Prateek Yadav Death Lung Infection Symptoms: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांच्या मृत्यूमागील कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या फुप्फुसात रक्ताची गुठळी झाली होती, असे सांगितले जात आहे आणि त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच ते काही काळापासून मानसिक तणावात (डिप्रेशनमध्ये) असल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि बिसरा तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. शवचिकित्सा अहवाल आणि शरीरातील महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांच्या (उदा. पोट, आतडे, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस) प्रयोगशाळेतील रासायनिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे फुप्फुसातील रक्ताची गुठळी किंवा संसर्ग खरंच अचानक मृत्यूचे कारण ठरू शकतो का?
डॉक्टरांचा मोठा इशारा – काही तासांत परिस्थिती गंभीर होऊ शकते
फरीदाबाद येथील यथार्थ हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजी विभागाचे संचालक डॉ. गुरमित सिंह छाब्रा यांच्या मते, फुप्फुसातील संसर्ग काही परिस्थितीत अत्यंत वेगाने वाढू शकतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो. ते सांगतात की, काही विशिष्ट जीवाणू (बॅक्टेरिया) इतक्या वेगाने पसरतात की, काही तासांतच रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते. विशेषतः अशा रुग्णांमध्ये ज्यांची रोगप्रतिकार शक्ती आधीपासूनच कमकुवत असते. डायबिटीज, किडनीचे आजार (CKD), लिव्हरचे आजार (CLD) किंवा COPD सारखे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना हा धोका अधिक असतो.
न्यूमोनिया, सेप्सिस आणि शॉक – मृत्यूचा वाढता धोका
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर संसर्ग नियंत्रणात आला नाही, तर तो संपूर्ण शरीरात पसरू शकतो. अशा वेळी रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी होतो आणि तो सेप्टिक शॉकमध्ये जातो.
या अवस्थेत शरीरातील महत्त्वाचे अवयव काम करणे थांबवू लागतात. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येते. त्यालाच वैद्यकीय भाषेत रेस्पिरेटरी फेल्युअर, असे म्हटले जाते.
फुप्फुसांत हवा भरली तर काय होते? न्यूमोथोरॅक्सचा धोका
काही वेळा टीबी, फंगल इंफेक्शन किंवा गंभीर न्यूमोनियामुळे फुप्फुसांच्या बाहेरील पडदा फाटू शकतो. अशा वेळी छातीत अचानक हवा भरते, ज्याला न्यूमोथोरॅक्स म्हणतात. जर ही हवा वेळीच बाहेर काढली गेली नाही, तर रुग्णाचा श्वास पूर्णपणे थांबून, त्याचा अचानक मृत्यू होऊ शकतो.
फुप्फुसातील रक्ताची गुठळी-सर्वांत धोकादायक स्थिती
दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहणे, शरीरातील सूज, कमी हालचाल यांमुळे पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. याच्यातील एखादी गुठळी फुटून फुप्फुसांपर्यंत पोहोचल्यास, त्याला पल्मोनरी एम्बोलिझम, असे म्हणतात.
ही स्थिती अत्यंत धोकादायक असून, अशा रुग्णाचा काही मिनिटांतही मृत्यू होऊ शकतो.
फुफ्फुस खराब होण्याची लक्षणे
- दीर्घकाळ छातीत दुखणे
- एक महिना किंवा त्याहून अधिक काळ खोकल्याची समस्या
- धाप लागणे
- खोकल्यातून रक्त येणे
- अचानक वजन कमी होणे
डॉक्टरांचा स्पष्ट संदेश – वेळेत निदान अत्यंत महत्त्वाचे
डॉक्टर सांगतात की, फुप्फुसातील प्रत्येक वेळचा संसर्ग तत्काळ जीवघेणा ठरेल, असा नसतो; पण काही परिस्थितींमध्ये तो झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना सतत निरीक्षणाखाली ठेवणे गरजेचे असते.
CRP, Procalcitonin यांसारख्या तपासण्या करून संसर्ग किती प्रमाणात पसरला आहे हे समजू शकते आणि मग त्यानुसार उपचार केले जातात.
निष्कर्ष – छोटा आजारही ठरू शकतो मोठा धोका
प्रतीक यादव यांच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, फुप्फुसातील रक्ताची गुठळी, संसर्ग किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या कधीही गंभीर रूप धारण करू शकतात. योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास परिस्थिती काही तासांतच जीवघेणी ठरू शकते.
आरोग्याकडे दुर्लक्ष करणे कधी कधी सर्वांत मोठी चूक ठरू शकते – हेच या घटनेतून समोर आले आहे.
