Breast Cancer Myths and 5 Warning Signs: स्तनाचा कर्करोग हा महिलांच्या आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा विषय आहे. स्तनाच्या कर्करोगाबाबत समाजात अनेक गैरसमज प्रचलित आहेत. काळ्या रंगाची ब्रा घातल्याने कर्करोग होतो, घट्ट ब्रा वापरल्याने स्तनांमध्ये विषारी घटक साचतात किंवा रात्री ब्रा घालून झोपल्याने कर्करोगाचा धोका वाढतो, असे दावे अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? महिलांनी अशा गोष्टींमुळे घाबरून जाण्याची गरज आहे का? याबाबत स्तनाच्या कर्करोगावरील शल्यचिकित्सकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर स्तनांमध्ये दिसणारी कोणती पाच लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
ऑक्टोबर हा स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी समर्पित महिना आहे. या काळात महिलांना या आजाराची लक्षणे, वेळेवर निदान आणि वैद्यकीय तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. अनेकदा कर्करोगाविषयीच्या चुकीच्या माहितीमुळे महिला अनावश्यक चिंता करतात; तर काही वेळा प्रत्यक्ष लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे गैरसमज दूर करून योग्य माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
काळी ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होतो का?
काळ्या रंगाची ब्रा वापरल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो असा समज काही महिलांमध्ये आढळतो. मात्र, ब्राच्या रंगाचा आणि स्तनाच्या कर्करोगाचा संबंध असल्याचे कोणतेही विश्वासार्ह वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत, त्यामुळे केवळ काळ्या रंगाची ब्रा वापरल्यामुळे कर्करोग होईल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही.
गुरुग्राम येथील सी. के. बिर्ला रुग्णालयातील स्तनाच्या कर्करोगावरील शल्यचिकित्सक आणि द ब्रेस्ट सेंटरचे संचालक डॉ. रोहन खंडेलवाल यांनी या गैरसमजांबाबत वैद्यकीय दृष्टिकोनातून स्पष्टीकरण दिले आहे.
घट्ट किंवा अंडरवायर असलेली ब्रा वापरल्याने धोका वाढतो?
घट्ट ब्रा किंवा अंडरवायर असलेली ब्रा वापरल्याने स्तनांमधील लसिकेचा प्रवाह अडतो आणि त्यामुळे शरीरात विषारी घटक साचून कर्करोग होतो असा दावा केला जातो. मात्र, या दाव्याला वैज्ञानिक संशोधनाचा ठोस आधार नाही.
डॉ. रोहन खंडेलवाल यांच्या मते, ब्रा वापरणे आणि स्तनाचा कर्करोग होणे यांच्यात थेट संबंध असल्याचे संशोधनातून सिद्ध झालेले नाही. मात्र, चुकीच्या मापाची किंवा खूप घट्ट ब्रा वापरल्याने त्वचेवर घर्षण होणे, लालसरपणा, दाबाच्या खुणा आणि अस्वस्थता यांसारखे त्रास होऊ शकतात, त्यामुळे शरीराला योग्य मापाची आणि आरामदायी ब्रा निवडणे महत्त्वाचे आहे.
रात्री ब्रा घालून झोपल्याने कर्करोग होतो का?
दिवसभर ब्रा वापरल्यानंतर रात्री झोपताना ती काढावी की नाही, याबाबत अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतात. काही जणी रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो असे ऐकून चिंतेत पडतात. मात्र, रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तनाचा कर्करोग होतो, याचा विश्वासार्ह वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
डॉक्टरांच्या मते, रात्री ब्रा घालून झोपायचे की नाही हा वैयक्तिक आरामाचा विषय आहे. काही महिलांना स्तनांमध्ये संवेदनशीलता किंवा दुखण्याचा त्रास असल्यास मऊ आणि योग्य मापाची ब्रा वापरल्याने आराम मिळू शकतो. तर काही महिलांना ब्रा न घालता झोपणे अधिक सोयीचे वाटते, त्यामुळे याबाबत कोणताही एक नियम सर्व महिलांना लागू होत नाही.
स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ५ लक्षणे दुर्लक्षित करू नका!
ब्रा कोणत्या रंगाची आहे किंवा रात्री ती घालून झोपता का, यापेक्षा स्तनांमध्ये होणारे असामान्य बदल ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. स्तनाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीच वेदना निर्माण करतो असे नाही, त्यामुळे खालील लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे.
१. स्तनात किंवा काखेत गाठ जाणवणे : स्तनात किंवा काखेत नव्याने गाठ जाणवू लागल्यास तिची तपासणी करून घ्यावी. प्रत्येक गाठ कर्करोगाचीच असते असे नाही; मात्र तिचे कारण केवळ स्पर्शावरून ठरवता येत नाही.
२. स्तनाचा आकार किंवा ठेवण बदलणे : एका स्तनाच्या आकारात, आकारमानात किंवा ठेवणीत अचानक बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
३. त्वचेवर असामान्य बदल दिसणे : स्तनाच्या त्वचेवर खळगा पडणे, सुरकुतल्यासारखी त्वचा दिसणे किंवा संत्र्याच्या सालीसारखा पृष्ठभाग जाणवणे ही तपासणी करून घेण्याची कारणे असू शकतात.
४. स्तनाग्रांमध्ये बदल होणे : स्तनाग्र आत ओढले जाणे, त्याभोवती नवीन पुरळ किंवा चट्टा दिसणे अथवा रक्तमिश्रित स्राव येणे, अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
५. सूज किंवा सतत अस्वस्थता जाणवणे : स्तनात सतत सूज, अस्वस्थता किंवा इतर असामान्य बदल जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः अशा त्रासासोबत इतर लक्षणेही दिसत असतील तर वैद्यकीय तपासणी महत्त्वाची ठरते.
स्तनांमध्ये बदल जाणवल्यास डॉक्टरांकडे कधी जावे?
स्तनात नवीन गाठ जाणवणे, त्वचेचा रंग किंवा पोत बदलणे, स्तनाग्रांमधून असामान्य स्राव येणे किंवा स्तनाच्या आकारात बदल होणे, यांसारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेदना होत नसल्या तरी अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नये.
डॉ. रोहन खंडेलवाल यांच्या मते, स्तनांमध्ये जाणवणाऱ्या कोणत्याही नवीन किंवा असामान्य बदलाची डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे, तो बदल वेदनारहित असला तरीही. तपासणीतील निष्कर्षांनुसार डॉक्टर स्तनांची अल्ट्रासाऊंड तपासणी, मॅमोग्राफी किंवा आवश्यक असल्यास बायोप्सी करण्याचा सल्ला देऊ शकतात.
लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग नव्हे. मात्र, गाठीचे नेमके कारण तपासणीशिवाय समजू शकत नाही, त्यामुळे स्वतःच निष्कर्ष काढण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते.
(महत्त्वाची सूचना : ही बातमी केवळ जनजागृतीसाठी आहे. स्तनांमध्ये कोणताही असामान्य बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित वैद्यकीय तपासणी आणि वेळेवर निदान यामुळे उपचारांचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते.)
