संशोधकांनी पर्यावरणपूरक, पुन्हा वापरता येण्याजोगा बायोसेन्सर विकसित केला असून, तो रक्ताच्या नमुन्यामधून डेंग्यूचा विषाणू अतिशय जलदपणे ओळखू शकतो.

अतिशय कमी किंमत असलेल्या कागद आधारित चाचणीमुळे पहिल्या टप्प्यामध्येच जीवघेण्या आजाराचे निदान होणे शक्य झाले आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डेंग्यू मोठय़ा प्रमाणावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०१५ मध्ये ९९ हजार ९१३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यापैकी २२० जणांचा देशभरात मृत्यू झाला.

डेंग्यू ताप हा अधिक तीव्रतेचा असतो. तो लहान मुले, तरुण यांच्यामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अगदी मृत्यू येण्याचीही शक्यता जास्त असते. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे डेंग्यूचा विषाणू प्रसारित होतो. डास चावल्यानंतर पाच ते सहा दिवासांमध्ये या आजाराची लक्षणे दिसू शकतात.

नोयडातील अमिटी विद्यापीठ आणि हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून बायोसेन्सर तयार करण्यात आला आहे. यामध्ये आणखी संशोधन सुरू असल्याचे, संशोधकांनी सांगितले.

डेंग्यू हा सर्वात वेगाने वाढणारा आजार आहे. दरवर्षी ४०० दशलक्ष रुग्णांना याची लागण होते. मागील ५० वर्षांमध्ये डेंग्यूचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. हे संशोधन बायोसेन्सर आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.