Breathing Difficulty : पायऱ्या चढणं हा केवळ चांगला व्यायामच नाही, तर तो आपले हृदय आणि फुप्फुसाचे आरोग्य किती चांगल्या स्थितीत आहे हे प्रतिबिंबित करतो. पण, हल्ली प्रौढांपासून तरुणांनाही काही पायऱ्या चढल्यानंतर अस्वस्थता जाणवते, धाप लागते. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल, तर काळजी करू नका. याबाबत प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर व आहारतज्ज्ञ सोनिया बक्षी यांनी सविस्तर उपाय सांगितले आहेत. (Why Are You Breathless After Climbing Stairs)
जिना चढणे ही एक शारीरिक क्रिया आहे, ज्यामध्ये शरीराच्या अनेक अवयवांना एकत्र काम करावे लागते. त्याची मुख्य कारणे अशी आहेत.
बसण्यापेक्षा पायऱ्या चढताना नऊ पट जास्त ऊर्जा लागते. कारण- गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात तुमचे शरीराचे वजन वरच्या दिशेने हलविण्यासाठी तुमचे हृदय आणि फुप्फुसांना जास्त काम करावे लागते. पायऱ्या चढताना तुमच्या पायांमधील मोठ्या स्नायूंचा सक्रियतेने वापर केला जातो, ज्यामुळे ऑक्सिजनची अधिक गरज लागते. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करत नसाल, तर सहनशक्तीच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हृदयरोग, फुप्फुसांच्या समस्या, उच्च रक्तदाब किंवा वातावरणात असलेली धूळ ही याची मुख्य कारणे असू शकतात. नाक अडथळा किंवा खूप पायऱ्या चढण्याचा ताण यांमुळेही श्वास घेण्यास त्रास होण्याची प्रक्रिया वेगवान होते. कधी कधी खूप जास्त पायऱ्या चढण्याचा ताण किंवा चिंतादेखील श्वास घेण्यास त्रास देते.
सहनशक्ती आणि ताकद वाढवण्यासाठी उपाय
पायऱ्या चढताना त्रास होऊ नये यासाठी फिटनेस ट्रेनर शरीराच्या खालच्या भागाला बळकटी देण्याची आणि फुप्फुसांची क्षमता वाढवण्याची शिफारस करतात.
पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास चालण्याचे फायदे
चालण्यापासून सुरुवात करा – पहिले दोन आठवडे तुमच्या शरीराला सामान्य पद्धतीने चालण्याने स्वत:ला तयार करा.
इंटरव्हल ट्रेनिंग: तिसऱ्या आठवड्यापासून एक मिनीट चाला आणि त्यानंतर १० सेकंद जॉगिंग करा. पुढील दोन आठवडे असे करा. हळूहळू जॉगिंगचा वेळ २० सेकंदांपर्यंत वाढवा.
स्क्वॅट्स – दररोज २० स्क्वॅट्सनी सुरुवात करा आणि हळूहळू ते दोन महिन्यांत २०-२० असे तीन सेटपर्यंत वाढवा.
सुमो स्क्वॅट्स – तुमच्या पायांच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी तुमच्या व्यायामात याचा समाविष्ट करा .
पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास करा ‘हा’ व्यायाम
कार्डिओ आणि अॅरोबिक क्षमता
फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी अॅरोबिक व्यायाम खूप प्रभावी आहेत
जलद चालणे आणि सायकलिंग.
पोहणे किंवा हायकिंगसारखे कार्डिओ व्यायाम.
झुंबा किंवा अॅरोबिक्सचे क्लास
जिममध्ये ट्रेडमिल किंवा क्रॉस ट्रेनरचा वापर
तुमच्या पायांचे स्नायू जितके मजबूत असतील तितके तुमचे हृदय व रक्तवाहिन्यांची शक्ती चांगली असते. त्यामुळे पायऱ्या चढणे तितके सोपे जाते..
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
पायऱ्या चढताना थोडासा श्वास घेण्यास त्रास होणे सामान्य आहे; परंतु काही परिस्थितींमध्ये ते एक धोक्याचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि तुमचा श्वास सामान्य होण्यास बराच वेळ लागला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
अशा परिस्थितीत हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला काही विशेष औषध किंवा उपचारांची आवश्यकता आहे का, हे तो काही आवश्यक चाचण्या करून तपासेल.

