फॅशन असो किंवा फिटनेस, बॉलिवूड स्टार्स वेगवेगळ्या ट्रेंड्सचं प्रयोग करण्यापासून कधीही मागे हटत नाहीत. पिलेट्सपासून केटो डाएटपर्यंत सर्व फिटनेस ट्रेंड्सना लोकप्रिय करण्याचं सर्वात जास्त श्रेय सेलिब्रिटींना जातं. सेलिब्रिटींनी आणलेल्या याच फॅन्सी ट्रेंड्सच्या लांबलचक यादीत काळ्या अल्कलाईन पाण्याची (Black Alkaline Water) आणखी एक भर पडली आहे. या नव्या ट्रेंडमुळे चाहते देखील चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मलिका अरोरा, श्रुती हसन, उर्वशी रौतेला यांच्यासह अगदी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नियमितपणे हे काळं अल्कलाईन पाणी पितात. असं म्हटलं जातं कि या काळ्या पाण्यामुळे आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक लाभ मिळतात. तर जाणून घेऊया कि हे काळं अल्कलाईन पाणी अर्थात ब्लॅक अल्कलाईन वॉटर म्हणजे नेमकं काय? आणि ते सेलिब्रिटीजच्या इतकं पसंतीस का उतरत आहे?

पाणी ही आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कि, आपलं शरीर ६० टक्के पाण्याने बनलेले आहे. म्हणूनच शरीरातील अंतर्गत यंत्रणा व्यवस्थित कार्यरत ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी पिणं महत्वाचं आहे. पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, शरीराचं तापमान योग्य राखण्यासाठी, विविध अवयवांमध्ये खनिजांची वाहतूक करण्यास आणि आपण सेवन करत असलेलं अन्न पचवण्यास मदत करतो. मात्र, या सगळ्याव्यतिरिक्त काळं पाणी आपल्याला आणखी काही आरोग्यदायी फायदे मिळवून देतं.

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
water shortage news
बंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाखोंचा दंड!

काळ्या पाण्याचा एकमेव विक्रेता काय म्हणतो?

काळं पाणी पिण्यास सुरुवात केल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होत असल्याचं सांगितलं जात आहे. भारतातील काळ्या अल्कलाईन पाण्याचा एकमेव विक्रेता असा दावा करतो की, “साध्या पाण्यात शरीरासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी अनेक आवश्यक खनिजं नसतात. साध्या आरओ पाण्याचं पीएच मूल्य कमी असतं. क्षारीय पाण्यासारखे गुणधर्म साध्या पाण्यात नसतात. म्हणूनच, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉलने ग्रस्त असलेल्या सर्वांसाठी हे काळं अल्कलाईन पाणीच अधिक पोषक आणि समृद्ध ठरतं.”

काळ्या पाण्याचं काही आरोग्यदायी फायदे

  • हायड्रेशन : अल्कलाईन पेयातील पाण्याचे रेणू लहान असल्याने ते आपल्या शरीरातील पेशींद्वारे अधिक सहजपणे शोषले जातात आणि साध्या पाण्यापेक्षा जास्त हायड्रेटिंग असतात. हे आपले स्नायू, सांधे आणि मूत्रपिंडांचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
  • अ‍ॅसिडिटी कमी होते : अल्कलाईन पाणी घेतल्याने अ‍ॅसिडिटी कमी होण्यास आणि शरीराच्या पीएच पातळीचे संतुलन राखण्यास मदत होते. हे अवयवांनी तयार केलेले जास्तीच अ‍ॅसिड न्यूट्रल करण्यास मदत करते.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवते : अल्कलाईन पाणी आपल्या पाचन आरोग्यासाठी देखील चमत्कारिकरीत्या काम करतं. आपण खात असलेल्या अन्नपदार्थातून पोषकद्रव्यं शोषण्यास मदत करतं. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • चयापचय वाढवते : जेव्हा तुमची पचनसंस्था व्यवस्थित कार्य करतं तेव्हा तुमचं चयापचय अर्थात मेटॅबॉलिझम देखील सुधारतं. हे आपल्याला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करतं आणि आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवतं.
  • वृद्धत्वविरोधी (अँटीएजिंग) गुणधर्म : अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांमध्ये समृद्ध असलेलं अल्कलाईन पेय आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स  कमी करतं असं मानलं जातं. ह्यात अँटीएजिंग गुणधर्म असून आपली त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारू शकतं.

कोणत्याही अन्न किंवा पेयाचं पीएच लेव्हल ते किती अल्कलाईन किंवा क्षारीय आहे हे समजण्यास मदत करतं. ० ते १४ च्या प्रमाणात सामान्य पिण्याच्या पाण्याचा पीएच ६ ते ७ दरम्यान असतो. हा पीच तटस्थ मानला जातो. परंतु क्षारीय पेयाचा पीएच साधारणपणे ७ च्या वर असतो. याचाच अर्थ ते साध्या पाण्यापेक्षा जास्त क्षारीय असतात. याशिवाय, काळ्या पाण्यात ७० पेक्षा जास्त समृद्ध खनिजं असतात. ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य लाभ मिळत असल्याचं सांगितलं जातं.

अद्याप पुरेसं संशोधन नाही

काळ्या अल्कलाईन पाणी पिणं हा फिटनेसप्रेमींमध्ये अगदी नवाकोरा ट्रेंड आहे. मात्र, तज्ञ अद्याप त्याचे आरोग्य फायदे आणि दीर्घकालीन वापराबद्दल अनिश्चित आहेत. अनेक संशोधकांच्या मते, या पाण्याचा विक्रेत्याने केलेल्या अनेक आरोग्यदायी दाव्यांना समर्थन देण्यासाठी त्यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही. केवळ काही अभ्यास सुचवतात की, अल्कलाईन पाणी काही विशिष्ट परिस्थितींसाठी उपयुक्त असू शकतं. मात्र, या प्रकारच्या पाण्याच्या वापरावर क्षेत्रातील तज्ञांचं मतं अजूनही वेगवेगळी आहे.

पुराव्यांच्या अभावामुळे हे काळं अल्कलाईन पाणी पिणं सुरक्षित आहे की नाही सांगणं कठीण आहे. दरम्यान, काही लोकांना हे पाणी प्यायल्यानंतर दुष्परिणाम देखील जाणवू शकतात. शरीरात अल्कलाईन जास्त झाल्यास खालील आरोग्य समस्या उद्भवू शकतात:

१) गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या
२) त्वचेची जळजळ
३) मळमळ
४) उलट्या होणं
५) स्नायू थरथरणं
६) अंग किंवा चेहऱ्यावर मुंग्या येणं