Bowel Movement Timing and Digestive Health: सकाळी उठल्यानंतर लगेच शौचास जाण्याची सवय आहे की दिवसभरात कधीही शौचास जावे लागते? अनेक जण या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, शौचास जाण्याची वेळ, नियमितपणा आणि मलविसर्जनाच्या सवयी यांचा आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याशी संबंध असतो. विशेष म्हणजे, यामागे शरीराचे अंतर्गत घड्याळही महत्त्वाची भूमिका बजावत असते.

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे काम ठराविक लयीनुसार सुरू असते. झोप, भूक, हार्मोन्सची निर्मिती आणि पचनक्रिया या सगळ्यांवर शरीराच्या अंतर्गत घड्याळाचा प्रभाव असतो. यालाच वैद्यकीय भाषेत सर्केडियन रिदम असे म्हणतात. आपल्या मोठ्या आतड्याच्या हालचालींवरही या नैसर्गिक लयीचा परिणाम होतो, त्यामुळे काही लोकांना सकाळी उठल्यानंतर शौचास जाण्याची इच्छा होते, तर काहींना दिवसातील वेगळ्या वेळी शौचास जावे लागते. मग सकाळी शौचास जाणे अधिक चांगले मानले जाते का? संध्याकाळी शौचास जाण्याचा अर्थ पचनसंस्थेत काही बिघाड आहे का? जाणून घेऊया.

सकाळी उठल्यानंतरच शौचास का होते?

रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरातील अनेक क्रिया मंदावतात. मोठ्या आतड्याच्या हालचालीही या काळात तुलनेने कमी होतात. मात्र, सकाळी झोपेतून उठल्यानंतर आतड्यांची हालचाल पुन्हा वाढू लागते, त्यामुळे अनेकांना सकाळी शौचास जाण्याची इच्छा होते.

यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स. सकाळी नाश्ता केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर पोटातून मोठ्या आतड्याला हालचाली वाढवण्याचा संकेत मिळतो, त्यामुळे आतड्यांमधील पदार्थ पुढे सरकण्यास मदत होते आणि शौचास जाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.

सकाळी नियमितपणे शौचास होणे ही चांगली सवय मानली जाते. यामुळे शरीराच्या नैसर्गिक लयीशी पचनसंस्थेचा मेळ असल्याचे दिसू शकते. मात्र, सकाळीच शौचास झाले पाहिजे असा कोणताही नियम नाही.

संध्याकाळी शौचास होत असेल तर काय समजावे?

काही लोकांना सकाळऐवजी संध्याकाळी किंवा दिवसातील इतर वेळी शौचास जाण्याची सवय असते. याचा अर्थ त्यांची पचनसंस्था कमकुवत आहे किंवा शरीरात काही गंभीर समस्या आहे असा होत नाही. प्रत्येक व्यक्तीची पचनक्रिया, आहार, झोपेची वेळ आणि दैनंदिन दिनक्रम वेगळा असतो.

मात्र, तुमच्या शौचास जाण्याच्या वेळेत अचानक बदल झाला असेल तर त्यामागील कारण समजून घेणे आवश्यक आहे. रात्री उशिरा जेवणे, कामाच्या बदलत्या वेळा, अपुरी झोप, मानसिक ताण आणि अनियमित आहार यांमुळे शरीराच्या अंतर्गत घड्याळावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम आतड्यांच्या हालचालींवरही होण्याची शक्यता असते, त्यामुळे संध्याकाळी शौचास जाणे ही स्वतःहून चिंतेची बाब नाही. मात्र, नेहमीच्या सवयीमध्ये अचानक बदल झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

शौचास जाण्याच्या वेळेचा चयापचयाशी काय संबंध?

आपली पचनसंस्था आणि चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम या दोन्हींचा शरीराच्या अंतर्गत घड्याळाशी संबंध आहे. आपण कधी झोपतो, कधी उठतो, कोणत्या वेळी जेवतो आणि किती वेळा खातो, या सवयींचा शरीराच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो.

झोपेच्या वेळा सतत बदलणे, रात्री उशिरा जेवणे किंवा अनियमित दिनक्रम यामुळे पचनाच्या नैसर्गिक लयीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शौचास जाण्याची वेळही बदलू शकते. मात्र, केवळ सकाळी किंवा संध्याकाळी शौचास जाण्यावरून तुमचा मेटाबॉलिझम चांगला आहे की खराब हे ठरवता येत नाही.

कोणती लक्षणे दिसल्यास सावध व्हावे?

शौचास जाण्याची वेळ बदलणे ही प्रत्येक वेळी गंभीर समस्या नसते. मात्र, त्यासोबत काही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

  • शौचास जाताना पोटात तीव्र वेदना होणे.
  • मलातून रक्त जाणे किंवा मलाचा रंग काळा दिसणे.
  • अचानक वजन कमी होणे.
  • सतत पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटणे.
  • अनेक दिवस बद्धकोष्ठता किंवा जुलाबाचा त्रास होणे.
  • शौचाच्या सवयींमध्ये अचानक आणि सातत्याने बदल होणे.

अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळा आतड्यांच्या कार्याशी संबंधित समस्या, इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) किंवा दीर्घकालीन बद्धकोष्ठता यांसारख्या स्थितींमध्येही शौचाच्या सवयी बदलू शकतात.

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

दररोज ठराविक वेळी जेवण्याचा आणि झोपण्याचा प्रयत्न करा. आहारात पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि तंतुमय पदार्थांचा समावेश करा. पुरेसे पाणी प्या आणि नियमित शारीरिक हालचाल ठेवा. शौचास जाण्याची इच्छा झाल्यास ती वारंवार दाबून ठेवू नका. तसेच, सकाळी उठल्यानंतर घाई न करता शरीराला नैसर्गिकरीत्या मलविसर्जनासाठी वेळ द्या.

थोडक्यात सांगायचे तर तुम्ही सकाळी शौचास जाता की संध्याकाळी, यापेक्षा तुमची शौचाची सवय नियमित आहे का, मलविसर्जन सहज होते का आणि त्यासोबत काही त्रास जाणवतो का हे अधिक महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसाधारण आरोग्यविषयक जागरूकतेसाठी आहे. शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल किंवा इतर त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. केवळ शौचास जाण्याच्या वेळेवरून कोणत्याही आजाराचे निदान करता येत नाही.