Lemons Really Help With Acidity?: लिंबू हे गुणकारी मानले जाते. आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये त्याचा फायदा होत असतो. लिंबू हे पौष्टिक आहे. कारण त्यात ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासही हातभार लागतो. लिंबाचे फळ, बिया, साल आणि रस या सर्वांचा औषधी उपयोग होतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दरम्यान अॅसिडिटीची म्हणजेच पित्ताची समस्या असणाऱ्यांना लिंबू वरदान ठरु शकतं. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊयात.
बदलती जीवनशैली आणि खाणपाण्याच्या अनियमित सवयींमुळे अॅसिडिटीची म्हणजेच पित्ताची समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकते. वारंवार होणाऱ्या अॅसिडिटीच्या समस्येमुळे पोटाचे अल्सर, आतड्यांचे विकार होऊ शकतात.
ॲसिडिटी असल्यास लिंबू सेवन करावे का?
ॲसिडिटी असल्यास लिंबू सेवन करावे का? तर हो लिंबू आम्लयुक्त असले तरी ते प्रत्यक्षात मदत करू शकतात. पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ श्वेता जे पांचाल सांगतात की, लिंबू तुमच्या शरीरातील पीएच पातळी संतुलित करण्यात मदत करते. सोबतच लिंबूच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा एक स्त्रोत आहे, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी मदत होते.
पचनास मदत करते: लिंबू हा तुमच्या आतड्याचा सर्वात चांगला मित्र आहे. ते आतड्यांच्या हालचालींचे नियमन करण्यात आणि पचन सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे पचनास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत करते: पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून पिल्यास वजन नियंत्रणात मदत करते. लिंबू हे नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध आहेत. याचा अर्थ ते तुमच्या शरीराला जास्तीचे पाणी काढून टाकण्यास मदत करतात आणि तुमची पीएच पातळी संतुलित ठेवतात,
त्वचेचे आरोग्य सुधारते: लिंबाच्या सेवनानं तुमच्या त्वचेवर अतिरिक्त चमक येऊ शकते. लिंबूमध्ये ब्लीचिंग इफेक्ट्स आढळतात, त्यामुळे ते त्वचेसाठी प्रभावी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे डाग दूर करते. मात्र, तरीही त्याचा रस थेट त्वचेवर लावू नये. कारण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.