Mobile Effects on Brain Health: आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस कदाचित क्वचितच खऱ्या अर्थाने शांत बसू शकतो. पूर्वी लांबचा प्रवास खिडकीबाहेर पाहत सहज निघून जायचा, रांगेत थांबताना लोक आजूबाजूच्या गोष्टी अनुभवायचे आणि रात्री झोपण्यापूर्वी मन आपोआप शांत व्हायचं.

पण आता प्रत्येक रिकामा क्षण एखाद्या ना एखाद्या स्क्रीनने भरलेला असतो. कधी मोबाईल नोटिफिकेशन, कधी छोटे व्हिडीओ, कधी पॉडकास्ट, तर कधी सतत येणारे मेसेज. त्यामुळे मेंदूला खराखुरा आरामच मिळत नाही.

याचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतोय का?

न्यूरोलॉजिस्ट्सच्या मते, सतत मिळणारं हे बॅकग्राऊंड स्टिम्युलेशन माणसाच्या मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल घडवत आहे. बाहेरून एखादी व्यक्ती आराम करताना दिसत असली तरी तिचा मेंदू सतत सक्रिय असतो. म्हणूनच आजकाल लोक फारशी शारीरिक मेहनत न करता देखील मानसिक थकवा जाणवत असल्याचं सांगतात.

आपला मेंदू नेहमी सक्रिय राहण्यासाठी बनलाय का?

होसमॅट हॉस्पिटल्सचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रभू यांनी TOI ला सांगितलं की, माणसाचा मेंदू सतत अशा प्रकारे सक्रिय राहण्यासाठी बनलेला नाही. पूर्वी दिवसभरात असे छोटे-छोटे क्षण मिळायचे, जेव्हा मेंदू आपोआप शांत व्हायचा. पण आता प्रत्येक रिकामी जागा डिजिटल गोष्टींनी भरली आहे. डॉ. प्रभू सांगतात की स्मार्टफोन, सोशल मीडिया, सतत येणारी नोटिफिकेशन्स आणि कायम ऑनलाइन राहण्याचा दबाव यामुळे माणसाचा मेंदू सतत सक्रिय राहतो.

सतत सक्रिय राहण्याचा काय परिणाम होतो?

तज्ज्ञ सांगतात की, या समस्येची धोकादायक गोष्ट म्हणजे ही थकवा लगेच जाणवत नाही. लोकांना वाटतं की मोबाईल स्क्रोल करणं किंवा रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ पाहणं म्हणजे आराम करणं आहे, पण प्रत्यक्षात मेंदू सतत नवीन माहिती प्रोसेस करत असतो. त्यामुळे नर्व्हस सिस्टीम कायम हलक्या सतर्क अवस्थेत राहते. हळूहळू ही सवय मानसिक थकवा, लक्ष कमी होणं आणि भावनिक ताण यामध्ये बदलू शकते.

नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या रिसर्चमध्येही समोर आलं आहे की जास्त वेळ स्क्रीनसमोर राहणं आणि रात्री उशिरापर्यंत डिजिटल गोष्टींमध्ये गुंतून राहणं याचा झोपेच्या गुणवत्तेवर, भावनिक संतुलनावर आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. विशेषतः रात्री उशिरापर्यंत सतत स्क्रोलिंग केल्यामुळे मेंदू कायम अलर्ट मोडमध्ये राहतो.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)