Meal Timing For Diabetes : मधुमेह नियंत्रणात ठेवणे हे अनेकांसाठी अत्यंत अवघड काम आहे. पण कुटुंबात मधुमेहाचे व्यवस्थापन अनेकदा रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून असते, ज्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात किंवा नियंत्रण ठेवणे अवघड करू शकतात. आहारतज्ञ श्वेता जे पांचाल यांनी यावर प्रकाश टाकला की, जेव्हा कुटुंबातील एखाद्या सदस्याला मधुमेह असतो, तेव्हा दैनंदिन दिनचर्या आणि जेवणामध्ये केलेले साधे बदल किती दीर्घकाळ टिकणारा परिणाम करू शकतात. “जेव्हा तुमच्या कुटुंबात कोणाला मधुमेह असतो, तेव्हा छोटे बदलही खूप मोठा फरक घडवू शकतात,” असे त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केले आणि त्यानंतर कोणीही घरी अमलात आणू शकतील अशा पाच व्यावहारिक टिप्स शेअर केल्या.

जेवणाच्या वेळा बदलण्यापासून ते खाद्यपदार्थांच्या योग्य कॉम्बिनेशनकडे लक्ष देण्यापर्यंत, तिचा सल्ला साध्य करता येण्याजोग्या जीवनशैलीतील बदलांवर केंद्रित आहे. तिने सुचवले, “फळांवर दालचिनी पावडर शिपंडा, यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रात्री ७ वाजेपर्यंत जेवण संपवावे, रात्री उशिरा जेवल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते. जेवणानंतर १० मिनिटे चालावे, अगदी घरीच का होईना. एकाच जेवणात पोळी आणि भात एकत्र खाऊ नये, यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. प्रत्येक जेवणाची सुरुवात काही फायबरयुक्त पदार्थांनी करावी, यामुळे साखरेचे शोषण मंदावते.”

एकाच जेवणात पोळी आणि भात खाल्ल्याने ब्लड शुगरवर काय परिणाम होतो? (The science behind eating roti and rice together)

कनिक्का मल्होत्रा, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षणतज्ज्ञ, द इंडियन एक्सप्रेसला सांगतात, “तुमच्या रक्तातील साखरेची कल्पना एका बादलीसारखी करा, एकाच जेवणात पोळी आणि भात दोन्ही खाणे म्हणजे एकाच वेळी दोन नळांमधून पाणी ओतण्यासारखे आहे, ज्यामुळे ती बादली पटकन भरते (किंवा ओसंडून वाहते). दोन्ही पदार्थ कर्बोदकांनी समृद्ध आहेत आणि एकत्र खाल्ल्यास, ते आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने साखरेची पातळी वाढवतात. त्याऐवजी, फक्त एकच कर्बोदक निवडा आणि तुमच्या ताटात अधिक भाजी किंवा डाळीचा समावेश करा. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारेल आणि हे वाटते तितके अवघड नाही.

मधुमेह नियंत्रणासाठी आहारातील मोठ्या बदलांपेक्षा छोटे जीवनशैली बदल किती प्रभावी? (Small lifestyle changes vs major diet changes for diabetes control)

मल्होत्रा ​​नमूद करतात की, लहान बदलांचे, जसे की चिमूटभर दालचिनी खाणे (ज्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारू शकते) किंवा जेवणानंतर चालणे (ज्यामुळे ग्लुकोज स्नायूंमध्ये जाण्यास मदत होते), यांचे मोजता येण्याजोगे परिणाम होऊ शकतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या सवयींमुळे जेवणानंतर वाढणाऱ्या साखरेच्या पातळीत १५-३०% घट होते.

त्या सांगतात, “जर आहाराच्या मूळ सवयींमध्ये बदल झाला नाही, तर त्यांचा प्रभाव एका मर्यादेपर्यंतच मर्यादित राहतो. कुटुंबे अनेकदा या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात की, टप्प्याटप्प्याने केलेले बदल सातत्य टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि कालांतराने रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारू शकतात; जर ते नियमितपणे अवलंबले गेले, तर कधीकधी हे परिणाम मोठ्या बदलांइतकेच प्रभावी ठरतात.”

मधुमेह नियंत्रणासाठी जेवणाची वेळ किती महत्त्वाची? (How important is meal timing for diabetes management?)

मल्होत्रा ​​सांगतात, “रात्रीचे जेवण लवकर करणे फायदेशीर ठरते, कारण इन्सुलिनची क्रिया आणि ग्लुकोज चयापचय हे सर्केडियन रिदमशी (जैविक लय) निगडित आहेत. रात्री उशिरा जेवल्याने रात्रीच्या वेळी साखरेचे प्रमाण वाढते आणि उपाशीपोटीची पातळी खालावते. अनेकांसाठी, रात्रीचे जेवण रात्री ९ ऐवजी ७ वाजता केल्यास उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी १०-१५ mg/dL पर्यंत कमी होऊ शकते.”

तथापि, चयापचय क्रिया प्रत्येकाची वेगवेगळी असते: रात्र पाळीत काम करणारे किंवा उशिरा उठणारे लोक सर्वोत्तम परिणामासाठी जेवणाच्या वेळेत बदल करू शकतात. केवळ घड्याळच नाही, तर झोपण्याच्या- सकाठी उठण्याच्या चक्रांशी असलेला ताळमेळही महत्त्वाचा आहे. तज्ज्ञांच्या मते, जेवणाची वेळ सारखी असली तरी, सतत ग्लुकोज मॉनिटरिंगमुळे (Continuous glucose monitoring) जेवणाच्या वेळेचा परिणाम निश्चित होतो.