High Blood Pressure Warning Signs: आजच्या काळात उत्तम आरोग्य ही एका मोठ्या खजिन्यापेक्षा कमी नाही. लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही सवयी अंगीकारल्या आहेत, ज्यामुळे शरीराच्या आत गंभीर आजार बळावू शकतात. या संदर्भात रक्तदाबाच्या समस्या ही एक मोठी चिंतेची बाब असून, भारतात त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. लोक अनेकदा रक्तदाबाच्या समस्यांकडे किरकोळ आरोग्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात; परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) यांसारख्या गंभीर गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो, जे देशातील मृत व्यक्तींची संख्या एक प्रमुख कारण आहे. मात्र, जर लक्षणे वेळेत समजली आणि योग्य पावले उचलली गेली, तर परिस्थिती नियंत्रणात आणता येते आणि गंभीर अवस्थेवर बऱ्याच अंशी मात करता येते.
रक्तदाब म्हणजे काय आणि सामान्य रक्तदाब कशाला मानले जाते?
रक्तवाहिन्यांमधून (धमन्यांमधून) रक्तप्रवाह सुरू असताना ते रक्त वाहिन्यांच्या भिंतींवर जो दाब निर्माण करते, त्याला ‘रक्तदाब’ म्हणतात. हा दाब सिस्टोलिक (वरचा आकडा) आणि डायस्टोलिक (खालचा आकडा) अशा दोन प्रकारे मोजला जातो. साधारणपणे १२०/८० mmHg इतकी पातळी (रीडिंग) आरोग्यदायी मानली जाते. मात्र, १४०/९० mmHg किंवा त्यापेक्षा जास्त पातळी सातत्याने आढळल्यास त्याला ‘उच्च रक्तदाब’ (हाय ब्लडप्रेशर) मानले जाते. त्यामुळे कालांतराने हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडांचे (किडनीचे) नुकसान होऊ शकते. रक्तदाब १८०/१२० mmHg किंवा त्यापेक्षा जास्त असणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. विशेषतः जर त्यासोबत छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा किंवा अंधुक दिसणे यांसारखी लक्षणे असतील, तर अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाबाची लक्षणे कोणती ?
उच्च रक्तदाबाच्या वेळी शरीरात अशी काही लक्षणे दिसून येऊ शकतात, ज्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामध्ये…
- अचानक तीव्र डोकेदुखी
- श्वास घेण्यास त्रास होणे
- पोटात, छातीत किंवा पाठीत अचानक तीव्र वेदना होणे
- बधीरपणा किंवा अशक्तपणा जाणवणे
- दृष्टीत अचानक बदल होणे
- बोलण्यास त्रास होणे
जर तुम्हाला वर नमूद केलेली कोणतीही लक्षणे आढळली, तर घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. कारण- थोड्याशा निष्काळजीपणामुळेही गंभीर परिणाम होऊ शकतात.
उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक?
NHLBI ने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाच्या शरीरात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि संभाव्यतः त्याचा मृत्यूदेखील ओढवू शकतो.
- पक्षघात (स्ट्रोक)
- दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
- डोळ्यांचे नुकसान
- हृदयविकाराचा झटका
- हृदय निकामी होणे
- एथेरोस्क्लेरोसिस (धमन्यांमध्ये ‘प्लाक’ किंवा चरबीयुक्त पदार्थांचा साठा होणे)
- व्हॅस्क्युलर डिमेन्शिया (मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा त्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे उद्भवणारी स्थिती)
तुम्ही तंदुरुस्त कसे राहू शकता?
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास टाळायचा असेल आणि तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारावी लागेल. हृदयासाठी आरोग्यदायी आहार निवडा आणि मद्यपान करणे थांबवा. दररोज व्यायाम करा, धूम्रपानाची सवय कमी करा, पुरेशी झोप घ्या आणि नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करा. या आरोग्यदायी सवयींचा अवलंब केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल.
.
