उवाल्डे (टेक्सास, अमेरिका) : येथील एका शाळेत एका माथेफिरू तरुणाने केलेल्या गोळीबारात या शाळेतील १९ विद्यार्थ्यांसह ज्या दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता, त्यात इर्मा गार्सिया या शिक्षिकेचा समावेश होता. गार्सिया यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी त्यांचे पती जो गार्सिया यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ने झाला असे निदान डॉक्टरांनी केले. डॉक्टरांच्या निदानानुसार एखाद्या अतीव शोकात्म घटनेनंतर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’मुळे होऊ शकतो. हा दुर्मीळ प्रकार हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणे भासतो, असे हृदयविकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जो गार्सिया यांना त्यांच्या पत्नीच्या हत्येचा धक्का बसूनच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे त्यांचे मत आहे.
‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’मध्ये काय घडते? –
हृदयविकाराचा झटका हा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांतील अडथळय़ांमुळे हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने येतो. ज्या व्यक्तींत ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ घडतो, त्यांच्या ताणामुळे निर्माण होणारी ‘अॅड्रिनिल’सारखी संप्रेरके खूप मोठय़ा प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे हृदय योग्यरीत्या आकुंचित होण्यास या संप्रेरकांमुळे प्रतिबंध होतो. या स्थितीला वैद्यकीय परिभाषेत ‘टाकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी’ म्हणतात. अपघात, मोठा आर्थिक तोटा- मालमत्तेचे मोठे नुकसान, अतिप्रिय व्यक्तीचा अनपेक्षित मृत्यू अशा अचानक तणाव वाढवणाऱ्या दुर्घटना घडल्याने एखाद्याला ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ घडू शकतो. काही व्यक्तींना अशा घटनेनंतर काही मिनिटांत हा त्रास होतो. तर काही व्यक्तींना या घटनेचे अटळ दुष्परिणाम जाणवू लागल्यानंतर काही तास किंवा एक-दोन दिवसांनीही हा त्रास होतो. मोठय़ा बक्षिसाची लॉटरी लागण्यासारखी एखादी खूप आनंददायी घटना अचानक घडल्यानेही ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ घडू शकतो.
अतिव्यायामानंतरही हा त्रास होण्याची शक्यता असते. भावनिक-शारीरिक ताणामुळेच सर्व ‘कार्डिओमायोपॅथी’चे प्रकार घडत नसले तरी दोनतृतीयांश वेळा ही शक्यता असते. दुर्घटनांनंतर संबंधित व्यक्तीच्या छातीत अस्वस्थता, धाप लागण्याची लक्षणे दिसू लागल्यास ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ असू शकतो. कधी कधी कोणतीही लक्षणे दिसतही नाहीत. हृदयविकाराचा झटका आहे की ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’चे निदान वैद्यकीय तज्ज्ञ हृदयाच्या तपासणीद्वारे करून, उपचारांची दिशा ठरवतात. ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’मध्ये रक्तवाहिन्यांत अडथळे नसल्याने औषधोपचारांनी रुग्णास बरे करता येते. यात एक टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. वेळीच उपाय झाले तर हृदयाचे मोठे नुकसान न होता रुग्ण महिनाभरात बरा होतो. त्यामुळे अशा दुर्घटना सहन करण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवणे, योग्य आहार-विहार व निद्रा राखणे नितांत गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
