Cancer Risk Factors: दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर हे सर्वाधिक आढळणारे कॅन्सर आहेत. अशा परिस्थितीत कॅन्सर का होतो, कोणत्या लोकांना त्याचा धोका जास्त असतो आणि कॅन्सरपासून बचाव कसा करता येतो, याबाबत WHO ने महत्त्वाची माहिती दिली आहे.
कॅन्सर कसा होतो?
शरीरातील सामान्य पेशी (Cells) बदलून ट्युमरच्या पेशींमध्ये रूपांतरित झाल्यावर कॅन्सर होतो. ही प्रक्रिया अनेक टप्प्यांत घडते. सुरुवातीला प्री-कॅन्सर अवस्थेपासून सुरुवात होऊन पुढे तो घातक ट्युमरमध्ये बदलू शकतो.
कॅन्सर होण्याची कारणे कोणती?
अतिनील (UV) किरणे आणि आयोनायझिंग रेडिएशनसारखे भौतिक (Physical) घटक, अॅसबेस्टोस, तंबाखूच्या धुरातील हानिकारक पदार्थ, मद्यपान आणि आर्सेनिकसारखे रासायनिक (Chemical) घटक कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. तसेच, काही विषाणू (Virus), जीवाणू (Bacteria) आणि परजीवी (Parasites) यांच्यामुळे होणारे संसर्गही कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.
कॅन्सरचे सामान्य जोखीम घटक
तंबाखूचे सेवन, मद्यपान, असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, वायू प्रदूषण आणि काही असंसर्गजन्य आजार यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
दीर्घकालीन संसर्गही ठरू शकतात कारण
काही दीर्घकालीन संसर्ग (Chronic Infections) देखील कॅन्सरचा धोका वाढवतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी, ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV), हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी विषाणू यांसारखे संसर्ग कॅन्सरची शक्यता वाढवू शकतात.
कॅन्सरपासून बचावासाठी काय करावे?
तंबाखूपासून दूर राहा, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करा. तसेच मद्यपान टाळा, HPV आणि हिपॅटायटिस बीची लस घ्या, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून स्वतःचे संरक्षण करा, कामाच्या ठिकाणी आयोनायझिंग रेडिएशनपासून बचाव करा आणि प्रदूषणापासून शक्य तितके दूर राहा.
कॅन्सर लवकर कसा ओळखावा?
वेळोवेळी कॅन्सरची तपासणी (स्क्रीनिंग) करून घ्या. तसेच कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात याची माहिती ठेवा. शरीरात कोणतीही समस्या दीर्घकाळ जाणवत असेल किंवा कॅन्सरची लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्या.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
