Calcium Rich Food: लॅक्टोज इनटॉलरन्समुळे तुम्हाला दुधाचे सेवन टाळावे लागते. दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र दुधाव्यतिरिक्त असे एक धान्य आहे ज्यामध्ये दुधापेक्षा भरपूर कॅल्शियम असते. १०० ग्रॅम दुधातून जितके कॅल्शियम मिळते तितकेच कॅल्शियम तुम्हाला नाचणीतून मिळू शकते. कॅल्शियमचे सेवन केल्याने आपली हाडे आणि दात मजबूत होतात. जर तुम्हाला दूध पचत नसेल, त्याची चव आवडत नसेल किंवा दूध पिण्याची इच्छा नसेल तर तुम्ही नाचणीचे सेवन करू शकता. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि शरीरासाठी आवश्यक असलेल्या इतर पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो.

गोदरेज मेमोरियल हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ योगिता चव्हाण यांनी नाचणी हे एक कॅल्शियमने परिपूर्ण सुपरफूड असल्याचे दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले आहे. नाचणीमध्ये फायबर, पोटॅशियम, जस्त, लोह आणि मॅग्नेशियम अशी पोषक तत्वे असतात. चव्हाण यांनी स्पष्ट केले की, जे लोक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळतात ते नाचणीचे सेवन करू शकतात. ज्यांना लॅक्टोज इनटॉलरन्स आहे, त्यांच्यासाठी नाचणी हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. तर मग जाणून घेऊया की नाचणीचे सेवन केल्याने शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शियम कसे मिळते…

नाचणी सुपरफूड का आहे?

नाचणीमध्ये फायबर, पोटॅशियम, जस्त, लोह आणि मॅग्नेशियम असते. ते शरीर निरोगी ठेवते. १०० ग्रॅम नाचणीमध्ये ३६४ मिलीग्रॅम कॅल्शियम असते, तर १०० मिली गायीच्या दुधात ११८ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. जर दोन्ही पदार्थांची तुलना केली तर कॅल्शियम मिळवण्यासाठी दुधापेक्षा नाचणी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या (एनआयएन) आणि अनेक संशोधन अहवालांनुसार, दुधाच्या तुलनेत नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे. वजनाच्या बाबतीत नाचणीमध्ये दुधापेक्षा जवळपास तीन पट जास्त कॅल्शियम असते.

जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, नाचणीतील कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासाठी आणि ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी दुधासाठी अधिक प्रभावी असू शकते. दुधात फायबर नसते आणि लोह खूप कमी असते. संशोधन सांगते की, नाचणी केवळ कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत नाही तर त्यातील लोहाचे प्रमाण अ‍ॅनिमियापासूनही संरक्षण करते. तसंच त्यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते.

नाचणीचे आरोग्य फायदे

डॉ. बॅनर्जी यांनी सांगितले की, नाचणी खाल्ल्याने हाडे निरोगी राहतात. त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. वजनवाढीवर नियंत्रण करण्यास मदत होते. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी नाचणी अत्यंत फायदेशीर आहे. नाचणी खाल्ल्याने ह्रदयरोग टाळण्यास मदत होते.

नाचणी कोणत्या स्वरूपात खाऊ शकता?

चव्हाण यांनी सांगितले की, नाचणी हा सर्व वयोगटातील लोकांसाठी एक आरोग्यदायी अन्न आहे. नाचणीचे पूर्ण फायदे घेण्यासाठी नाचणीच्या पिठाचा वापर डोसा इडली, दलिया, भाकरी आणि उपमा यासह विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. नाचणी ही ग्लुटेनमुक्त बाजरी आहे. ग्लुटेन आणि दुग्धजन्य पदार्थांबद्दल संवेदशील असलेल्यांनी नाचणीचे सेवन करू नये.

आहारात नाचणीचा समावेश कसा करावा?

तज्ज्ञांच्या मते, नाचणी आहारात डोसा, इडली, दलिया, भाकरी, उपमा, पॅनकेक्स किवा पौष्टिक खिचडी, लाडू अशा विविध प्रकारे समाविष्ट करू शकता. आहारात नियमितपणे नाचणीचा समावेश केल्याने पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक खनिजे मिळतात.