Bowel Cancer Symptoms: साधारणपणे लोक पोटातील वेदना, शौचाच्या सवयींमधील बदल, जुलाब किंवा बद्धकोष्ठता यांवरून आतड्याच्या कॅन्सरची (Colorectal Cancer) लक्षणे ओळखतात. मात्र, ताज्या संशोधनातून असा खुलासा झाला आहे की, तुमच्या तोंडातील काही छोटे बदलदेखील या गंभीर आजाराची पूर्वसूचना असू शकतात.

ब्रिटनमध्ये दर १२ मिनिटाला एका व्यक्तीला आतड्याचा कॅन्सर असल्याचे निदान होत असून, दरवर्षी सुमारे १७,००० लोक या आजारामुळे आपला जीव गमावत आहेत. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत ब्रिटनमध्ये हा दुसरा सर्वात मोठा आजार मानला जातो.

तोंडातील बॅक्टेरिया आणि आतड्यांचा संबंध

दातांच्या आणि हिरड्यांच्या समस्या केवळ तोंडापुरत्या मर्यादित नसून, त्या तोंडातील बॅक्टेरियाच्या असंतुलनाचा संकेत देतात. तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया लाळेवाटे आतड्यांपर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे तिथे सूज निर्माण होते. काही प्रकरणांमध्ये ही सूज कॅन्सरच्या वाढीस कारणीभूत ठरू शकते. दात व्यवस्थित स्वच्छ न करणे, धुम्रपान, मद्यपान आणि आहारात जास्त साखर व कमी फायबर असणे, यामुळे हे बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते.

तोंडावाटे मिळणारे ‘हे’ ४ महत्त्वाचे संकेत

१. हिरड्यांतून रक्त येणे: हिरड्यांतून रक्त येणे हे संसर्गाचे लक्षण आहे. हार्वर्डच्या संशोधनानुसार, हिरड्यांचे आजार असलेल्या लोकांमध्ये ‘प्री-कॅन्सरस कोलोन पॉलिप्स’चा धोका १७ ते २१ टक्क्यांनी जास्त असतो. हे बॅक्टेरिया रक्तप्रवाहातून पचनसंस्थेपर्यंत पोहोचू शकतात.

२. तोंडाला दुर्गंधी येणे: सतत तोंडाला दुर्गंधी येणे हे ‘फ्युसोबॅक्टेरिअम न्यूक्लिएटम’ (Fusobacterium nucleatum) या बॅक्टेरियाशी संबंधित असू शकते. हा बॅक्टेरिया हिरड्यांच्या आजारासोबतच आतड्याच्या कॅन्सरच्या ट्यूमरमध्येही आढळला आहे.

३. जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर: जिभेवर साचलेला थर हा बॅक्टेरिया आणि मृत पेशींचा साठा असतो. संशोधनानुसार, जिभेवरील थरातील बदल हे तोंडातील बॅक्टेरियाच्या बदलेल्या स्वरूपाचे निदर्शक असतात, ज्याचा थेट संबंध आतड्याच्या आरोग्याशी असतो.

४. दात पडणे: हार्वर्ड आणि AACR च्या अहवालानुसार, ज्या व्यक्तींचे ४ किंवा त्यापेक्षा जास्त दात पडले आहेत, त्यांच्यामध्ये कर्करोगपूर्व पॉलिप्सचा धोका २० टक्क्यांनी वाढतो. हे प्रदीर्घ काळ हिरड्यांच्या आजाराकडे केलेल्या दुर्लक्षाचे फळ असू शकते.

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तोंडाची स्वच्छता राखणे हा केवळ दातांसाठीच नव्हे, तर संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.