Cancer Symptoms: तज्ज्ञांच्या मते, कॅन्सर हा एका दिवसात होत नाही. सुरुवातीच्या टप्प्यापासूनच शरीर काही संकेत देऊ लागते. मात्र, अनेकजण ही लक्षणे साधी समजून दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतात. त्यामुळे अनेकांना कॅन्सरचे निदान थेट पुढील टप्प्यात होते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मात्र, प्रत्येक छोट्या-मोठ्या त्रासामुळे घाबरण्याचीही गरज नाही. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.
शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये दिसू शकतात हे संकेत
तज्ज्ञ सांगतात की, किडनी, पोट किंवा मूत्रमार्गात कॅन्सर होण्याची शक्यता असल्यास लघवीत किंवा शौचात रक्त दिसू शकते. तसेच भूक कमी लागणे, कोणतेही ठोस कारण नसताना वजन झपाट्याने घटणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
तोंडाचा किंवा घशाचा कॅन्सर असल्यास घशात सूज येणे, गाठ जाणवणे किंवा तोंडात वारंवार न भरून येणारे व्रण दिसू शकतात. स्तनाच्या कॅन्सरमध्ये स्तनात गाठ जाणवणे हे सर्वसाधारण लक्षण मानले जाते. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास ती दुर्लक्षित करू नका. त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
वजन झपाट्याने कमी होत असेल तर सावध व्हा
तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे हळूहळू भूक कमी होणे. उदाहरणार्थ, आधी चार पोळ्या खाणारी व्यक्ती दोन पोळ्यांवर येते आणि काही दिवसांनी फक्त एकच पोळी खाऊ लागते. त्यामुळे शरीराचे वजनही कमी होऊ लागते.
जर भूक सतत कमी लागत असेल आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन घटत असेल, तर ही बाब गांभीर्याने घ्यावी. विशेषतः ५ ते ६ महिन्यांत कोणतेही कारण नसताना १० ते १५ किलो वजन कमी झाले, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मद्यपान आणि तंबाखूमुळेही वाढतो धोका
सतत मद्यपान, तंबाखू किंवा तत्सम व्यसनांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅन्सरचा धोका अधिक असतो. मात्र, व्यसन नसलेल्या व्यक्तींना कॅन्सर होऊ शकत नाही, असे नाही. अगदी लहान मुलांनाही कॅन्सर होऊ शकतो. पण अशा हानिकारक पदार्थांचे सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
काही प्रकारचे कॅन्सर हे आनुवंशिकही असतात. विशेषतः रक्ताचा कॅन्सर काही लहान मुलांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे आढळतो. मात्र, सध्याच्या जीवनशैलीत जंक फूड, तंबाखू आणि मद्यपान टाळल्यास कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
घाबरण्याची गरज नाही
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अनेकजण घाबरून जातात. मात्र, आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आज कॅन्सरसाठी इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, रेडिएशन, केमोथेरपी यांसारखे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.
उदाहरणार्थ, स्तनाचा कॅन्सर पहिल्या टप्प्यात असो किंवा चौथ्या टप्प्यात, अनेक रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेचाही पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे घाबरण्याऐवजी शरीरात कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
