Can Diabetics Eat Watermelon: उन्हाळा सुरू झाला की, बाजारात दिसणारी लालचुटूक, रसाळ आणि थंडगार कलिंगडं पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. प्रचंड उकाड्यात शरीराला थंडावा देणारं हे फळ अनेकांना आवडतं. मात्र, ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न कायम असतो- “मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावं का?” कारण गोड चव असल्यामुळे अनेक जण हे फळ पूर्णपणे टाळतात. पण, खरंच कलिंगड इतकं धोकादायक आहे का? की योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदेही मिळू शकतात? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कलिंगड मधुमेहासाठी धोकादायक ठरू शकतं?
आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या काही अहवालांनुसार, कलिंगडामध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे ते रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतं. मात्र, हा परिणाम कितपत होईल, हे पूर्णपणे आपण किती प्रमाणात कलिंगड खातो यावर अवलंबून असतो.
उदाहरणार्थ- साधारण एक कप चिरलेल्या कलिंगडामध्ये काही प्रमाणात नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असू शकते. म्हणूनच तज्ज्ञ, “प्रमाणात खा”, असा सल्ला देतात.
मग मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावं का?
तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या लोकांनी कलिंगड पूर्णपणे वर्ज्य करण्याची गरज नाही. योग्य प्रमाण आणि संतुलित आहारासोबत ते खाल्ल्यास अनेक पोषक घटक शरीराला मिळू शकतात.
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात.
हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठीही फायदेशीर?
कलिंगडामध्ये असलेलं व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतं, तर व्हिटॅमिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं. त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात.
विशेष म्हणजे, कलिंगडामध्ये लायकोपीन नावाचं तत्त्व असतं. काही तज्ज्ञांच्या मते, तै हृदयाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करू शकतं. मधुमेह असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्यामुळे हा घटक महत्त्वाचा मानला जातो.
शरीराला ठेवतं हायड्रेटेड
कलिंगडामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यास मदत होऊ शकते. तसेच पोट भरल्यासारखं वाटत असल्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यासही मदत मिळू शकते.
पण ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं
तज्ज्ञ सांगतात की, मधुमेह असलेल्या लोकांनी फक्त कलिंगड मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा ते संतुलित आहारासोबत खावं. तसेच कलिंगडाचा रस किंवा साखर मिसळलेले पदार्थ टाळून, ताजी फळं खाणं अधिक योग्य ठरू शकतं.
(टीप : ही माहिती आरोग्यविषयक अहवाल आणि तज्ज्ञांच्या सामान्य सल्ल्यावर आधारित आहे. मात्र, वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
