भारतात धार्मिक विधींमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही तुळशीला पवित्र आणि औषधी वनस्पती मानलं जाते. . तिची पानं शरीर शुद्ध ठेवतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतात. तुळशीच्या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट, जंतुचा व विषाणूंचा संसर्ग रोखणारे आणि दाह आणि सूज कमी करणारे गुणधर्म आहेत जे या वनस्पतीला एक नैसर्गिक औषध बनवतात.
शरीर शुद्ध आणि ऊर्जा वाढवणारा उपाय (Body Detox & Immunity Boosting)
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचं पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटकं बाहेर पडतात, पचनक्रिया सुधारते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. हे पाणी यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंड (किडनी) स्वच्छ करण्यासही मदत करतं.
वर्धा आयुर्वेदातील डॉ. सुभाष गोयल सांगतात, “१० ते १२ तुळशीची पानं काचेच्या बाटलीत टाका आणि दिवसभर तेच पाणी प्या. हे पाणी एल्कलाइन पाणी बनवतं, ज्यामुळे शरीरातील आम्लता कमी होते आणि शरीर डिटॉक्स होतं.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, तुळशीची पानं केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वारंवार होणारे सर्दी-खोकल्याचे त्रास कमी होतात.
घशातील संसर्ग आणि कफासाठी तुळशीचं पाणी (Tulsi Water Gargle Benefits)
बदलत्या हवामानामुळे अनेकांना सर्दी, खोकला आणि छातीत कफ साचण्याचा त्रास होतो. अशावेळी तुळशीच्या पानांचं पाणी बनवून गुळण्या केल्यास घशातील संसर्ग, खवखव आणि कफाचा त्रास झटपट कमी होतो.
१. घश्याच्या संसर्गापासून आराम
तुळशीमध्ये असलेले जंतुचा व विषाणूंचा संसर्ग रोखणारे घटक घशातील विषाणू-जंतूंना नष्ट करतात. त्यामुळे घशातील सूज, वेदना आणि खवखव कमी होते आणि बोलताना त्रास होत नाही.
२. सर्दी-खोकल्यात आराम
सर्दी-खोकल्याच्या वेळी तुळशीचं पाणी गरम करून गुळण्या केल्यास घशाची जळजळ आणि छातीत साचलेला कफ कमी होतो. हे पाणी घशाचा ओलावा टिकवून ठेवतं आणि खोकल्यामुळे होणारा त्रास कमी करतं.
३. आवाज होतो मधुर आणि स्पष्ट
ज्यांचा आवाज सतत वापरला जातो — जसे शिक्षक, गायक, वक्ते — यांच्यासाठी तुळशीचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे. गुळण्या केल्याने घश्याच्या स्नायूंना आराम मिळतो आणि आवाज स्पष्ट, मृदू होतो.
४. तोंडातील दुर्गंध आणि जंतुसंसर्गावर उपाय
तुळशीचं पाणी नैसर्गिक माउथवॉश सारखं कार्य करतं. त्याने तोंडातील जंतू नष्ट होतात, दुर्गंध कमी होते आणि हिरड्या मजबूत होतात. तोंडाचे फोड, तोंड येणे, सूज यापासूनही आराम मिळतो.
५. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
तुळशीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. दररोज सकाळी तुळशीच्या पाण्याने गुळण्या करण्याची सवय लावल्यास हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गांपासून बचाव होतो.
तुळशीच्या पाण्याने गुळण्या करण्यासाठी पाणी कसे तयार करावे?
- ६–७ तुळशीची पानं एका कप पाण्यात उकळा.
- पाणी कोमट झाल्यावर दिवसातून दोन वेळा गुळण्या करा.
- घशातील खवखव, सूज आणि छातीतला कफ यापासून झटपट आराम मिळेल.
आयुर्वेदात तुळस ही केवळ औषधी वनस्पती नाही, तर आरोग्य आणि ऊर्जा यांचं प्रतीक आहे. बदलत्या हवमानाच्या दिवसांत, दररोज काही मिनिटं तुळशीच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि सर्दी-खोकल्यापासून नैसर्गिक संरक्षण मिळू शकतं.
