Asha Bhosale Death Cause: भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या अष्टपैलू आवाजाने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशाताईंना शनिवारी संध्याकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. “मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे (अनेक अवयव निकामी झाल्यामुळे) त्यांची प्राणज्योत मालवली,” असे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
आशाताईंच्या पश्चात त्यांचा मुलगा आनंद भोसले आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
आशाताईंच्या निधनानंतर काही तज्ज्ञांनी वृद्धापकाळात कोणत्या आरोग्य समस्या भेडसावतात यावर प्रकाश टाकला आहे.
वृद्धापकाळातील आरोग्य समस्या
आशाताईंच्या निधनाचे कारण ठरलेल्या ‘चेस्ट इन्फेक्शन’ म्हणजेच छातीतील संसर्गाबाबत आरोग्य तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलचे डॉ. रवी शेखर झा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी ९० वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्ये असे संसर्ग होणे सामान्य आहे.
संसर्गाची प्रमुख कारणे
- रोगप्रतिकारशक्ती क्षीण होणे: वाढत्या वयानुसार शरीराची संरक्षण यंत्रणा कमकुवत होते. खोकण्याची क्षमता कमी झाल्यामुळे फुफ्फुसांतील कफ बाहेर पडत नाही.
- अन्न किंवा लाळ फुफ्फुसात जाणे: वृद्धापकाळात गिळण्याची क्षमता कमकुवत झाल्यामुळे अन्नाचे कण किंवा लाळ थेट फुफ्फुसात जाऊन संसर्ग निर्माण करतात.
- हालचालींचा अभाव: सतत झोपून किंवा बसून राहिल्याने फुफ्फुसांचा पूर्ण विस्तार होत नाही, त्यामुळे खालच्या भागात जंतू वाढण्याची शक्यता निर्माण होते.
थकवा (Exhaustion) ही एक धोक्याची घंटा
डॉ. झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध लोकांमध्ये ताप किंवा खोकल्यापेक्षा ‘अतिशय थकवा’ हे संसर्गाचे पहिले लक्षण असू शकते. अनेकदा त्यांना फक्त अशक्तपणा, सतत झोप येणे किंवा गोंधळल्यासारखे वाटू शकते.
प्रतिबंधात्मक उपाय
तज्ज्ञांनी अशावेळी सुचवतात की, वृद्धांना इन्फ्लूएंझा आणि न्यूमोकोकसच्या लस टोचणे फायदेशीर ठरते. तसेच तोंडाची स्वच्छता, बसण्याची योग्य पद्धत, श्वसनाचे हलके व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
