8 Simple Ways to Reduce Body Fatigue and Pain: आजच्या धावपळीच्या जीवनात दिवसभर काम केल्यानंतर शरीर थकणे, अंगदुखी जाणवणे आणि स्नायूंमध्ये ताण निर्माण होणे या समस्या अनेकांना जाणवतात. काही वेळा सकाळी झोपेतून उठल्यानंतरही शरीरात उत्साह नसतो. पुरेशी विश्रांती न मिळणे, सततचा मानसिक ताण, चुकीच्या शारीरिक हालचाली आणि झोपेची कमतरता यांमुळे थकवा वाढू शकतो. अशा वेळी प्रत्येक वेळी औषधांचा आधार घेण्याऐवजी काही सोप्या सवयी अंगीकारल्यास शरीराला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे, यासाठी महागड्या उपचारांची गरज नाही. घरच्या घरी करता येणारे ‘हे’ ८ उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.

१. कोमट पाण्याने करा स्नान

दिवसभर काम करून शरीर थकल्यानंतर कोमट पाण्याने स्नान केल्यास खूप आराम मिळू शकतो. कोमट पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते. विशेषतः बराच वेळ बसून किंवा उभे राहून काम करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो. मात्र, पाणी खूप गरम नसावे. कोमट पाण्याने स्नान केल्याने शरीर ताजेतवाने होते.

२. स्ट्रेचिंग आणि योगासने करा

सतत एकाच जागी बसून काम केल्यामुळे किंवा बराच वेळ उभे राहिल्यामुळे स्नायू आखडतात. त्यामुळे मान, पाठ, खांदे आणि कंबर दुखू शकते. अशा वेळी दररोज १० ते १५ मिनिटे हलके व्यायाम आणि स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरू शकते. ताडासन, भुजंगासन व शवासन यांसारख्या योगासनांमुळे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. मात्र, वेदना वाढत असतील, तर जबरदस्तीने व्यायाम करू नये.

३. पुरेशी झोप घ्या

शरीराचा थकवा दूर करण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर आळस, चिडचिड आणि अशक्तपणा जाणवू शकतो. प्रौढ व्यक्तींनी दररोज साधारण सात ते नऊ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि दूरचित्रवाणीपासून थोडे दूर राहा. शांत वातावरणात झोपण्याची सवय लावा. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

४. आले, तुळशीच्या चहाचे सेवन करा

दिवसभराचा थकवा जाणवत असेल, तर आले आणि तुळशीचा चहा घेऊ शकता. आल्यामध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे घटक असतात. तुळशीचा सुगंध आणि चहाची उब यांमुळे मन प्रसन्न वाटू शकते. आवडत असल्यास चहामध्ये थोडी दालचिनीही घालू शकता. मात्र, हर्बल चहा प्यायल्याने अंगदुखी किंवा थकवा हमखास दूर होतो, असे नाही.

५. कोमट तेलाने हलके मालिश करा

स्नायूंमध्ये ताण जाणवत असल्यास मोहरीचे किंवा तीळ तेल वापरून हलक्या हाताने मालिश करू शकता. त्यामुळे स्नायूंना आराम मिळू शकतो आणि ताण कमी होण्यास मदत होते. मालिश करताना जास्त दाब देऊ नका. त्वचेवर जखम, सूज किंवा तीव्र वेदना असल्यास मालिश करणे टाळा. लसूण घालून गरम केलेल्या तेलाने मालिश केल्याने वेदना हमखास कमी होतात, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही.

६. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवा

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात किंवा जास्त शारीरिक श्रम केल्यानंतर पाण्याची गरज वाढू शकते. नारळपाणी आणि लिंबूपाणी यांचाही आहारात समावेश करू शकता. मात्र, केवळ तहान लागल्यानंतरच पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावा.

७. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा

दिवसभराच्या कामासाठी शरीराला ऊर्जा आणि पोषक घटकांची गरज असते. त्यामुळे आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पदार्थ असावेत. हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, डाळी, कडधान्ये आणि सुकामेवा यांचा आहारात समावेश करा. योग्य आणि संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. जेवणाच्या वेळा टाळणे किंवा सतत बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

८. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा

शारीरिक थकव्यामागे मानसिक ताण हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते. सतत कामाचा विचार करणे, अपुरी विश्रांती आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यांमुळे मनावर ताण येतो. अशा वेळी ध्यानधारणा करणे, आवडीचे संगीत ऐकणे, थोडा वेळ फिरायला जाणे किंवा आवडता छंद जोपासणे फायदेशीर ठरू शकते. स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवल्याने मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

थकवा आणि अंगदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

हे उपाय दैनंदिन थकवा आणि स्नायूंमधील किरकोळ ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, सतत थकवा जाणवणे, अंगदुखी वाढणे किंवा पुरेशी झोप घेऊनही अशक्तपणा कायम राहणे यांकडे दुर्लक्ष करू नका. रक्तक्षय, थायरॉइडचे विकार, जीवनसत्त्वांची कमतरता किंवा इतर आरोग्यविषयक समस्यांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीर देत असलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष दिल्यास आरोग्याची काळजी घेणे अधिक सोपे होऊ शकते.