नववर्षाच्या सुरूवातीचा जानेवारी महिना वर्षभरासाठी नवे संकल्प, नवी उद्दिष्टे आणि नव्या स्वप्नांची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ओळखला जातो. मात्र, याच जानेवारी महिन्यात सर्वाधिक ब्रेकअप्स होतात, हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. ब्रिटनमध्ये नुकत्याच १८ आणि त्यावरील वयोगटातील १८८१ स्त्री आणि पुरूषांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. यामधील प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी ब्रेकअपला सामोरे जावे लागले होते. सर्वेक्षणादरम्यान, प्रत्येक पाचव्या व्यक्तीने जानेवारी महिन्यातच आपल्याला प्रिय व्यक्तीपासून दुरावण्याचा कटू अनुभव आल्याचे सांगितले.
तर, ‘जनरल ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’च्या अभ्यासानुसार, प्रेमभंगाचा अनुभव घेतलेले मन पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे स्पष्ट झाले. या अभ्यासादरम्यान, नुकताच प्रेमभंग झालेल्या १५५ प्रौढ व्यक्तींचे अनुभव नोंदविण्यात आले. यापैकी अनेकजणांनी काही दिवसानंतर आपण सकारात्मक विचार करायला शिकल्याचे सांगितले. ‘या अनुभवामुळे मला स्वत:बद्दल बरेच काही शिकायला मिळाले’, ‘प्रेमभंगामुळे एक व्यक्ती म्हणून माझा विकास झाला’, ‘माझी उद्दिष्टे आता खूपच स्पष्ट झाली आहेत’, असे अनेक सकारात्मक अनुभव या लोकांकडून ऐकायला मिळाले. प्रेमभंग झाल्यानंतर एखादी व्यक्ती आयुष्याविषयी पूर्वीपेक्षा अधिक सकारत्मकतेने विचार करायला शिकते, असा निष्कर्षही या अभ्यासातून पुढे आला.