brain tumor symptoms and signs: ब्रेन ट्यूमर हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, हे समजून घेणे आवश्यक आहे की, मेंदूतील सर्वच गाठी कर्करोगजन्य नसतात. सामान्यतः मेंदूतील गाठी दोन प्रकारांमध्ये विभागल्या जातात. सौम्य आणि घातक या दोन्ही प्रकारांमधील फरक समजून घेतल्यास रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य वेळी योग्य ते उपचार घेण्यास मदत होऊ शकते. डॉ. अरविंद बडीगर (टेक्निकल डायरेक्टर, बीडीआर फार्मास्युटिकल्स) यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?

ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या पृष्ठभागावर निर्माण होणारी पेशींची असामान्य वाढ. मेंदूतील गाठींचे प्राथमिक आणि दुय्यम, असे दोन मुख्य प्रकार असतात. प्राथमिक गाठी मेंदूमध्येच मेंदूच्या पेशींमधून किंवा मेंदूच्या आसपासच्या ऊतींमधून निर्माण होतात; तर दुय्यम गाठी शरीरातल्या इतर अवयवांमधील कर्करोगग्रस्त पेशी रक्ताद्वारे किंवा इतर मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचून, तिथे वाढल्यामुळे निर्माण होतात.मेंदूच्या कवटीमध्ये अतिरिक्त जागा नसल्यामुळे अशी कोणतीही गाठ गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते.

सौम्य ब्रेन ट्यूमर : कर्करोग नसला तरी धोकादायक ठरण्याची शक्यता

सौम्य गाठी या कर्करोगजन्य नसतात आणि साधारणपणे त्यांची वाढ हळूहळू होते. तसेच त्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाहीत. मेनिंजिओमा, व्हेस्टिब्युलर श्वानोमा व पिट्यूटरी अॅडेनोमा ही मेंदूतील सौम्य गाठींची काही सामान्य उदाहरणे आहेत.

सौम्य गाठींचा सर्वसाधारणपणे तसा फार मोठा विपरीत परिणाम होत नसला तरी त्या दुर्लक्षित करता येत नाहीत. गाठ जसजशी मोठी होते, तसतशी ती मेंदूच्या आसपासच्या ऊतींवर दाब निर्माण करते. त्यामुळे डोकेदुखी, फिट्स, दृष्टिदोष, संतुलन बिघडणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा शरीराच्या एका बाजूची हालचाल कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. मेंदूच्या महत्त्वाच्या भागांवर परिणाम झाल्यास सौम्य गाठही जीवघेणी ठरू शकते.

घातक ब्रेन ट्यूमर : कर्करोगजन्य आणि आक्रमक

मेंदूतील घातक ठरणाऱ्या गाठी या कर्करोगजन्य असतात आणि त्यांची वाढ तुलनेने वेगाने होते. या गाठी आसपासच्या मेंदूच्या ऊतींमध्ये शिरून, त्यांचे नुकसान करू शकतात. ग्लायोब्लास्टोमाbहा मेंदूच्या कर्करोगांपैकी सर्वांत आक्रमक असल्याचे मानले जाते.

घातक गाठी मेंदूमध्येच निर्माण होऊ शकतात किंवा फुप्फुसे, स्तन, मूत्रपिंड किंवा त्वचा यांसारख्या अवयवांतील कर्करोग मेंदूपर्यंत पसरल्यानेही निर्माण होऊ शकतात. या गाठींची लक्षणे सौम्य गाठींसारखीच असली तरी त्यांचा अधिक वेगाने विकास होऊ शकतो.त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे ओळखा

मेंदूतील गाठीची लक्षणे ही तिचा प्रकार, आकार व स्थान यांवर अवलंबून असतात. काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे :

  • सतत किंवा वाढत जाणारी डोकेदुखी
  • फिट्स येणे
  • मळमळ आणि उलट्या होणे
  • दृष्टी धूसर होणे किंवा दुहेरी दिसणे
  • बोलण्यात किंवा स्मरणशक्तीत अडचण येणे
  • वर्तनामध्ये किंवा स्वभावात बदल होणे
  • संतुलन आणि हालचालींमध्ये अडचणी येणे
  • हात-पायांमध्ये अशक्तपणा किंवा संवेदना कमी होणे
  • जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर न थांबणारी आणि तीव्र डोकेदुखी होत असेल, तर ही डोकेदुखी सामान्य नसू शकते. ब्रेन ट्यूमरमुळे मेंदूमध्ये दाब वाढतो, ज्याचा परिणाम रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर जाणवतो.
  • झोप असूनही थकल्यासारखं वाटणं किंवा रात्री वारंवार जागं होणं हेही लक्षणं गंभीर असू शकतात. झोपेशी संबंधित हे बदल सातत्याने होत असतील, तर ते केवळ मानसिक तणाव नसून, मेंदूतील काही बिघाडाचं संकेत असू शकतात.

अशी कोणतीही न्यूरोलॉजिकल लक्षणे सातत्याने जाणवत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

उपचारांतील आधुनिक प्रगती

ब्रेन ट्यूमरच्या उपचारांमधील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे उशिरा होणारे निदान अनेकदा मायग्रेन, ताणतणाव किंवा सामान्य थकवा यांसारख्या समस्यांच्या सुरुवातीच्या लक्षणांमुळे हा विकार समजून घेताना गोंधळ होतो. त्यामुळे या आजाराविषयी जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, मेंदूतील गाठींमध्ये सौम्य आणि घातक, असा फरक असला तरी दोन्ही प्रकारांमध्ये तातडीने वैद्यकीय तपासणी आणि योग्य उपचारांची आवश्यकता असते. आधुनिक वैद्यकीय प्रगती, वेळेवर निदान आणि जनजागृती यांच्या मदतीने रुग्णांचे आयुष्य आणि जीवनमान अधिक चांगले होऊ शकते.