Brown Rice Benefits: हल्ली फिटनेसप्रेमींमध्ये लाल तांदळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते आरोग्यदायी आहार घेण्यापर्यंत अनेक कारणांसाठी लोक पांढऱ्या तांदळाऐवजी लाल तांदळाची निवड करीत आहेत. लाल तांदळाचा रंग त्यामध्ये असलेल्या अँथोसायनिन्ससारख्या नैसर्गिक रंगद्रव्यांमुळे असतो. त्यामध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि काही बी जीवनसत्त्वे आढळतात. विशेष म्हणजे लाल तांदळाचे बाहेरील तंतुमय आवरण टिकून असल्यामुळे त्यातून शरीराला फायबर मिळते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होऊ शकते. नियमित व्यायाम करणारे लोक ऊर्जा मिळवण्यासाठीही आहारात लाल तांदळाचा समावेश करतात.
ब्राऊन राईस हा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानला जात असला तरी तो प्रत्येकासाठीच योग्य असेल, असे नाही. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये तंतू आणि काही खनिजे अधिक असतात. त्यामुळे फिटनेसप्रेमी आणि वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणारे लोक त्याला पसंती देतात. मात्र, काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी ब्राऊन राईस खाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण- प्रत्येक व्यक्तीची पचन क्षमता, आरोग्यस्थिती आणि पोषणाची गरज वेगवेगळी असते.
कोणासाठी ब्राऊन राईस घातक किंवा अयोग्य ठरू शकतो?
किडनीचे आजार असलेल्या व्यक्ती
ब्राऊन राईसमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. किडनीचे कार्य कमी झाल्यास शरीरातील या खनिजांचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे किडनीचा प्रगत आजार असलेल्या किंवा रक्तातील पोटॅशियम आणि फॉस्फरस वाढलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ब्राऊन राईस खावा.
पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्ती
ब्राऊन राईसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काही लोकांना गॅस, पोट फुगणे, पोटदुखी किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल जाणवू शकतो. विशेषतः संवेदनशील पचनशक्ती असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
आतड्यांचे आजार असलेल्यांनी
आतड्यांच्या काही आजारांमध्ये किंवा आजाराच्या तीव्र स्वरूपाच्या टप्प्यात डॉक्टर कमी फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत ब्राऊन राईसऐवजी पांढरा तांदूळ अधिक योग्य ठरू शकतो.
लहान मुले
लहान मुलांच्या आहारात विविध धान्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. ब्राऊन राईसमध्ये अकार्बनिक आर्सेनिकचे प्रमाण पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक असू शकते. त्यामुळे लहान मुलांना रोज केवळ ब्राऊन राईस देण्याऐवजी वेगवेगळ्या धान्यांचा आहार द्यावा.
कमी तंतूयुक्त आहार घेणाऱ्या व्यक्ती
काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये डॉक्टर कमी तंतूयुक्त आहार सुचवतात. अशा व्यक्तींना ब्राऊन राईसपेक्षा पांढरा तांदूळ पचण्यास सोपा ठरू शकतो.
पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी करणाऱ्या व्यक्ती
काही शस्त्रक्रियांनंतर आतड्यांना आराम मिळावा म्हणून काही काळ कमी फायबरयुक्त आहार दिला जातो. अशा वेळी डॉक्टरांच्या आहार सूचनेनुसारच तांदळाची निवड करावी.
