Calcium Rich Drinks: मजबूत हाडे, दात आणि स्नायू व्यवस्थित काम करण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे. कॅल्शियमची कमतरता झाल्यास हाडे कमकुवत होऊ लागतात आणि थकवा तसेच सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
म्हणूनच, आपल्या रोजच्या आहारात काही पौष्टिक आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली पेये समाविष्ट करणे खूप फायदेशीर ठरते. ही पेये केवळ शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत करत नाहीत, तर शरीराला ऊर्जा आणि ताकदही देतात. चला जाणून घेऊया शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवणाऱ्या काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल.
शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी ड्रिंक्स
दूध- दूध हे कॅल्शियमचे सर्वात चांगले आणि नैसर्गिक स्रोत मानले जाते. एका ग्लास दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. दूध फोर्टिफाइड असेल, तर त्यामध्ये व्हिटॅमिन-डीही असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. रोज सकाळी किंवा रात्री एक ग्लास दूध प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत होते.
बदामाचे दूध- बदामापासून तयार केलेले दूध कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन-ई आणि हेल्दी फॅट्सने भरपूर असते. हे हाडे मजबूत करण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर असते.
ताक- ताक हे हलके आणि पचनासाठी खूप चांगले पेय आहे. यामध्ये कॅल्शियमसोबतच प्रोबायोटिक्सही असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात रोज एक ग्लास ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि कॅल्शियमची कमतरताही भरून निघण्यास मदत होते.
तिळाचे दूध- तीळ हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. तीळ भिजवून आणि वाटून तयार केलेले दूध शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास खूप मदत करते. हे हाडे मजबूत करण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यासही उपयुक्त ठरू शकते.
सोया मिल्क- सोया मिल्कमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. हे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे. नियमितपणे सोया मिल्क प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या आहे, त्यांच्यासाठी हे दूध उत्तम पर्याय आहे.
नाचणी माल्ट ड्रिंक- नाचणीला कॅल्शियमचा खजिना म्हटले जाते. नाचणीपासून तयार केलेले माल्ट ड्रिंक शरीराला ताकद देण्यासोबतच हाडे मजबूत करण्यास मदत करते. लहान मुले, महिला आणि वृद्धांसाठी हे पेय विशेषतः खूप फायदेशीर मानले जाते.
खजूर आणि दुधाचे ड्रिंक- खजूर आणि दूध यांचे मिश्रण एक पौष्टिक पेय आहे. यामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि भरपूर ऊर्जा असते. हे शरीरातील कमजोरी दूर करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
