Cabbage Is Good Or Bad: कोबीची भाजी म्हटलं की आपल्यापैकी बरेच जण नाक मुरडतात. पण कोबीचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. कोबीची रचना ही कांद्यासारखीच असते. मात्र ती फ्लॉवर किंवा ब्रोकोली यांच्याशी संबंधित नाही. कोबी या भाजीबाबत अनेकांमध्ये गैरसमज देखील आहेत. काही जण त्यामुळेच त्याचे सेवन करण्यास घाबरतात. वनस्पतीशास्त्रानुसार, कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली हे सर्व एकाच क्रुसिफेरे कुटुंबातील आहेत. कोबी बटाट्यासह किंवा वेगळी भाजी बनवली जाते. त्याचे कोफ्ते देखील केले जातात. त्याचा चायनीज पदार्थांमध्येही आवर्जून वापर केला जातो.

नूडल्स बनवताना ते हलके तळलेले, अर्धे कच्चे आणि अर्धवट शिजवलेले असतात. हलके तळणे आरोग्यासाठी चांगले असले तरी नूडल्स रिफाइंड मैद्यापासून बनवलेले असतात आणि रिफाइंड तेलात तळले जातात. त्यामुळे खाण्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कमी पाण्याने स्वच्छ न धुतलेला कोबी नूडल्समध्ये घातल्याने धोका निर्माण होऊ शकतो. कोबी जिथे कच्चा किंवा कमी शिजवलेला वापरला जातो, तिथे काळजीपूर्वक स्वच्छ करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. तो गरम पाण्यात धुतला पाहिजे. बऱ्याचदा सॅळडमध्येही कोबी कच्चाच वापरला जातो. त्यामुळे कोबी नेमका कसा खावा, की खाऊ नये तसंच त्याचे आरोग्यासाठीचे फायदे काय आहेत याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

१०० ग्रॅम कोबीमधील पोषक घटक

Award Banner
  • २५ कॅलरीज
  • प्रोटीन १.३ ग्रॅम
  • फायबर २.५ ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी ३६.६ मिग्रॅ
  • व्हिटॅमिन के ७६ मायक्रोग्रॅम
  • फोलेट ४३ मायक्रोग्रॅम
  • कॅल्शियम ४० मिग्रॅ
  • पोटॅशियम १७० मिग्रॅ
  • अँटीऑक्सिडंट्स- फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल्स, सल्फर संयुगे, अँथोसायनिन्स (लाल कोबीमध्ये आढळतात)

हृदय आणि त्वचेसाठी उत्तम

कोबी फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाणही चांगले असते. कॅलरीज कमी असल्याने कोबी हृदयासाठी, कोलेस्ट्र्ॉल कमी करण्यासाठी, त्वचेसाठी, मुक्त रॅडिकल्स (शरीरात पचनादरम्यान तयार होणारे हानिकारक कण) कमी कऱण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील उत्तम आहे. सॅलडमध्ये कोबीचा जास्तीत जास्त आतला भाग वापरला जातो. त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीच्या रूग्णांना कोबी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कोबी खायचा असेल तर तो उकळून घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

या समस्या असलेल्यांनी कोबी खाणे टाळावे

  • कोबीमध्ये रॅफिनोज नावाचे कार्बोहायड्रोट असते. ते पोटात गॅस तयार करू शकते. ज्यांना वारंवार पोटफुगी किंवा गॅसची समस्या असते त्यांनी कोबी खूप कमी प्रमाणात खावा. थोडासा उकळल्यानंतर कोबीचे सेवन केल्यास या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात. उकळल्याने कोबीमधील टेपवर्म्स देखील मरतात.
  • कोबीमध्ये गॉइट्रोजेनिक घटक असतात, ते आयोडिनच्या शोषणावर परिणाम करू शकतात. म्हणून हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांनी कोबी मर्यादित प्रमाणात खावा.
  • जंत किंवा टेपवर्म्स यापासून संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी कच्चा कोबी खाऊ नये. तो नेहमी शिजवून खावा.

कोबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • कोबीची पाने घट्ट बंद असावीत. त्यामुळे पानांमध्ये कीटक किंवा घाण येण्याची शक्यता कमी करतात.
  • कोबीची पाने थोडी सैल असतील, दाबल्यावर मऊ वाटत असतील तर तो बऱ्याचदा कच्चा असतो. वाढीदरम्यान योग्य पोषणाच्या अभावी योग्यरित्या तयार नसतो. रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे लिव्हर आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
  • कोबी चमकदार रंगाची, डाग किंवा बुरशी नसलेली असावी. वरचा थर ताजा असावा. पाने वाळलेली नसावीत.
  • कोबी आकार मोठा मात्र वजन कमी असेल तर तो घेऊ नये.
  • कोबीमध्ये छिद्रे दिसली तर अजिबात घेऊ नका.

कोबी स्वयंपाकात वापरताना काय काळजी घ्यावी?

  • शिजवलेल्या भाज्यांचे पौष्टिक मूल्य काहीसे कमी होऊ शकते, मात्र जंत किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी असतो.
  • कोबी गरम पाण्यात १० मिनिटे भिजवल्याने टेपवर्मची अंडी मरतात.
  • उकळत्या पाण्यात ठेवल्यास कोबीची पाने आकुंचन पावतात. ती पुन्हा ताजी करण्यासाठी पुन्हा बर्फाच्या थंड पाण्यात ५ मिनिटे भिजवा.
  • कोबीचे बाहेरील आवरण काढून टाका. कापण्यापूर्वी जास्त प्रेशर असलेल्या पाण्याखाली धुतल्याने संसर्गाचा धोका कमी होईल.
  • टेपमवर्मचा संसर्ग कधीकधी मेंदूमध्ये पसरू शकतो, त्यामुळे न्यूरोसिस्टिसकोसिस म्हणजेच झटके, मळमळ आणि दृष्टी समस्या) होण्याची शक्यता असते. योग्य पद्धतीने स्वच्छ न केल्यास इतर भाज्या आणि हिरव्या भाज्यांमध्ये हा धोका असतो.
  • कोबीतील टेपमवर्मची अंडी मारण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता.