टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड प्राइस वॉर सुरू आहे. दररोज प्रत्येक कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करत त्यांना खूश करायचे ठरवले आहे. मागच्या काही दिवसांपासून कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षक प्लॅन देण्याचा धमाका लावला आहे. या नव्या प्लॅनमध्ये युजर्सला कंपनीकडून अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, १०० एसएमएस आणि त्याचबरोबर फ्री personalized ring back tone (PRBT) सुविधा १० दिवसांसाठी देण्यात येत आहे. बीएसएनएलची ही ऑफर होम सर्कल आणि नॅशनल रोमिंग दोन्हीसाठी उपलब्ध आहे. मात्र अजूनही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिल्ली आणि मुंबईत सुरु झालेली नाही. या प्लॅनची किंमत आहे ३९ रुपये.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ३४९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे. याची वैधता ५४ दिवसांची असून यामध्ये दिवसाला १ जीबी डेटा देण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉलिंगबरोबरच दररोज १०० मेसेज मोफत दिले जाणार आहेत. याशिवाय बीएसएनएलने अलिकडेच ९९ आणि ३१९ रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण देशातील कोणत्याही नेटवर्कवर २६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. तर ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची मोफत सुविधा मिळत आहे. मात्र यात एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

बीएसएनएलने रिलायन्स जिओच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आपला हा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. जिओने आपल्या ४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्ससाठी फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. यात १ जीबी ४ जी डेटाची सुविधा ४९ रुपयांत मिळत आहे. याची वैधता १ महिना इतकी आहे. ही ऑफर फक्त जिओ फोन युजर्ससाठी व्हॅलिड आहे. बीएसएनएलच्या फायबर ब्रॉडब्रॅंड सेवेला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओकडून जिओ फायबर लॉंच करण्याची तयारी सुरु आहे.