Bird Flu Threat Resurfaces in Bihar : बिहारमध्ये बर्ड फ्लूचा धोका पुन्हा डोकेवर काढताना दिसत आहे. पटना येथील पोल्ट्री फार्ममध्ये संसर्गाची प्रकरणे वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. बुधवारी खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे सहा हजार पोल्ट्री पक्ष्यांना ठार करून जमिनीत पुरण्यात आले. यंदा प्रथमच अत्यंत संसर्गजन्य मानला जाणारा एव्हियन इन्फ्लुएंझा H5N1 हा विषाणू कावळ्यांकडून पोल्ट्री पक्ष्यांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या डेअरी, मत्स्य व पशुसंसाधन विभागाचे सचिव शिर्सत कपिल अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात H5N1 मुळे ३६६ कावळ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यात दरभंगा येथे २००, भागलपूर येथे ७०, कटिहार येथे ६२, पटना येथे २२ आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथे १२ मृत्यूंची नोंद झाली आहे. १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान पटना व भागलपूर परिसरात आणखी ६८ कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी नव्या नमुन्यांची तपासणीसाठी कोलकात्यातील प्रादेशिक रोग निदान प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे.
H5N1 म्हणजे काय? (What is H5N1?)
बर्ड फ्लू, ज्याला शास्त्रीय भाषेत एव्हियन इन्फ्लुएंझा H5N1 असे म्हटले जाते, हा पक्ष्यांमध्ये आढळणारा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. कावळे, बदके, कोंबड्या यांसारख्या पक्ष्यांमध्ये तो प्रामुख्याने आढळतो. काही वेळा विषाणूमध्ये जनुकीय बदल (mutation) होऊन तो मानवांनाही बाधित करू शकतो. अशा परिस्थितीत श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
संसर्ग कसा पसरतो? (Mode of Transmission)
एव्हियन इन्फ्लुएंझा संसर्गित पक्ष्यांच्या थेट संपर्कातून पसरतो. जंगली किंवा पाळीव पक्ष्यांच्या मल, लाळ, नाकातील स्राव तसेच दूषित पाणी किंवा खाद्य यांद्वारे विषाणूचा प्रसार होतो. स्थलांतरित (migratory) पक्षी हे या विषाणूचे प्रमुख वाहक मानले जातात. ते दीर्घ अंतर प्रवास करत असल्याने विविध प्रदेशांत संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये प्रादुर्भावाची शक्यता तीव्र होते.
मानवांमध्ये संसर्गाची शक्यता (Can H5N1 Infect Humans?)
H5N1 संसर्ग मानवांमध्ये होऊ शकतो; मात्र तो तुलनेने दुर्मीळ आहे. संसर्गित पक्ष्यांच्या जवळचा संपर्क, त्यांच्या मलमूत्र किंवा स्रावांच्या संपर्कातून मानवांना बाधा होऊ शकते. पोल्ट्री फार्ममध्ये काम करताना दूषित पृष्ठभागांच्या माध्यमातूनही विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. तथापि, मानव ते मानव असा प्रसार सहज होत नाही, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
लक्षणे कोणती? (Symptoms in Humans)
मानवांमध्ये संसर्ग झाल्यास उच्च ताप येऊ शकतो. खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये निमोनियासारखी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. उपचार उशिरा मिळाल्यास जीवितास धोका संभवतो.
प्रतिबंधात्मक उपाय (Prevention and Control)
संसर्गित किंवा मृत पक्ष्यांच्या संपर्कापासून दूर राहणे आवश्यक आहे. पोल्ट्री फार्ममध्ये काम करताना मास्क, हातमोजे यांसारखी संरक्षक साधने वापरणे बंधनकारक आहे. कोंबडीचे मांस व अंडी पूर्णपणे शिजवूनच सेवन करावे. वैयक्तिक स्वच्छतेकडे, विशेषतः हात धुण्याकडे, काटेकोर लक्ष द्यावे.
आरोग्य विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

