Bowel Cancer Symptoms: बाउल कॅन्सर हा मोठ्या आतड्यापासून रेक्टमपर्यंतच्या भागात होणारा कॅन्सर आहे. मोठे आतडे हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. ते अन्नातील पाणी शरीरात शोषून घेते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.
बाउल कॅन्सर किती गंभीर आहे, हे कॅन्सरचा आकार किती आहे, तो शरीरात किती पसरला आहे आणि रुग्णाची तब्येत कशी आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे या कॅन्सरची लक्षणे लवकर ओळखणे आणि वेळेत उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (NHS) बाउल कॅन्सरची अशी काही लक्षणे सांगितली आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.
बाउल कॅन्सरची लक्षणे (Signs And Symptoms Of Bowel Cancer)
- शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे, जसे की मलाचा आकार किंवा स्वरूप वेगळे दिसणे, बराच काळ जुलाब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे.
- अचानक नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त वेळा शौचाला जाणे. हे आतड्यांशी संबंधित गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
- मलामध्ये रक्त दिसणे किंवा मलाचा रंग लाल किंवा काळा दिसणे.
- गुदद्वारातून रक्त येणे.
- शौच केल्यानंतर लगेच पुन्हा शौचाला जाण्याची गरज वाटणे.
- पोटात दुखणे.
- पोटात गाठ जाणवणे.
- सतत पोट फुगलेले राहणे.
- कोणताही प्रयत्न न करता वजन कमी होणे.
- सतत थकवा जाणवणे आणि धाप लागणे. हे बाउल कॅन्सरमुळे होणाऱ्या रक्ताच्या कमतरतेचे म्हणजेच ॲनिमियाचे लक्षण असू शकते.
ही २ लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांना भेटा
- मलाचा रंग काळा किंवा गडद लाल दिसत असेल किंवा रक्तासोबत जुलाब होत असतील.
- गुदद्वारातून रक्त येत असेल किंवा मलामध्ये रक्ताच्या मोठ्या गुठळ्या दिसत असतील.
ही गोष्ट खास लक्षात ठेवा
मलामध्ये रक्त दिसणे किंवा इतर लक्षणे दिसणे हे इतर कोणत्याही समस्येमुळेही होऊ शकते. तुम्हाला बाउल कॅन्सर आहे असे निश्चित होईपर्यंत घाबरू नका. डॉक्टरांना भेटा आणि योग्य तपासण्या करून समस्येचे नेमके कारण जाणून घ्या.
बाउल कॅन्सर होण्याची कारणे काय आहेत?
बाउल कॅन्सर नेमका कशामुळे होतो, याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, शरीरातील जनुकीय बदल, जीवनशैली आणि पर्यावरणाशी संबंधित कारणांमुळे हा कॅन्सर होऊ शकतो. याशिवाय काही आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना बाउल कॅन्सर होण्याचा धोका जास्त असू शकतो.
ज्या लोकांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे, जे धूम्रपान करतात, ज्यांचे वजन जास्त आहे, ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बाउल कॅन्सर झाला आहे, ज्यांना आतड्यांमध्ये पॉलीप्सची समस्या आहे किंवा ज्यांना इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजचा त्रास आहे, अशा लोकांना बाउल कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
