Black Plastic Food Containers Health Risks : कामाची गडबड आणि वेळ कमी पडत नसल्यामुळे अनेकदा लोक ऑनलाइन जेवण मागवतात. पण, तुम्ही कधी पाहिलं आहे का की, ऑर्डर केलेलं जेवण मग तुमचा आवडीचा पास्ता, असो, बिर्याणी असो किंवा नूडल्स हे सर्व काळ्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पॅक करून दिले जाते. जर तुम्ही हे डबे चांगले, स्वच्छ समजत असाल, तर थांबा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे काळे डबे तुमच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात. चला जाणून घेऊया की, या डब्यांमध्ये असं काय असतं, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
बहुतेक लोकांना वाटते की, काळ्या रंगामुळे खाद्यपदार्थांमधील मसाले किंवा तेल दिसत नाही म्हणून हे डबे वापरले जातात. तसेच हे डबे दिसायलाही चांगले दिसतात; पण खरं कारण त्यामधील रसायन आहे.
रिसायकल्ड कचऱ्याचा वापर
प्लास्टिकच्या जगात जुने आणि खराब झालेले प्लास्टिक लपविण्यासाठी अनेकदा काळ्या रंगाचा वापर केला जातो. कधी कधी हे कंटेनर इलेक्ट्रॉनिक कचरा जसे की कॉम्प्युटर कीबोर्ड किंवा टीव्हीची बॉडी वितळवून बनवले जातात.
रसायन
या कंटेनरमध्ये फ्लेम रिटार्डंट नावाच्या धोकादायक रसायनांचा वापर केला जातो. ही तीच रसायनं आहेत, जी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आग लागण्यापासून रोखण्यासाठी वापरली जातात. जेव्हा तुम्ही त्या डब्ब्यात गरम अन्न ठेवता, तेव्हा ही रसायनं अन्नामध्ये विरघळतात.
मायक्रोप्लास्टिक्स
गरम अन्नाच्या संपर्कात आल्याबरोबर प्लास्टिकचे लहान कण (मायक्रोप्लास्टिक्स) विघटित होऊ लागतात आणि तुमच्या पोटात जातात.
काळ्या डब्यातील अन्नपदार्थ आरोग्यासाठी किती हानिकारक असतात?
१) हार्मोनल असंतुलन – ही रसायनं शरीरात प्रवेश केल्यावर तुमच्या हार्मोन्समध्ये असंतुलितपणा येऊ शकतो. त्यामुळे थायरॉईडच्या समस्या, वंध्यत्व आणि मुलांची वाढ खुंटणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात.
२) कर्करोग- या रसायनांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
या धोक्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे?
१) स्टील किंवा ग्लासचा वापर – प्लास्टिकच्या काळ्या डब्यातून तुमचं ऑनलाइन फूड आलं असेल, तर ते घरी तुमच्या ताब्यात मिळाल्याबरोबर ताबडतोब डब्यातून बाहेर काढून स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात ठेवा.
२) रेस्टॉरंटला सूचना द्या – ऑर्डर देताना तुम्ही रेस्टॉरंटला जेवण कागदी पिशवीत किंवा सिल्व्हर फॉइल लावलेल्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये पॅक करण्याची विनंती करू शकता.
३) डबे पुन्हा वापरू नका – बरेच लोक हे काळे डबे धुतात आणि नंतर फ्रिजमध्ये स्वयंपाकघरातील वस्तू किंवा भाज्या ठेवण्यासाठी वापरतात. पण असे न करता, ते ताबडतोब कचरापेटीत टाकणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते.
