Do Diapers Cause Kidney Damage: आजच्या मॉडर्न काळात डायपर हा बाळांच्या संगोपनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. घरात असो वा बाहेर, डायपरमुळे बाळाला मिळतो आराम आणि पालकांना मिळते सोय. पण, अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात सांगितले जाते, “डायपर लावल्याने बाळाची किडनी खराब होते!” हे ऐकून अनेक पालक चिंतेत पडले असतील. मात्र, चाइल्ड स्पेशॅलिस्ट डॉ. इमरान पटेल यांनी यावर दिलेले स्पष्टीकरण सध्या चर्चेत आहे.

व्हायरल व्हिडीओने उडवला पालकांचा थरकाप!

त्या व्हिडीओत एक व्यक्ती, स्वतःला डॉक्टर म्हणवत, एका महिलेला सांगताना दिसतो, “बाळाला डायपर लावू नका, त्यामुळे किडनी खराब होते.” हा व्हिडीओ व्हायरल होताच हजारो पालक हादरले. बाळाच्या आरोग्याशी संबंधित गोष्ट असल्याने भीती अधिक वाढली; पण खरंच डायपरमुळे किडनीला धोका असतो का?

डॉक्टर इमरान पटेल यांचं स्पष्ट उत्तर

डॉ. पटेल म्हणतात, “डायपरमुळे किडनी खराब होते हे पूर्णपणे चुकीचं आहे! ही केवळ अफवा आहे आणि पालकांना घाबरवण्याचं काम करते.”

त्यांनी स्पष्ट सांगितले, “किडनी ही शरीराच्या आत असते आणि ती रक्त शुद्ध करण्याचं काम करते. डायपरचा त्या प्रक्रियेवर काहीही परिणाम होत नाही. डायपर फक्त लघवी शोषून घेण्याचं काम करतो. त्यामुळे डायपर लावल्यानं किडनी डॅमेज होते हा दावा पूर्णपणे खोटा आहे.”

बाळाच्या लघवीनंतर ओलसर डायपर तसाच राहिल्यास त्रास होण्याची शक्यता

डॉ. पटेल यांच्या मते, बाळाने दीर्घकाळ ओला डायपर घातला, तर त्याला त्वचेवर रॅशेस, खाज, स्किन इन्फेक्शन किंवा युरिन इन्फेक्शन (UTI), असे त्रास होऊ शकतात. जर वेळेवर डायपर बदलला नाही, तर त्यामध्ये जंतू वाढतात आणि त्यामुळे होणाऱ्या संसर्गाची बाधा मूत्रमार्गापर्यंत पोहोचू शकते. पण, ही बाब तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि त्यामुळे मूत्रपिंड निकामी होत नाही.

पालकांसाठी डॉक्टरांच्या ५ महत्त्वाच्या सूचना :

  • प्रत्येकी तीन-चार तासांनी डायपर बदलणं आवश्यक.
  • बाळानं शौच केल्यास लगेच डायपर बदलावा.
  • डायपर बदलल्यानंतर बेबी वाइप्स किंवा कोमट पाण्यानं तो भाग स्वच्छ करून कोरडा करावा.
  • रात्री झोपण्याआधी नवा डायपर घालावा.
  • दिवसा काही तास बाळाला डायपर-फ्री टाइम द्यावा म्हणजे त्याच्या त्वचेला श्वास घेता येईल.

नैसर्गिक पर्यायही उपलब्ध!

डॉक्टर सांगतात, “जर पालकांना सिंथेटिक डायपरविषयी शंका असेल, तर बाजारात कॉटन किंवा क्लॉथ डायपर उपलब्ध आहेत. ते पुन्हा वापरता येतात आणि बाळाच्या त्वचेसाठीही ते मऊ असतात.”

येथे पाहा व्हिडीओ

निष्कर्ष

डायपरमुळे बाळाची किडनी खराब होते हा दावा पूर्णपणे अवैज्ञानिक आणि दिशाभूल करणारा आहे. योग्य ती काळजी घेतल्यास डायपर वापरणं सुरक्षित, स्वच्छ आणि सोईस्कर आहे; मात्र डायपर वेळेवर बदलणं आणि स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे.

“भीती नको; जागरूकता हवी!”, असं आवाहन डॉ. इमरान पटेल यांनी पालकांना केलं आहे.

जर तुम्हीही नवीन आई-वडील असाल, तर ही माहिती नक्की शेअर करा. कारण- कधी कधी ‘मिथकां’पेक्षा सत्य अधिक सुरक्षित असतं.