Can you reheat rice multiple times : अनेकदा मित्र-मैत्रिणींबरोबर खाऊन आलो म्हणून, तर कधी अचानक डिनरचा प्लॅन झाला म्हणून घरचे जेवण शिल्लक राहते. मग आईचा ओरडा पडू नये आणि अन्न वाया जाऊ नये म्हणून उरलेला भात सकाळी गरम करून फोडणी देऊन खातो. तर अनेकदा दोन जेवणांदरम्यान भात गरम करून खाल्ला जातो. पण, भात खूप वेळा गरम करणे बरोबर आहे का? दोन जेवणांदरम्यान भात कसा गरम केला जातो? कसा साठवला जातो आणि कसा हाताळला जातो, याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग या सगळ्या प्रश्नही उत्तरे आज आपण बातमीतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

भात जास्त वेळा गरम करणे सुरक्षित आहे का?

याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने कोलकतामधील मुकुंदापूर येथील ‘नारायण आरएन टागोर हॉस्पिटल’च्या आहारतज्ज्ञ दीपा मिश्रा यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, भात पुन्हा पुन्हा गरम करणे टाळा. विशेषतः दोन जेवणांच्या मध्ये भात योग्य पद्धतीने ठेवला नसेल तर. भात पुन्हा गरम करणे धोकादायक नाही. मात्र, तो योग्य पद्धतीने साठवला नसेल किंवा वारंवार खोलीच्या तापमानावर ठेवला गेला असेल, तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तो पुन्हा गरम करून खाऊ नये. त्याबद्दलची एक मुख्य चिंता म्हणजे ‘बॅसिलस सेरियस’ (Bacillus cereus) नावाचा जीवाणू, जो कच्च्या तांदळात सामान्यतः आढळतो.

हा जीवाणू उष्णतारोधक बीजाणू (spores) तयार करू शकतो, जे शिजवण्याच्या प्रक्रियेनंतरही टिकून राहू शकतात. जेव्हा शिजवलेला भात ४°C ते ६०°C या ‘तापमानाच्या धोकादायक पट्ट्यात’ (temperature danger zone) बराच वेळ ठेवला जातो, तेव्हा हे बीजाणू वाढू शकतात आणि विषारी पदार्थ (toxins) तयार करू शकतात. त्यातील काही विषारी पदार्थ उष्णतेने नष्ट होत नाहीत म्हणजेच भात पुन्हा गरम केल्यानेही ते नष्ट होत नाहीत. त्यामुळे अयोग्यरीत्या साठवलेला भात केवळ पुन्हा गरम केल्याने तो खाण्यासाठी सुरक्षित राहत नाही.

त्याव्यतिरिक्त वारंवार गरम केल्याने भाताचा दर्जा आणि पोत (texture) यांवर परिणाम होऊ शकतो तसेच त्यातील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे स्टार्चची रचना बदलू शकते आणि भात कोरडा, चिकट, कडक किंवा चघळायला त्रासदायक (unpleasantly chewy) होऊ शकतो. इतकेच नाही, तर वारंवार गरम केल्याने त्यातील काही पोषक तत्त्वेही नष्ट होऊ शकतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे भात सर्व बाजूंनी समान पद्धतीने गरम होणे गरजेचे आहे. भाताचा काही भाग पुरेसा गरम झाला नाही, तर त्या ठिकाणी जीवाणूंची वाढ होऊ शकते. त्यामुळे भात खराब होण्याचा आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो.

मग भात गरम करण्याची योग्य पद्धत कोणती?

  • तुम्हाला जेवणासाठी हवा असलेला भात फक्त बाहेर काढणे आणि उरलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे.
  • शिजवलेला भात बराच वेळ खोलीच्या तापमानावर ठेवू नका. तो लवकर थंड करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. पुन्हा खायचा असेल, तेवढाच भात बाहेर काढून पूर्णपणे गरम करा. एकाच भाताचा भाग पुन्हा पुन्हा गरम करणे टाळा.
  • अन्नातून विषबाधा होण्याचा धोका टाळण्यासाठी भात योग्य पद्धतीने थंड करणे, लवकर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आणि व्यवस्थित साठवणे महत्त्वाचे आहे आणि पुन्हा खाताना तो पूर्णपणे गरम करणेही तितकेच गरजेचे आहे.