Non-alcoholic fatty Liver Disease (NAFLD) : हल्ली तुमच्या दिसण्यावरून तुम्ही आजारी आहात की नाही हे ठरवले जाते. पण, प्रत्येक निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीचे यकृतही निरोगी असेल, असं समजणं योग्य नाही. जे लोक मद्यपान किंवा धूम्रपान करत नाहीत आणि केवळ घरचंच जेवण खातात, त्यांच्यामध्येही हल्ली डॉक्टरांना फॅटी लिव्हरच्या समस्या आढळून येत आहेत. ही परिस्थिती गोंधळात टाकणारी आहे. कारण- बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असले तरी यकृतावरील ताण सतत वाढत असतो. त्यामागील खरी कारणं म्हणजे आपल्या रोजच्या वाईट सवयी. ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही; त्या सवयींमुळेच तुमच्या यकृतावर गंभीर परिणाम होत आहेत.

जीवनशैलीशी संबंधित आजार

डॉक्टरांच्या मते, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा जीवनशैलीशी संबंधित एक झपाट्यानं वाढणारा आजार बनला आहे. मद्यपान न करताही यकृतामध्ये चरबी जमा झाल्यास हा आजार होतो. ‘सायन्स डायरेक्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार, ही समस्या भारतातील शहरी भागात अधिक सामान्य होत आहे आणि त्याचा थेट संबंध आपल्या बदलत्या जीवनशैलीशी आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

डॉ. आम्रपाली पाटील यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “यकृताचे आजार केवळ मद्यपानामुळेच होतात हा एक सामान्य गैरसमज आहे. मद्यपानाव्यतिरिक्त इतर अनेक घटकदेखील यकृताच्या कार्यावर परिणाम करत असतात. त्यात आहार हा यकृतावर परिणाम करणारा सर्वांत मोठा घटक आहे. पूर्वीप्रमाणे आता आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश नसतो. रिफाईंड पीठ, त्यातील साखर, पॅकेज केलेले स्नॅक्स व वारंवार बाहेरून मागवलेले जेवण यांमुळे हळूहळू यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते. शरीरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया करणे हे यकृताचे काम आहे; परंतु जेव्हा त्यावर अतिरिक्त भार पडतो, तेव्हा चरबी जमा होऊ लागते.

Award Banner

तुमच्या ‘या’ रोजच्या सवयी ठरताय घातक

त्याशिवाय व्यायामाचा अभाव, दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे व झोपेचा अभाव या गोष्टींमुळे चयापचय क्रियेत अडथळा येतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, शारीरिक हालचालींचा अभाव हे चयापचय विकारांचे एक प्रमुख कारण आहे. काही घटक ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात, त्यात दीर्घकाळ औषधोपचार, क्रॅश डाएटिंग, अनियमित खाण्याच्या सवयी आणि अचानक वजन कमी होणे यांचा समावेश होतो. डॉ. पाटील यांच्या मते, हे सर्व घटक यकृतावर अतिरिक्त भार टाकतात आणि कालांतराने समस्या अधिक गंभीर करू शकतात.

सर्वांत मोठे आव्हान हे आहे की, सुरुवातीला त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. लोक अनेकदा सौम्य थकवा, पोट फुगणे किंवा अस्वस्थता अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. डॉ. पाटील स्पष्ट करतात की, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि जेव्हा समस्येचे निदान होते, तेव्हापर्यंत स्थिती गंभीर झालेली असू शकते. हे टाळण्यासाठी मोठे बदल करण्याची आवश्यकता नाही; त्याऐवजी सवयीतील लहान लहान सुधारणा करणे अधिक प्रभावी ठरते. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये, रात्री उशिरा जेवणे आणि अनावश्यक पूरके खाणे टाळावे. यकृताच्या आरोग्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे चालणे, संतुलित आहार आणि चांगली झोप आवश्यक आहे.

(टीप – ही माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणत्याही उपायाचाश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)