Dandruff Cause Hair Loss : डँड्रफ ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामध्ये डोक्याच्या त्वचेवर अगदी लहान-लहान पांढऱ्या रंगाचे थर जमा होतात. काही लोकांच्या डोक्याच्या त्वचेवरुन खवल्यासारखं निघू लागते, पण जेव्हा केसांमधील हा पांढरा कोंडा गळून खांद्यावर पडू लागतो तेव्हा याविषयी अधिकच चिंता वाटते. परंतु, डँड्रफ असलेल्या काही लोकांना केस गळतीचा त्रासही होऊ शकतो का? डँड्रफ दीर्घकाळ राहिल्याने टक्कल पडू शकते का? यावर एका तज्ज्ञ डॉक्टरांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
गाझियाबाद येथील मॅक्स हॉस्पिटलच्या डर्मेटॉलॉजी (त्वचारोग) विभागातील डॉ. सौम्या सचदेवा यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. सौम्या सांगतात की, “बहुतांश प्रकरणांमध्ये डँड्रफ हे थेट केस गळण्याचे कारण नसते. मात्र, डँड्रफमुळे येणाऱ्या खाजेमुळे लोक सतत डोके खाजवतात. सतत खाजवल्यामुळे केसांच्या मुळांना इजा पोहोचते आणि काही प्रमाणात केस गळू शकतात; पण यामुळे पूर्णपणे टक्कल पडत नाही. याशिवाय, ‘अँड्रोजेनिक एलोपेशिया’ (ज्यामुळे पुरुष आणि महिलांमध्ये टक्कल पडते) हा त्रास असलेल्या लोकांमध्ये डँड्रफमुळे केस गळण्याची समस्या अधिक वाढू शकते.”
डँड्रफमुळे होणारी केसगळती कशी थांबवावी?
डँड्रफमुळे होणारी केसगळती थांबवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोक्याची खाज शक्य तितकी कमी करणे. खाज कमी झाल्यास खाजवण्याची इच्छा कमी होईल आणि केसांच्या मुळांचे होणारे नुकसान टाळता येईल. तसेच, डँड्रफ नक्की कोणत्या कारणामुळे होत आहे, हे शोधणेही तितकेच गरजेचे आहे.
डॉ. सौम्या स्पष्ट करतात की, डँड्रफ होण्याची अनेक कारणे असू शकतात; जसे की केस धुण्याच्या चुकीच्या सवयी किंवा त्वचेशी संबंधित काही अंतर्गत आजार. जर तुम्हाला डँड्रफचे नेमके कारण माहित नसेल, तर त्वचारोग तज्ञांचा (डर्मेटॉलॉजिस्ट) सल्ला नक्की घ्या. ते तुमच्या स्कॅल्पची तपासणी करून डँड्रफचे कारण अतिप्रमाणात किंवा खूप कमी प्रमाणात केस धुणे तर नाही ना, हे तपासू शकतात. तसेच, डोक्याची त्वचा कोरडी असल्यास निघणारे बारीक पापडे यांसारख्या अंतर्गत कारणांचीही ते तपासणी करू शकतात.
काही लोकांच्या डोक्याच्या त्वचेवर ‘मॅलासेझिया’ (Malassezia) नावाचा बुरशीजन्य घटक (फंगस) वाढू लागतो. हा फंगस बहुतांश लोकांच्या स्कॅल्पवर असतो. मात्र, काही वेळा यामुळे स्कॅल्पमध्ये जळजळ होऊन त्वचेच्या पेशी (सेल्स) वेगाने वाढू लागतात. जेव्हा या पेशी मृत होतात, तेव्हा डँड्रफ तयार होतो.
मेडिकेटेड शॅम्पूचा वापर करा
डॉ. सौम्या यांच्या मते, जर तुम्ही अजून सुरुवात केली नसेल, तर डँड्रफसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या मेडिकेटेड शॅम्पूचा वापर करून पाहा. शॅम्पू निवडताना त्यात पायरिथिओन झिंक (Pyrithione Zinc), सॅलिसिलिक ॲसिड (Salicylic Acid), केटोकोनाझोल (Ketoconazole), किंवा सेलेनियम सल्फाईड (Selenium Sulfide) हे घटक आहेत की नाही हे तपासा. जर डँड्रफचे प्रमाण कमी असेल, तर काही आठवडेच मेडिकेटेड शॅम्पू वापरण्याची गरज भासेल. जर तुमच्या केसांचा रंग फिकट असेल, तर सेलेनियम सल्फाईडयुक्त शॅम्पू वापरणे टाळा.
त्वचेतील ओलावा (मॉइश्चर) टिकवून ठेवा
डँड्रफचे कारण काहीही असो, कंडिशनरच्या साहाय्याने स्कॅल्प हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः मेडिकेटेड शॅम्पू, त्यातही सॅलिसिलिक ॲसिड असलेल्या शॅम्पूचा वापर करताना ही काळजी घेणे अधिक गरजेचे ठरते, कारण यांच्या नियमित वापराने केस कोरडे पडू शकतात.
