Burning after Pee: महिलांमध्ये लघवी करताना जळजळ होणे (Dysuria) किंवा वारंवार संसर्ग होणे ही अतिशय सामान्य, पण त्रासदायक समस्या आहे. अनेक महिला ही समस्या साधी समजून तिच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपाय करू लागतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असतो. तज्ज्ञ युरोलॉजिस्टांच्या मते, महिलांमध्ये होणाऱ्या या त्रासामागे शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI), तसेच वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यांसारखी अनेक गंभीर कारणे असू शकतात.
नवी दिल्लीतील मालवीय नगर येथील VNA हॉस्पिटलमधील युरोलॉजी आणि अँड्रोलॉजी विभागाचे संचालक डॉ. विनीत मल्होत्रा यांनी जनसत्ताशी बोलताना सांगितले की, वारंवार लघवी होणे किंवा लघवी करताना जळजळ होणे अशा तक्रारींकडे अनेक महिला केवळ UTI समजून दुर्लक्ष करतात किंवा स्वतःहून औषधे घेण्यास सुरुवात करतात. त्यामुळे मूत्राशयाशी (ब्लॅडर) संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
डॉ. मल्होत्रा यांनी सांगितले की, महिलांमध्ये लघवी करताना जळजळ होण्यामागे फक्त UTI हेच कारण नसते, तर त्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. चला, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की महिलांमध्ये लघवी करताना जळजळ होण्याची नेमकी कोणती कारणे असू शकतात आणि कोणते उपाय केल्यास या समस्येपासून आराम मिळू शकतो.
महिलांमध्ये लघवी करताना जळजळ होण्याची कारणे
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)
महिलांमध्ये लघवी करताना जळजळ होण्यामागे UTI हे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. यासोबत वारंवार लघवी होणे, सतत लघवीची तीव्र इच्छा होणे, लघवीला दुर्गंधी येणे किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात.
शरीरात पाण्याची कमतरता
कमी पाणी पिणे हेही महिलांमध्ये लघवी करताना जळजळ होण्याचे एक कारण असू शकते. कमी पाणी प्यायल्यामुळे लघवी अधिक दाट होते, त्यामुळे जळजळ जाणवू शकते.
योनीमध्ये संसर्ग होणे
फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस झाल्यास जळजळीसोबत खाज येणे, असामान्य स्त्राव (डिस्चार्ज) होणे किंवा दुर्गंधी येऊ शकते.
लैंगिक संबंधांमुळेही जळजळ होऊ शकते
महिलांमध्ये लैंगिक संबंधांनंतर मूत्रमार्गात जळजळ होणे किंवा UTI होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लघवी करताना जळजळ होणे आणि वारंवार लघवी लागण्याची समस्या उद्भवू शकते.
स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमुळे जळजळ होणे
अनेक महिला योनीची स्वच्छता करण्यासाठी सुगंधी साबण, इंटिमेट वॉश, स्प्रे किंवा इतर रासायनिक उत्पादने वापरतात. ही उत्पादने संवेदनशील त्वचेला त्रास देऊ शकतात आणि त्यामुळे लघवीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
किडनी किंवा मूत्राशयात खडे असणे
काही वेळा किडनी किंवा मूत्राशयातील खड्यांमुळे लघवी करताना जळजळ होण्यासोबत तीव्र वेदना होऊ शकतात किंवा लघवीत रक्तही येऊ शकते.
लैंगिक संबंधातून पसरणारा संसर्ग (STI)
लैंगिक संसर्ग (STI) झाल्यास लघवी करताना जळजळ होणे, असामान्य स्त्राव होणे किंवा जननेंद्रियामध्ये वेदना जाणवू शकतात.
मेनोपॉजदरम्यान होणारे बदल
शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण कमी झाल्यामुळे योनी आणि मूत्रमार्गाभोवतीचे ऊतक अधिक संवेदनशील आणि कोरडे होतात. त्यामुळे जळजळ होणे किंवा वारंवार लघवी लागण्याची समस्या उद्भवू शकते.
काही औषधे किंवा खाद्यपदार्थही ठरू शकतात कारण
काही औषधे तसेच खूप तिखट किंवा आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे काही लोकांमध्ये मूत्राशयाची जळजळ वाढू शकते. जळजळीसोबत ताप, कंबरदुखी, पाठदुखी, लघवीत रक्त येणे, उलटी होणे किंवा तीव्र वेदना होत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार होणाऱ्या जळजळीला केवळ पाण्याची कमतरता समजून दुर्लक्ष करू नये.
लघवी करताना जळजळ होत असल्यास महिलांनी कोणते घरगुती उपाय करावेत?
भरपूर पाणी प्या
दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने लघवी पातळ होते आणि मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर पडण्यास मदत होते. क्रॅनबेरी ज्यूस पिल्याने विशेषतः ई. कोलाई (E. coli) बॅक्टेरिया मूत्राशयाच्या भिंतीला चिकटण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते.
हीटिंग पॅडने शेक घ्या
पोटावर किंवा पोटाच्या खालच्या भागावर कोमट हीटिंग पॅड ठेवल्याने मूत्राशयावरील ताण आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते. हीटिंग पॅडने शेक घेतल्यास काही वेळासाठी आराम मिळू शकतो. मात्र, हे सिस्टायटिस (Cystitis) वर उपचार नाही आणि त्यामुळे संसर्गही बरा होत नाही. लक्षणे सतत कायम राहिल्यास त्यामागील कारण तपासून योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
प्रोबायोटिक पदार्थांचा आहारात समावेश करा
लघवी करताना जळजळ होत असल्यास आहारात प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा. दही किंवा इतर प्रोबायोटिक पदार्थ खाल्ल्याने मूत्रमार्ग आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत होते. प्रोबायोटिक्समधील उपयुक्त बॅक्टेरिया शरीरातील मायक्रोबायोमला आधार देतात. दहीसारखे प्रोबायोटिक पदार्थ रोजच्या आहाराचा भाग असू शकतात, मात्र केवळ दही किंवा प्रोबायोटिक्स खाल्ल्याने सिस्टायटिस बरा होत नाही. बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे.
लघवी करताना जळजळ होत असल्यास कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
डॉक्टरांच्या मते, काही खाद्यपदार्थ आणि पेये काही लोकांमध्ये मूत्राशयाची जळजळ किंवा लघवीशी संबंधित त्रास वाढवू शकतात. यामध्ये अतितिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, जास्त प्रमाणात चहा-कॉफी, कोल्ड ड्रिंक्स आणि मद्यपान यांचा समावेश होतो. अशी लक्षणे असल्यास या पदार्थांचे सेवन कमी केल्याने काही लोकांना आराम मिळू शकतो. मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याकडेही विशेष लक्ष द्यावे.
बचावासाठी महत्त्वाच्या गोष्टी
- वैयक्तिक स्वच्छतेची (हायजीन) योग्य काळजी घ्या. टॉयलेट पेपर वापरताना नेहमी पुढून मागे अशा दिशेने स्वच्छता करा, त्यामुळे गुदद्वाराजवळील बॅक्टेरिया मूत्रमार्गात जाण्याचा धोका कमी होतो आणि संसर्ग टाळता येतो.
- लघवी जास्त वेळ रोखून ठेवू नका. लघवीची भावना होताच लगेच लघवी करा.
- सूती (कॉटन) अंतर्वस्त्रे वापरा. खूप घट्ट कपड्यांऐवजी सैल आणि सूती अंतर्वस्त्रे घातल्याने अधिक आराम मिळतो.
घरगुती उपायांमुळे केवळ लक्षणांमध्ये काही प्रमाणात आराम मिळू शकतो. मात्र, सक्रिय बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स घेणे आवश्यक असते. जर तीव्र ताप, कंबरदुखी किंवा लघवीत रक्त दिसत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तातडीने डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
लघवी करताना जळजळ होणे किंवा वारंवार लघवी लागण्यासोबत ताप, थंडी वाजणे, कंबरदुखी, पाठदुखी, उलटी, लघवीत रक्त येणे, खूप अशक्तपणा जाणवणे किंवा लक्षणे झपाट्याने वाढत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः गर्भवती महिला, मधुमेह असलेले रुग्ण आणि ज्यांना वारंवार UTI किंवा सिस्टायटिसचा त्रास होतो, त्यांनी डॉक्टरांकडे जाण्यास अजिबात उशीर करू नये.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
