Which Blood Group has High Heart Attack Risk: कधी तुम्ही असा विचार केला आहे का की तुमचा रक्तगटही तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो? आतापर्यंत आपण हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) हा वाढतं वय, लठ्ठपणा, ताणतणाव किंवा चुकीच्या आहारामुळे येतो असंच मानत आलो. पण, आता समोर येणाऱ्या संशोधनातून एक नवं वास्तव उघड होत आहे, तुमचा रक्तगटसुद्धा या धोक्याला कारणीभूत ठरू शकतो!
अलीकडील काही मोठ्या अभ्यासांमध्ये असे संकेत मिळाले आहेत की, विशिष्ट रक्तगट असणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि रक्ताच्या गाठी (थ्रोम्बोसिस) होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असतो, त्यामुळेच ही बाब केवळ माहितीपुरती न राहता, प्रत्येकाने गंभीरतेने घेण्यासारखी ठरते.
संशोधन काय सांगतं?
अमेरिकेतील एका प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात सुमारे ४ लाख लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असे दिसून आले की, काही विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता साधारण ८ टक्क्यांनी अधिक असते.
याशिवाय, २०१७ मध्ये युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या आणखी एका मोठ्या संशोधनात तब्बल १३.६ लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासातही असेच निष्कर्ष समोर आले की, काही रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जवळपास ९ टक्क्यांनी जास्त असतो.
पण इथेच गोष्ट संपत नाही…
रक्ताच्या गाठी-धोक्याचं मोठं कारण
या अभ्यासांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. काही लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका जास्त असतो. या गाठी जेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये तयार होतात, तेव्हा त्या रक्तप्रवाह अडवतात. परिणामी, हृदयाला आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि याच क्षणी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
यामागचं कारण म्हणजे, “व्हॉन विलिब्रँड फॅक्टर (VWF)” नावाचं एक प्रथिनं. हे प्रथिनं रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतं. पण, काही लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तर रक्ताच्या गाठी निर्माण होण्याची शक्यता वाढते.
संशोधनानुसार, काही विशिष्ट रक्तगट असणाऱ्या व्यक्तींमध्ये या प्रथिनांचं प्रमाण अधिक असल्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका तब्बल ४४ टक्क्यांनी वाढतो! ही बाब अत्यंत गंभीर मानली जाते.
उपचार आणि तपासणीत बदल होणार?
तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात हृदयविकाराचा धोका ओळखताना केवळ वय, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब किंवा जीवनशैली याच घटकांचा विचार न करता रक्तगटाचाही विचार केला जाऊ शकतो.
आतापर्यंत डॉक्टर हृदयविकाराचा धोका मोजताना पारंपरिक घटकांवर भर देत होते, पण आता वैज्ञानिकांचे मत आहे की, काही विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांमध्ये सूज वाढवणारे प्रथिने आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे भविष्यात वैयक्तिक उपचार पद्धती (personalized treatment) तयार करताना रक्तगट हा महत्त्वाचा घटक ठरू शकतो.
मग नेमकं कोणत्या रक्तगटाला जास्त धोका?
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल हा धोका नेमका कोणत्या रक्तगटासाठी आहे?
तर संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की, O रक्तगट वगळता इतर सर्व रक्तगटांमध्ये (A, B आणि AB) हृदयविकाराचा झटका आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका तुलनेने अधिक आढळतो.
विशेषतः:
B रक्तगट असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक (सुमारे १५%)
A रक्तगट असणाऱ्यांमध्ये हृदय निकामी होण्याचा धोका अधिक (सुमारे ११%)
मग काय कराल?
जर तुमचा रक्तगट A, B किंवा AB असेल, तर घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे.
- नियमित व्यायाम करा
- संतुलित आहार घ्या
- ताणतणाव टाळा
- वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या
थोडक्यात…
तुमचा रक्तगट हा केवळ ओळख नसून, तुमच्या आरोग्याशी निगडित एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. संशोधनातून मिळालेली ही माहिती आपल्याला सावध करते, वेळेत काळजी घेतली, तर मोठा धोका टाळता येऊ शकतो.
आता प्रश्न तुमच्यासमोर आहे, तुमचा रक्तगट कोणता आहे? आणि तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेत आहात का?
