Brain stroke symptoms : स्ट्रोक (मेंदूचा झटका) ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती असून, त्यामध्ये प्रत्येक मिनीट अत्यंत महत्त्वाचे असते. उपचारांमध्ये होणारा प्रत्येक क्षणाचा विलंब मेंदूतील लाखो पेशी नष्ट करू शकतो. त्यामुळे स्ट्रोकची लक्षणे वेळेत ओळखणे आणि तातडीने उपचार घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अगदी सौम्य वाटणाऱ्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नये. या संदर्भात डॉ. फुरकान खान सल्लागार न्यूरोलॉजिस्ट सैफी रुग्णालय, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

BE FAST या सूत्राद्वारे सहज लक्षात ठेवता येणारी स्ट्रोकची प्रमुख लक्षणे :

  • B – Balance (संतुलन) : अचानक तोल जाणे, चक्कर येणे किंवा चालताना अडचण जाणवणे.
  • E – Eyes (डोळे) : अचानक धूसर दिसणे, दुप्पट दिसणे किंवा एका अथवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाणे.
  • F – Face (चेहरा) : चेहऱ्याचा एक भाग लोंबकळणे किंवा बधीर होणे. संबंधित व्यक्तीला हसण्यास सांगितल्यास चेहरा एका बाजूला वाकलेला दिसू शकतो.
  • A – Arms (हात) : हात किंवा पायामध्ये, विशेषतः शरीराच्या एका बाजूला, अचानक अशक्तपणा किंवा बधीरपणा जाणवणे. दोन्ही हात वर करण्यास सांगितल्यास एक हात खाली झुकत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
  • S – Speech (बोलणे) : बोबडे बोलणे, स्पष्ट बोलता न येणे किंवा इतरांचे बोलणे समजण्यास अडचण येणे.
  • T – Time (वेळ) : वेळ म्हणजे मेंदू. यापैकी कोणतेही लक्षण दिसताच तातडीने आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधावा. लक्षणे आपोआप कमी होतील, अशी वाट पाहू नये.

त्याशिवाय, अचानक तीव्र डोकेदुखी होणे, विशेषतः त्यासोबत उलट्या होणे किंवा शुद्धीवर परिणाम होणे, हीदेखील स्ट्रोकची गंभीर लक्षणे असू शकतात. काही रुग्णांमध्ये अचानक गोंधळ उडणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा गिळताना त्रास होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

काही वेळा ही लक्षणे काही मिनिटांत नाहीशी होतात. त्याला Transient Ischemic Attack (TIA) किंवा ‘मिनी स्ट्रोक’ असे म्हणतात. मात्र, ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. कारण पुढील काही तासांत किंवा दिवसांत मोठा स्ट्रोक होण्याचा धोका असू शकतो.

अनियंत्रित उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊन उद्भवणारा इस्केमिक स्ट्रोक, तसेच मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन उद्भवणारा हेमोरेजिक स्ट्रोक या दोन्ही प्रकारांचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे, अॅट्रियल फिब्रिलेशन, हृदय निकामी होणे (Heart Failure) किंवा पूर्वी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी मेंदूपर्यंत पोहोचून स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते.

स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी नियमित रक्तदाब तपासणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान टाळणे, योग्य वजन राखणे, नियमित व्यायाम करणे आणि मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

स्ट्रोकबाबत लोकांकडून होणारी सर्वांत मोठी चूक म्हणजे लक्षणे आपोआप कमी होतील म्हणून वाट पाहणे. स्ट्रोकवरील उपचार, जसे की रक्ताच्या गाठी विरघळवणारी औषधे (Clot-Dissolving Medicines) किंवा Mechanical Thrombectomy, हे अत्यंत प्रभावी असले तरी ते ठरावीक कालावधीतच दिल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. उपचारात विलंब झाल्यास कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूचा धोका वाढू शकतो.

म्हणूनच स्ट्रोकची लक्षणे वेळेत ओळखणे आणि तातडीने वैद्यकीय उपचार घेणे या बाबी जीव वाचवण्यासह मेंदूचे कार्य सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेषतः उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी स्ट्रोकची लक्षणे ओळखून त्वरित योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. वेळेवर घेतलेला निर्णय हा रुग्णामध्ये दिसणारी लक्षणे दूर करून, त्याला पूर्णपणे बरे करणे आणि कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.