Brain Stroke Symptoms: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा हात-पायात मुंग्या येणे यासारख्या तक्रारी अनेकांना जाणवतात. त्यामुळे ही लक्षणं थकवा किंवा कमजोरीमुळे झाली असतील, असं समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, शरीरात अचानक होणारे काही बदल हे स्ट्रोक म्हणजेच ब्रेन अटॅकचे संकेत असू शकतात. स्ट्रोक आल्यानंतर उपचार मिळण्यास जितका उशीर होतो, तितका मेंदूला होणारा धोका वाढू शकतो. त्यामुळे लक्षणं ओळखून वेळ न दवडता वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

ब्रेन अटॅक नेमका कसा होतो?

स्ट्रोकमध्ये मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा बंद होतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते. त्यामुळे मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या खराब होऊ लागतात.

चेहरा वाकडा होणे, हात-पाय कमजोर पडणे हे महत्त्वाचे संकेत

स्ट्रोकचे एक प्रमुख लक्षण म्हणजे शरीराच्या एका बाजूला अचानक कमजोरी किंवा सुन्नपणा जाणवणे. हात किंवा पाय अचानक नीट हलत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. याशिवाय चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे, हसताना चेहऱ्याची एक बाजू व्यवस्थित न हलणे हेदेखील महत्त्वाचे संकेत आहेत.

अचानक बोलताना अडचण? सावध व्हा

अचानक बोलताना शब्द अस्पष्ट होणे, जीभ अडखळणे, योग्य शब्द न सुचणे किंवा समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजण्यास त्रास होणे, ही स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. तसेच अचानक एका किंवा दोन्ही डोळ्यांनी धूसर दिसणे, चालताना अडखळणे, संतुलन बिघडणे किंवा तीव्र चक्कर येणे याकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

अचानक तीव्र डोकेदुखीही धोक्याचा इशारा असू शकते

काही प्रकारच्या स्ट्रोकमध्ये कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक खूप तीव्र डोकेदुखी होऊ शकते. यासोबत उलटी, बेशुद्ध पडणे किंवा शरीराच्या एखाद्या भागात सुन्नपणा जाणवू शकतो. काही वेळा ही लक्षणं काही मिनिटांत किंवा तासांत कमी होतात. पण लक्षणं आपोआप बरी झाली म्हणजे धोका टळला, असं समजू नका. हे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA), म्हणजेच ‘मिनी स्ट्रोक’ असू शकते. TIA हा भविष्यात होणाऱ्या मोठ्या स्ट्रोकचा इशारा असू शकतो.

कोणाला स्ट्रोकचा धोका जास्त?

अस्वास्थ्यकर आहार, व्यायामाचा अभाव, तंबाखूचे सेवन, अतिप्रमाणात मद्यपान आणि लठ्ठपणा यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल यांसारख्या स्थितीही रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब आणि रक्तातील साखर-कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे महत्त्वाचे आहे.

स्ट्रोकची लक्षणं दिसली तर काय कराल?

स्ट्रोकची कोणतीही अचानक लक्षणं दिसल्यास वेळ वाया न घालवता रुग्णाला तातडीने रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घेऊन जा किंवा रुग्णवाहिका बोलवा. लक्षणं नेमकी कधी सुरू झाली याची वेळ नोंदवून ठेवा. डॉक्टरांना उपचार ठरवताना ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःहून कोणतीही औषधं देऊ नका. स्ट्रोकच्या बाबतीत ‘थोडं थांबून पाहू’ हा पर्याय धोकादायक ठरू शकतो. अचानक दिसणारी लक्षणं ओळखा आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या.