Black vs White Sesame Seeds Benefits: तीळ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते तिळाचे लाडू, चिक्की आणि गुळाची वडी! चवीला स्वादिष्ट असणारे तीळ आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर मानले जातात. मात्र बाजारात पांढरे आणि काळे असे दोन प्रकारचे तीळ मिळतात. मग प्रश्न असा की, आरोग्यासाठी नेमके कोणते तीळ जास्त फायदेशीर आहेत? पांढरे की काळे? दोन्ही तिळांमध्ये पोषक घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया कोणत्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला काय फायदे मिळू शकतात.

पांढरे तीळ खाण्याचे फायदे काय?

तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या तिळांवरील बाहेरील आवरण काढलेले असते. त्यामुळे त्यातील काही खनिजांचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र, त्यातील कॅल्शियम शरीराला उपलब्ध होण्याचे प्रमाण तुलनेने वाढू शकते. पांढऱ्या तिळांमध्ये हेल्दी फॅट्स आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात.

पांढरे तीळ खाण्याचे फायदे :

  • हाडांसाठी फायदेशीर : पांढऱ्या तिळांमधील कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
  • महिलांच्या आरोग्यासाठी मदत : वयाच्या चाळिशीनंतर आणि मेनोपॉजच्या आसपास होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या काळात संतुलित आहाराचा भाग म्हणून पांढऱ्या तिळांचा समावेश करता येतो.
  • त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त : यामधील हेल्दी फॅट्स त्वचेचे नैसर्गिक संरक्षणात्मक आवरण निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.
  • सांध्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर : आवश्यक पोषक घटकांमुळे सांध्यांच्या आरोग्याला आधार मिळू शकतो.
  • कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यास मदत : लहान मुले आणि मोठ्यांच्या आहारात पांढऱ्या तिळांचा समावेश करता येतो.

पांढरे तीळ कसे खावेत?

पांढरे तीळ रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येतात. तिळाची चटणी, लाडू, सलाड किंवा ताहिनीच्या स्वरूपात त्यांचे सेवन करू शकता. मात्र, तिळांमुळे कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे भरून निघेल, असे नाही. त्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे.

काळे तीळ खाण्याचे फायदे काय?

काळ्या तिळांवरील बाहेरील आवरण काढलेले नसते. त्यामुळे त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, लोह, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. पांढऱ्या तिळांच्या तुलनेत काळ्या तिळांमध्ये काही खनिजे अधिक प्रमाणात आढळू शकतात. मात्र, त्यांचे पचन काही लोकांना तुलनेने जड जाऊ शकते.

काळे तीळ खाण्याचे फायदे :

  • हिमोग्लोबिनसाठी उपयुक्त : काळ्या तिळांमधील लोह शरीरातील हिमोग्लोबिन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी मदत करू शकते.
  • केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर : यामधील लोह, झिंक आणि इतर पोषक घटक केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण देण्यास मदत करतात.
  • थकवा कमी करण्यास मदत : लोह आणि मॅग्नेशियमसारखे घटक शरीराच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहेत.
  • अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत : काळ्या तिळांमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
  • पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यास मदत : विशेषतः आहारातून पुरेसे लोह आणि खनिजे न मिळणाऱ्या महिलांसाठी काळ्या तिळांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.

पांढरे की काळे तीळ, कोणते खाणे जास्त फायदेशीर?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दोघांपैकी नेमके कोणते तीळ खावेत? याचे उत्तर तुमच्या शरीराची गरज आणि आहारातील पोषक घटकांवर अवलंबून आहे.

  • कॅल्शियम आणि हाडांचे आरोग्य : यासाठी पांढऱ्या तिळांचा आहारात समावेश करू शकता.
  • लोह आणि अँटिऑक्सिडंट्स : यासाठी काळे तीळ चांगला पर्याय ठरू शकतात.
  • केसांचे आरोग्य : काळ्या तिळांमधील लोह आणि झिंकसारखे घटक उपयुक्त ठरतात.
  • सर्वांगीण आरोग्य : दोन्ही प्रकारच्या तिळांचे आलटून-पालटून सेवन करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.

मात्र, केवळ तीळ खाल्ल्याने थायरॉइडचा त्रास, केसगळती, पीसीओएस किंवा हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते, असे समजू नये. या समस्यांसाठी योग्य तपासणी आणि उपचार महत्त्वाचे आहेत.

रोज किती तीळ खावेत?

न्यूट्रिशनिस्टच्या माहितीनुसार, रोजच्या आहारात १ ते २ चमचे तिळांचा समावेश करता येतो. तिळाची चटणी, भाजलेल्या तिळांचा वापर, सलाड किंवा लाडू अशा वेगवेगळ्या स्वरूपात ते खाऊ शकता. तीळ पौष्टिक असले तरी त्यामध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाणही असते. त्यामुळे प्रमाणातच सेवन करणे महत्त्वाचे आहे. तसेच तिळांची अॅलर्जी असणाऱ्यांनी त्यांचे सेवन टाळावे.

पांढरे आणि काळे दोन्ही तीळ आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे एकाच प्रकारच्या तिळांवर अवलंबून न राहता आपल्या आहाराच्या गरजेनुसार दोन्हींचा समावेश करा.