते. अनेकजण चीट डेला विशेषतः रस्त्यावरची चटपटीत चाट खातात. पण वजन कमी करताना आपल्या आरोग्यासाठी कोणता चाट फायदेशीर आहे याचा विचार कोणीच करत नाही. म्हणूनच वजन कमी करताना भेळपुरी किंवा शेवपुरी पैकी कोणता पर्याय योग्य आहे हे समजून घेऊ या.
भेळपुरी किंवा शेवपुरी दोन्हींचा आंबट-गोड-तिखट संगम जिभेला मोहवतो; मात्र वजन काट्यावरचा आकडा लक्षात ठेवायचा असेल तर निवड विचारपूर्वक करावी लागते. पोषणतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील (संस्थापक आणि सीईओ, Nutracy Lifestyle) यांच्या मते, दिसायला हलक्या वाटणाऱ्या या दोन्ही चाटांच्या पोषणमूल्यांमध्ये मूलभूत फरक आहे.
भेळपुरीची रचना आणि कॅलरी गणित (Nutritional Profile of Bhelpuri)
भेळपुरीचा पाया असतो मुरमुरे — कुरकुरीत, कमी फॅट आणि तुलनेने कमी कॅलरी असलेले. नियंत्रित प्रमाणात चटणी आणि थोडेसे फरसाण घातल्यास १००–१२० ग्रॅमच्या एका सर्व्हिंगमध्ये साधारण १५० ते २२० कॅलरी येतात.
मुरमुरे स्वतः अत्यल्प कॅलरीचे — साधारण एका टेबलस्पूनमध्ये २०–२५ कॅलरी. त्यात काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यांसारख्या कच्च्या भाज्या फायबर आणि व्हॉल्युम वाढवतात. त्यामुळे पोटभरते आणि अति खाण्याची शक्यता कमी होते.
पण, गोड चटणीचे जास्त प्रमाण, शेंगदाणे, जास्त फरसाण किंवा तेलाचा वापर वाढला तर हीच भेळपुरी पटकन भरपूर कॅलयुक्त(Calorie-dense) बनू शकते. “चटण्या माफक आणि तेल कमी ठेवले तर भेळपुरी २०० कॅलरींच्या आत राहू शकते,” असे डॉ. पाटील स्पष्ट करतात.
शेवपुरीची ‘कॅलरी पर्सनॅलिटी’ (Calorie Density of Sevpuri)
शेवपुरीची बेसिक रचना वेगळी आहे. प्रत्येक पुरी ही डीप-फ्राय केलेल्या पापडीवर आधारित असते. त्यावर नायलॉन शेवचे भरभरून सजावट आणि इथेच कॅलरी वाढीचा मुख्य मुद्दा दडलेला आहे
.
डॉ. पाटील सांगतात, “फक्त एक मूठ शेव ७०–१०० कॅलरी वाढवू शकते.” साधारण एका प्लेटमध्ये २५०–३५० कॅलरी सहज जातात. बेसनापासून बनवलेली आणि तळलेली शेव भरपूर फॅटयुक्त असते; त्यामुळे संतृप्त फॅट (Saturated fat) आणि सोडियमचे प्रमाणही जास्त होते. पापडी + शेव या संयोजनामुळे शेवपुरी अधिक फॅटी, सोडियम-समृद्ध आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सने भरलेली ठरते. चवदार असली तरी पोषणदृष्ट्या ती ‘जड’ पर्याय मानला जातो.
ग्लायसेमिक लोड आणि तृप्ती (Glycemic Load & Satiety Factor)
भेळपुरीत मुरमुरे आणि भाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने फायबर तुलनेने अधिक मिळते. लिंबाचा रस आणि माफक चटणी वापरल्यास तिचा ग्लायसेमिक लोड तुलनेने कमी राहू शकतो. त्यामुळे रक्तातील साखरेत अचानक वाढ होण्याची शक्यता कमी होते.
शेवपुरी मात्र तळलेली असल्याने आणि जास्त शेवमुळे अधिक ग्लायसेमिक आणि भरपूर फॅट युक्त असते.
चीट डेवर किती खावे? (Portion Control on Cheat Day)
चीट डे म्हणजे बेफाम खाणे नव्हे, तर नियंत्रित आनंद. भेळपुरीसाठी एक स्ट्रीट-स्टाइल प्लेट, अंदाजे १ ते १.५ कप, पुरेशी मानली जाते. फरसाण कमी, भाज्या जास्त आणि हलकी चटणी हा उत्तम पर्याय.
शेवपुरीची निवड केल्यास ८–१० पुरीऐवजी ४–६ पुरींवर थांबावे. शेव कमी घालण्याची विनंती करावी.
निष्कर्ष (The Bottom Line)
वजन कमी करण्याच्या प्रवासात चाट खाण्याची इच्छा झाल्यास भेळपुरी तुलनेने सुरक्षित पर्याय आहे. ती हलकी, कमी कॅलरी-घन आणि अधिक तृप्त करणारी ठरू शकते. शेवपुरी चविष्ट असली तरी फॅट, सोडियम आणि रिफाइंड कार्ब्समुळे ती पोषणदृष्ट्या जड आहे.
चीट डे हा मानसिक ताजेपणासाठी असतो; मात्र त्यातही मोजमाप आणि समतोल आवश्यक आहे. कोणतेही आहारबदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
टीप: ही माहिती सार्वजनिक स्रोत आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणताही आहार किंवा दिनचर्या सुरू करण्यापूर्वी आपल्या आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

