मधुमेह हा एक दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे हे एक मोठे आव्हान असते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेकदा उपाशीपोटी साखरेची पातळी वाढलेली आढळते, ज्यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात. पहाटे ३ ते सकाळी ८ च्या दरम्यान, शरीर कॉर्टिसोल, ग्रोथ हार्मोन आणि ग्लुकागॉन यांसारखे अधिक हार्मोन्स स्रवते. हे हार्मोन्स शरीराला जागे होण्यासाठी तयार करतात; पण त्याचबरोबर यकृतामधून ग्लुकोजचे उत्सर्जनही वाढवू शकतात. रात्री औषधांचा किंवा इन्सुलिनचा प्रभाव कमी होणे, रात्री उशिरा उच्च कार्बोहायड्रेटयुक्त जेवण करणे, झोपेचा अभाव व तणाव यांमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेकदा सकाळी साखरेची पातळी वाढलेली आढळते. अशा परिस्थितीत, दिवसाची सुरुवात चुकीच्या आहाराने केल्यास रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होऊ शकते. मधुमेह तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांच्या मते, दिवसभर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळची सुरुवात योग्य आहाराने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरुवात चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पेयांनी केल्यास रक्तातील साखरेत अचानक वाढ होऊ शकते.

प्रमाणित मधुमेह काळजी आणि शिक्षण विशेषज्ञ व नोंदणीकृत आहारतज्ज्ञ कॅरोलिन थॉमसन यांनी ‘इटिंग वेल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात स्पष्ट केले आहे की, जर मधुमेहींनी त्यांच्या दिवसाची सुरुवात एका मोठ्या ग्लास आइस्ड कॉफी किंवा स्मूदीने केली, तर दिवसाच्या या पहिल्या पेयाचा त्यांच्या रक्तातील साखरेवर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम होऊ शकतो. सकाळच्या अनेक पेयांमध्ये कर्बोदके आणि अतिरिक्त साखर असते, जी लवकर शोषली जाते. त्याच वेळी त्यांमध्ये प्रथिने आणि फायबर यांसारख्या पोषक तत्त्वांची कमतरता असते, जी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. आहारतज्ज्ञ कॅरोलिन यांनी स्पष्ट केले की, जर मधुमेहींनी सकाळी योग्य त्या आरोग्यदायी पेयांचे सेवन केले, तर इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. चला तर मग, अशा चार पेयांबद्दल जाणून घेऊया आणि आहारतज्ज्ञांकडून समजून घेऊया की, ती शरीरावर कशी कार्य करतात.

दिवसाची सुरुवात पाण्याने करा

पाणी साधे वाटू शकते; पण रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हा सर्वोत्तम द्रव पदार्थ आहे. त्यात कर्बोदके आणि अतिरिक्त साखर नसते. दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अमेरिकन डायबेटिस असोसिएशन मधुमेह असलेल्या किंवा मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींना त्यांचे मुख्य पेय म्हणून पाण्याची निवड करण्याची शिफारस करते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. दररोज पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.

दक्षिण अमेरिकेतील येर्बा माटे चहा पिऊन पाहा

जर तुम्हाला सकाळी कॅफीनसोबत इतर फायदे मिळवायचे असतील, तर ‘येर्बा मेट’ पिऊन बघा. हा एक दक्षिण अमेरिकन चहा आहे, ज्याची चव किंचित कडू आणि मातीसारखी असते. त्यात कॅफीन, पॉलीफेनॉल व थिओब्रोमिन हे घटक असतात. आहारतज्ज्ञ गिसेला बोव्हियर यांच्या मते, येर्बा मेटमध्ये अतिरिक्त साखर नसते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. यादृच्छिक नियंत्रित चाचण्यांच्या एका पुनरावलोकन आणि मेटा विश्लेषणात असे आढळून आले आहे की, चयापचयविषयक जोखीम घटक असलेल्या लोकांमध्ये येर्बा मेटच्या सेवनाने रक्तातील साखरेच्या नियंत्रणाचे काही निर्देशक सुधारू शकतात, ज्यात जेवणानंतरच्या रक्तातील ग्लुकोज आणि HbA1c मध्ये घट होण्याचा समावेश आहे. तुम्ही येर्बा मेट घरी बनवून गरम किंवा थंड पिऊ शकता. ते नेहमी साखरेशिवाय पिणे उत्तम. त्यात कॅफीन असल्यामुळे, तुमच्या रात्रीच्या झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून ते सकाळी पिणे उत्तम आहे.

लॅटे प्या

लॅटे ही एस्प्रेसो आणि गरम दुधापासून बनवलेली एक प्रकारची कॉफी आहे. मधुमेही सकाळी ‘लॅटे’ पिऊ शकतात; परंतु त्यात साखर आणि गोड पदार्थ घालणे टाळावे. लॅटे बनविण्यासाठी साधे गाईचे दूध किंवा साखर नसलेले सोया दूध वापरले जाऊ शकते. त्यामध्ये प्रथिने असतात, जी कोणतेही पेय प्यायल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. आहारतज्ज्ञांच्या मते, कॉफीमध्ये फ्लेवर्ड सिरप, गोड क्रीमर व व्हिप्ड क्रीम घातल्यास ते एक उच्च साखरयुक्त पेय बनू शकते. त्यामुळे लॅटे साखरेशिवाय किंवा अगदी कमी साखरेसह पिणे चांगले आहे.

प्रोटीन शेक्सदेखील एक चांगला पर्याय

मधुमेहींसाठी सकाळी प्रोटीन शेक घेणे हा एक पर्याय असू शकतो. प्रथिनयुक्त नाश्ता पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करतो आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यापासून रोखण्यासही मदत करू शकतो. काही संशोधनांत असेही दिसून आले आहे की, सकाळी प्रथिने घेतल्याने दिवसभरातील जेवणानंतर रक्तातील साखरेवर होणारा परिणाम सुधारू शकतो. प्रोटीन शेकला अधिक पौष्टिक बनविण्यासाठी, त्यात साखर नसलेले ग्रीक योगर्ट, सोया दूध किंवा प्रोटीन पावडर घाला. फायबरसाठी त्यात थोड्या प्रमाणात बेरी किंवा इतर कमी गोड फळे घाला. चिया सीड्स, जवसाची पूड किंवा थोड्या प्रमाणात ॲव्होकॅडो हे आरोग्यदायी फॅट्स आणि फायबर पुरवण्यासाठी मदत करू शकतात. हे लक्षात ठेवा की, मधुमेह असताना प्रोटीन शेक घेताना, त्यात अतिरिक्त साखर, मध, गोड फ्लेवर्ड पावडर किंवा अति गोड फळे खाणे टाळणे उत्तम आहे. प्रोटीन शेकला संतुलित नाश्त्याचा एक भाग बनवा; परंतु त्याला मधुमेहाच्या औषधांचा किंवा उपचारांचा पर्याय मानू नका.