Can Sleeping With Onions Detox Your Body : ओव्याचा रस पिणे असो किंवा त्वचेवर लसूण चोळणे असे अनेक उपाय सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याचबरोबर सध्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी (डिटॉक्स) आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रात्री पायांना कांद्याचे काप लावणे हा एक नवीन ‘व्हायरल’ उपाय सध्या चर्चेत आहे. पण, या दाव्यांमध्ये काही तथ्य आहे का? ‘इंटर्नल मेडिसिन’ (अंतर्गत वैद्यकशास्त्र) तज्ज्ञ काय म्हणतात याबद्दल जाणून घेऊयात…
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पायांच्या तळव्यांवर कांद्याचे काप ठेवून ते प्लास्टिक रॅपच्या साहाय्याने बांधून ठेवून रात्रभर तसेच ठेवून झोपण्याचा सल्ला देताना दिसत आहे. यामुळे शरीर डिटॉक्स होईल असा दावा करण्यात आला आहे. शरीरातील सूज व सर्व प्रकारच्या शारीरिक वेदनांपासून मुक्त होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तसेच, यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे आरोग्य (gut health) आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल असे देखील म्हंटले आहे. पण, तज्ज्ञांनी हा दावा फेटाळला आहे.
हा दावा खरा की खोटा?
‘इंटर्नल मेडिसिन’ तज्ज्ञ डॉक्टर टिम टियुटान यांनी हे दावे फेटाळून लावले आणि लोकांना सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. कारण – आरोग्याविषयीच्या दिशाभूल करणाऱ्या सल्ल्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. चुकीची माहिती हानिकारक असते. त्यामुळे व्हायरल व्हिडीओवर अवलंबून राहण्याऐवजी आरोग्याशी संबंधित दाव्यांची खातरजमा विश्वसनीय वैद्यकीय स्रोतांकडून करावी; असे आवाहन डॉक्टरांनी प्रेक्षकांना केले आहे.
कांदा शरीराला डिटॉक्स करतो का?
पायांना कांदा लावल्याने खालील गोष्टी साध्य होतात. पण, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही:
- शरीर डिटॉक्स करणे
- सूज कमी करणे
- शारीरिक वेदना कमी करणे
- आतड्यांचे कार्य सुधारणे
- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे
पायांच्या तळव्यांवाटे कांद्याच्या मदतीने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची प्रक्रिया शक्य आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.
पण, वास्तविक पाहता, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया (डिटॉक्सिफिकेशन) यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि पचनसंस्था यांच्याद्वारे नैसर्गिकरित्या घडते.
हे उपाय इतके लोकप्रिय का आहेत?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घरगुती उपाय अनेकदा वेगाने पसरतात. कारण – असे उपाय स्वस्त, निरुपद्रवी आणि करून पाहण्यास सोपे वाटतात. मात्र, सोशल मीडियावर एखादा दावा लोकप्रिय झाला म्हणजे तो वैद्यकीयदृष्ट्या अचूक असतोच असे नाही. कोणताही आरोग्यविषयक उपाय करून पाहण्यापूर्वी, तो सल्ला विश्वसनीय वैद्यकीय तज्ज्ञांकडून आला आहे का आणि त्याला वैज्ञानिक पुराव्यांचा आधार आहे का, याची खात्री करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
डॉक्टर ट्युटन म्हणतात की, कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने बोलणारी प्रत्येक व्यक्ती तज्ज्ञ किंवा विश्वासार्ह असेलच असे नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणतीही माहिती स्वीकारताना सोशल मीडियावरील ट्रेंड किंवा व्हायरल व्हिडिओंपेक्षा वैज्ञानिक पुरावे आणि तज्ज्ञांचा सल्ला यावरच विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरते.
