Can Cracking Knuckles Cause Arthritis: कधी तुम्ही बोटं वाजवलीत का? काहींसाठी तो सवयीचा भाग, तर इतरांसाठी कानाला त्रास देणारा आवाज. पण, बहुतेक वेळा एखादी व्यक्ती बोटं कटकट वाजवते तेव्हा कुणीतरी नक्की म्हणतं, “असं करू नकोस, संधिवात होईल!” पण, खरंच का बोटं वाजवल्याने म्हणजेच बोटं मोडल्याने संधिवात होतो? की हा फक्त पिढ्यान्पिढ्या चालत आलेला गैरसमज?
अर्धशतकाहून अधिक काळ या विषयावर संशोधन झालंय, तरीसुद्धा या आवाजामागचं विज्ञान आणि त्याचे परिणाम अजूनही तितकेसे स्पष्ट नाहीत. चला तर मग जाणून घेऊया या ‘कटकट’ आवाजामागचं रहस्य काय आहे?
नेमकं काय घडतं जेव्हा आपण बोटं मोडतो?
ऑर्थोपेडिक हँड सर्जन डॉ. डॅनियल जे. गिटिंग्स यांच्या मते, “बोटं वाजवताना आपण सांध्यावर ताण आणतो, ज्यामुळे सांधा किंचित ताणला जातो आणि क्रॅक किंवा पॉप असा आवाज निर्माण होतो.”
या प्रक्रियेला कॅव्हिटेशन (Cavitation) असं म्हणतात. आपल्या सांध्यांमधील सिनोव्हियल द्रव (Synovial Fluid) म्हणजे एक ग्रीससारखं द्रव, ज्यात कार्बन डाय ऑक्साइडसारख्या वायूंचं मिश्रण असतं. जेव्हा आपण बोटं ताणतो, तेव्हा या द्रवात छोट्या हवेच्या फुग्यांची निर्मिती होते. हे फुगे क्षणात फुटतात आणि त्यातून निर्माण होतो तो ‘कटकट’ आवाज. एकदा फुगा फुटला की पुन्हा असे वायू विरघळायला आणि नवीन फुगा तयार व्हायला साधारण २० मिनिटं लागतात.
काही तज्ज्ञांच्या मते हा आवाज टेंडन (स्नायूच्या दोऱ्या) त्यांच्या मूळ जागेवर परत येतानाही निर्माण होऊ शकतो. पण, या दोन्ही सिद्धांतांना मर्यादा आहेत.
खरंच होतो का संधिवात?
डॉक्टर सांगतात, जर बोटं मोडताना वेदना होत नसतील तर काळजीचं काही कारण नाही.
ते हाडं कमजोर करत नाहीत, सांधे झिजवत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संधिवात (Arthritis) निर्माण करत नाहीत.
परंतु, जर बोटं वाजवताना दुखत असेल, तर ती चेतावणी असू शकते. अशा वेळी तो आवाज निरुपद्रवी कॅव्हिटेशनमुळे नव्हे, तर सुजलेल्या ऊतींवर होणाऱ्या दाबामुळे निर्माण होतो, त्यामुळे अशा वेळी सावध राहणं आवश्यक आहे.
संशोधनानुसार, नियमितपणे बोटं वाजवणाऱ्या काही लोकांमध्ये कालांतराने ग्रहणशक्ती (Grip Strength) किंचित कमी होऊ शकते. म्हणजे संधिवात नाही, पण हाताची पकड थोडी कमकुवत होऊ शकते.
मग लोकांना संधिवाताचा गैरसमज का होतो?
कारण योगायोग! संधिवात हा मुख्यत्वे वय, आनुवंशिकता आणि सांध्यांवरील झीज यांमुळे होतो आणि बोटांच्या शेवटच्या सांध्यांवरच जास्त परिणाम दिसतो. योगायोगाने ह्याच सांध्यांमध्ये लोक बोटं वाजवतात, त्यामुळे जेव्हा नंतर वेदना किंवा कडकपणा जाणवतो, तेव्हा दोष दिला जातो ‘त्या सवयीला.’
मग बोटं मोडणे थांबवावं का?
जर ते वेदनारहित असेल तर थांबवण्याची गरज नाही. पण, जर वेदना होत असेल तर नक्की थांबवा.
अगदी सवयीने करत असाल तरी, जास्त वेळा बोटं वाकवणं, ताणणं किंवा वाजवणं यामुळे आसपासच्या लिगामेंट्स किंवा ऊतींवर दाब येऊ शकतो.
बोटं मोडणं म्हणजे संधिवाताचं कारण नाही हा फक्त गैरसमज! तरीही अतिरेक नेहमीच नुकसानकारक ठरतो, म्हणून पुढच्यावेळी कुणी बोटं वाजवत असेल तर घाबरू नका… फक्त त्यांना सांगा, “संधिवात नाही होणार, पण हाताची पकड थोडी सैल होईल!”
