Blood Sugar Fluctuation Causes : ब्लड शुगर कमी-जास्त झाल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. अशा वेळी वेळीच उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते, ब्लड शुगर नियंत्रित ठेवून मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून, जसे की, मूत्रपिंडांचे आजार, मज्जातंतूंचे (नर्व्हज) नुकसान, डोळ्यांच्या समस्या, स्ट्रोक आणि हृदयाचे आजार यांपासून बचाव केला जाऊ शकतो. त्यासाठी तुमचा आहार आरोग्यदायी असणे आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आवश्यक आहे.
ज्या लोकांची रक्तशर्करेची पातळी अनेकदा अनियंत्रित राहते, त्यांच्यामध्ये थकवा, अशक्तपणा आणि झोपेच्या समस्या असणे खूप सामान्य आहे, असे आरोग्य तज्ज्ञांना आढळून आले आहे. टाईप-२ मधुमेह असलेल्या लोकांनी ब्लड शुगर अचानक वाढण्याच्या (स्पाइक) कारणांबद्दल जाणून घेणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी उपाय करीत राहणे गरजेचे आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार कमी किंवा जास्त होण्यामागे कोणती कारणे आहेत आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी काय केले पाहिजे, ते जाणून घेऊया:
मासिक पाळीच्या चक्रामुळे होऊ शकतो त्रास
मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, सूज येणे यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागणे खूप सामान्य आहे; पण त्यामुळे रक्तशर्करेची पातळीही वाढू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का?
सीडीसीनुसार (CDC), प्रीमेंस्ट्रुअल फेजदरम्यान (मासिक पाळी येण्यापूर्वीचा काळ) हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे ब्लड शुगर कमी-जास्त होत राहू शकते.
मधुमेहाचा त्रास असलेल्या काही महिला पाळीच्या दिवसांत इन्सुलिनप्रति कमी संवेदनशील बनतात. या दिवसांत आहार आणि जीवनशैली योग्य ठेवणे खूप गरजेचे मानले जाते.
तुम्ही जास्त वेळ डिहायड्रेटेड तर राहत नाही ना?
डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे ब्लड शुगरची पातळी वाढू शकते. शरीरात द्रवाचे प्रमाण कमी झाल्याने हायपरग्लेसेमिया (Hyperglycemia) होऊ शकतो, असे संशोधकांना आढळून आले आहे.
ब्लड शुगर वाढल्यावर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन वाढण्याचा धोका आणखी जास्त असतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी किंवा इतर उष्मांकमुक्त पेये पीत राहिले पाहिजे.
झोप पूर्ण न होणे हेही कारण
जर तुमची रात्रीची झोप पूर्ण होत नसेल, तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी मूड आणि ऊर्जेशी संबंधित समस्या तर निर्माण होऊ शकतातच; शिवाय त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीतही चढ-उतार होऊ शकतात.
२०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे टाईप-२ डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये ग्लुकोज नियंत्रण आणि इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
ब्लड शुगर कशी नियंत्रित करावी?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या उपायांचे पालन करून तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकता:
नियमित व्यायाम केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
तणाव (स्ट्रेस) व्यवस्थापित केल्याने रक्तशर्करेतील वाढ टाळण्यास मदत होऊ शकते.
आहारात कार्बोहायड्रेट्स, जंक आणि फास्ट फूडचे प्रमाण कमी करा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तशर्करा नियंत्रित करणाऱ्या औषधांचे नियमितपणे सेवन करत राहा.
